APMC Election Result Maharashtra राज्यात पहिल्या टप्प्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतमोजणीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बहुतांश बाजार समित्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले, अर्थातच यातही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा वर्चस्मा राहिला.
पुणे, छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या बाजार समित्यांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीने (Mahayuti) पुरस्कृत आणि थेट वर्चस्व मिळविले.
काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दादा भुसे, विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) (पुणे बाजार समिती), माजी मंत्री सुनील केदार, पंकजा मुंडे यांना आपल्या प्रभाव क्षेत्रात दणका बसला.
राज्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक सत्ता केंद्रे असलेल्या बाजार समित्यांसाठी पहिल्या टप्प्यात झालेल्या १४७ बाजार समित्यांकरिता शुक्रवारी मतदान झाले होते. यानंतर शुक्रवार आणि शनिवार मिळून १३२ बाजार समित्यांचे निकाल लागले.
यातील अनेक बाजार समित्यांमध्ये विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना आपापले गड राखण्यात यश आले आहे. तर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील विविध पक्षांच्या विचित्र आघाड्यांनी सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नांना यश आल्याचे समोर आले आहे. तर अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना (ठाकरे) गटाने चंचूप्रवेश केला आहे.
राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये पुणे, नाशिक, नगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, परभणी, अकोला, नांदेड, नागपूर, जळगांव या बाजार समित्यांसह या जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले.
या मतदानानंतर काही ठिकाणी लगेचच तर काही ठिकाणी शनिवारी (ता. २९) मतमोजणीला प्रारंभ झाला. यानंतर संध्याकाळनंतर विविध निकाल हाती येऊ लागले.
पुणे जिल्ह्यात ९ पैकी बारामती, खेड, मंचर, निरा, इंदापूर, मावळ या सहा बाजार समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले, मात्र तब्बल २० वर्षांनी झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप पुरस्कृत पॅनेलने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दणका दिला.
विशेषतः अजित पवार यांना धक्का मानला जात आहे. येथे अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपने पुण्यासह दौंड बाजार समित्यांवर आपले निशान फडकावले, तर काँग्रेसच्या थोपटे गटाने भोरवरील आपले वर्चस्व कायम राखले.
नगर जिल्ह्यातील नगर तालुका, पारनेर, पाथर्डी, कर्जत, संगमनेर, राहुरी, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मतमोजणी शनिवारी (ता. २९) झाली. बहुतांश तालुक्यात नेत्यांनी आपापल्या बाजार समितीत सत्ता कायम राखली. सात बाजार समित्यापैकी चार बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचे, तर तीन बाजार समित्यांवर भाजपची सत्ता आली.
नाशिक जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांपैकी १० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला यश मिळाल्याचा दावा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला. तर देवळा येथे भाजप आणि सुरगाणा येथे कम्युनिस्ट पक्षांना यश मिळाले.
मालेगाव बाजार समितीत शिवसेना (ठाकरे) गटाचे उपनेते उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी ११ पैकी १० जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवसेना (शिंदे) गटासह पालकमंत्री दादा भुसे यांना हा मोठा दणका मानला जात आहे.
परभणी जिल्ह्यातील सात बाजार समित्यांपैकी परभणी, सेलू, गंगाखेड, पूर्णा या चार समित्यांमध्ये महाविकास आघाडीप्रणीत पॅनेलला बहुमत मिळाले, तर जिंतूर व बोरी या २ समित्यांमध्ये भाजप युतीप्रणीत पॅनेला बहुमत मिळाले आहे. ताडकळस बाजार समितीत महाविकास आघाडी व भाजप युतीला पॅनेलला समान (प्रत्येकी ९) जागा मिळाल्या आहेत.
अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी या तीन बाजार समित्यांमध्ये मतदान झाले. या ठिकाणचे शनिवारी (ता.२९) निकाल जाहीर झाले असून, अपेक्षेप्रमाणे अकोल्यात सत्तारूढ सहकार पॅनेलने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सभापती शिरीष धोत्रे यांच्या नेतृत्वातील पॅनेलने घवघवीत यश मिळवले.
यवतमाळ जिल्ह्यातही अनेक दिग्गज नेत्यांना हादरे बसले आहेत. विद्यमान अन्न व औषधी प्रशासनमंत्री संजय राठोड यांची दिग्रस बाजार समितीवर एक हाती सत्ता होती, त्यांना माजी मंत्री संजय देशमुख यांनी धक्का दिला आहे.
महागाव (यवतमाळ) बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या गटाला मतदारांनी धक्का दिला. परंतु पुसद बाजार समितीच्या निवडणुकीत मनोहर नाईक यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना चीत केले.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद यश संपादन केले. तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर तीन अपक्ष उमेदवारांचा पराभव झाला.
सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी सत्ता राखत भाजपचा धुव्वा उडवला. महाविकास आघाडीचे १६ उमेदवार निवडून आले.
पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांनी निवडणूक जिंकण्यासाठी ताकद लावली होती. परंतु आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांची मोट बांधली, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना पराभवाचा धक्का दिला.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने एकहाती वर्चस्व मिळविले आहे.
मंगळवेढा बाजार समितीच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी बबनराव अवताडे आणि आमदार समाधान आवताडे या काका-पुतण्यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झालेच. पण या निवडणुकीत बाजार समितीच्या सर्व १८ जागा जिंकून बाजार समितीवर पुन्हा एकदा आवताडे गटाने बाजी मारली आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी- महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १२ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर आपली एकहाती सत्ता आणली.
भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार मकरंद पाटील यांनी एकत्रित येऊन लढवलेल्या शेतकरी विकास पॅनेलने बाजार समितीवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी (ता. २८) झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुरस्कृत नेतृत्वाखालील पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून, त्यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांवरील वर्चस्व राखण्यात सत्तारूढ गटांना प्रचंड ओढाताण करावी लागली. काही ठिकाणी महाविकास आघाडी, तर कुठे भाजप-शिवसेना (शिंदे गट) पॅनेल विजयी झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीने बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा या तीन बाजार समित्यांवर वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले, तर मलकापूर बाजार समितीवर भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला. मेहकर बाजार समितीत खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांच्या गटाने एकहाती विजय मिळवला.
प्रमुख समित्यांवर महायुती !
पुणे, छत्रपती संभाजीनगर, नगर या बाजार समित्यांवर भाजप-शिवसेना (शिंदे)सह पुरस्कृत पॅनेलचे वर्चस्व राहिले. राज्यात लक्ष्यवेधी ठरलेली पुणे बाजार समिती राष्ट्रवादीतील बंडखोरांनी भाजपच्या मदतीने आपल्याकडे खेचून आणली.
विदर्भात भाजपला नाकारले
विदर्भात पहिल्या टप्प्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपला नाकारले असून, महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे.
विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या निकालांकडे बघितले जात असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यानिमित्ताने भाजपवर संधाण साधले असले,
तरी त्यांना आपल्या मतदार संघात यश मिळविता आले नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनाही आपल्या मतदार संघातील बाजार समित्यांमध्ये दणका बसला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.