Bhor APMC Election भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी काँग्रेसच्या (Congress) पक्षाने सर्वच्या सर्व १८ जागांवर निर्विवाद विजय मिळवला. काँग्रेसच्या विरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकजूट करून उभारलेल्या पॅनेलची धुळधाण झाली.
या पराजयामुळे आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे आणि शिंदे गट) आणि भाजप या पक्षांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
भोर बाजार समिती सन १९६५ मध्ये स्थापना झाल्यापासून आजपर्यंत काँग्रेसच्याच ताब्यात राहिली आहे. गतवेळच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी राष्ट्रवादीसोबत शिवसेना व भाजप असूनही त्यांना भोपळाही फोडता आला नाही.
आमदार संग्राम थोपटे यांचे योग्य नियोजन व व्यूहरचना, सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि मतदारांच्या वेळेत गाठीभेटी झाल्यामुळे काँग्रेसने आपली विजयाची परंपरा कायम ठेवली. विरोधकांचे उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच काँग्रेसचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचलेले होते. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही.
या निवडणुकीतील चार मतदान केंद्रांपैकी भोर शहर आणि आंबेघर येथील मतदानकेंद्रांवर काँग्रेसला सर्वाधिक मदतान झाले. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर आणि किकवी येथे विरोधकांना दोन-तीन जागा मिळतील, असे वाटत होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होईल असे वाटत होते, परंतु त्यानंतरच्या फेरीत मात्र तेथेही काँग्रेसने आघाडी घेतली.
तालुक्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेले खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राजगड सहकारी साखर कारखाना या संस्था तोट्यात आहेत.
तरीही ग्रामस्तरावरील मतदार हे काँग्रेसलाच साथ देत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला निवडणुकीला उभे करून त्यास निवडून आणण्याची क्षमता आमदार थोपटे यांच्यामध्ये आहे.
विरोधक हे केवळ निवडणुकीच्या वेळी एकत्र येतात आणि एरवीही एकमेकांना पाण्यात बघतात. त्यामुळे त्यांना निवडून देण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही ग्रामपंचायतीच्या काही मतदारांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचा दावा फोल
विकास सोसायटी मतदारसंघात काँग्रेसला बहुमत मिळणार, हे नक्की होते. मात्र, ग्रामपंचायत मतदारसंघात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता मतदारांनी खोटी ठरवली. विकास सोसायटी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सरासरी १००च्या फरकाने; तर ग्रामपंचायत मतदारसंघात ६०च्या फरकाने विजयी झाले आहेत. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. परंतु, या निकालामुळे जादा ग्रामपंचायती या काँग्रेसच्या ताब्यात असल्याचे सिद्ध झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.