Irshalwadi Agrowon
ताज्या बातम्या

Irshalwadi Rehabilitation : हायटेक घरांमुळे भावनांचा कल्‍लोळ

Irshalwadi Landslide : पिढ्यान्‌पिढ्या निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांचे अत्‍याधुनिक घरांमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे.

Team Agrowon

Alibaug News : पिढ्यान्‌पिढ्या निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांचे अत्‍याधुनिक घरांमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. वर्षभरात दरडग्रस्तांना ४१ घरे बांधून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले आहे.

घरांचा आराखडा तयार केला जात असून कंत्राटदार कंपनी नेमण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी त्यांना सर्व अद्ययावत सोयी-सुविधा पुरवण्याचा दावा राज्य सरकार करीत असला तरी सिमेंट काँक्रीटच्या जंगलात मन रमेल का, तिथले राहणीमान, अधिवास सहज स्वीकारता येईल का, असा प्रश्‍न दरडग्रस्‍तांना पडला आहे.

इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव वर्षोनुवर्षे जंगलामध्ये राजासारखे राहत होते. मात्र, दरडीच्या दुर्घटनेनंतर त्‍यांना मूळ अधिवास सोडवा लागत आहे. सिडकोच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील चौक या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे पुनर्वसन केले जात आहे. नैसर्गिक साधन-संपत्तीपासून तयार केलेली त्‍यांची घरे ऊन, पाऊस, थंडीमध्ये बचावासाठी पुरेशी होती.

आता ४१ कुटुंबांचे हायटेक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या सिमेंट काँक्रिटच्या घरात पुनर्वसन केले जाणार आहेत. या बाबत इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांच्या मनात कमालीचा गोंधळ आहे. तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाईचे १४४ कलम लावण्यात आले आहे.

या ठिकाणी कोणतीही बाहेरची व्यक्ती प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या भावना सरकार दरबारी मांडताही येत नाहीत, अशी भावना दरडग्रस्तांचे नातेवाईक, शरद निरगुंडा, घनश्याम वाघ यांनी व्यक्त केली आहे.

कंटेनरमधील तात्पुरत्या घरांमध्ये सर्व आधुनिक सुविधा दिल्या आहेत, परंतु डोंगरमाथ्यावरील कुडाच्या घरात जो राहण्याचा नैसर्गिक आनंद मिळतो, तो इथे मिळत नाही. दिवसभर रानावनात फिरणाऱ्या या लोकांना कंटेनरमध्ये कोंडल्यासारखे वाटू लागले आहे. कंटेनरमध्ये मिळणारे अन्न चांगले असते तरी त्‍याला पूर्वी खात असलेल्‍या अन्नाची चव नाही. सरकारने संसारासाठी सर्व साहित्य दिले आहेत; परंतु या साहित्याचा वापर दरडग्रस्‍तांनी कधीच केलेला नाही.

चुलीवर जेवण शिजवण्याची सवय असणाऱ्या महिलांना कंटेनरमध्ये गॅस शेगडीवर जेवण कसे शिजवायचे, हा मोठा प्रश्न पडला आहे. याबद्दल वरदानी आदिवासी सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्याम शिद सांगतात, ठाकर, कातकरी समाज हा जंगलाच्या इकोसिस्टिमचा एक भाग आहे.

जंगलाला मायबाप समजणारा हा समाज निसर्गाचा समतोल कधीही बिघडवत नाही. या वाडीवर काही अनाथ बालकेही आहेत, या बालकांचे पालकत्व संस्थेकडे न देता सरकारने आपल्याकडे घ्यावे, असे श्याम शिद यांचे म्हणणे आहे.

कुडाच्या घरांची कुशल बांधणी

दगडी व मातीच्या पायावर कारवीच्या काठ्या उभ्या करून त्यावर शेणा-मातीचा मुलामा दिला जातो. बहुतांश वेळा घरातील महिलाच हे काम करतात. या कामासाठी कुशल हातांची व अनुभवाची गरज असते. मात्र त्‍यासाठी वेळही खूप लागतो. घराच्या मध्यावर व बाजूने असलेल्या लाकडी खांबांवर लाकडाचे आडवे खांब टाकून त्यावर कौले किंवा ढापे रचले जातात.

आतील जमीन चांगली चोपून शेणाने सारवली जाते. बाहेर पडवी काढली जाते. कधी कधी भिंती विटांच्या उभारून त्याला मातीचा लेप चढवला जातो किंवा तशाच ठेवल्या जातात. यासाठी फारसा खर्च येत नाही. जंगलातील साधन-संपत्‌तीच्या आधारेच ती बांधता येतात. कालांतराने कुडाच्या भिंती कुजतात. त्या भिंतींचे उत्तम खत होते, त्याला लागलेले शेण आणि माती जंगलातील किंवा परसातील रोपांचे पोषण करते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhandardara Dam : भंडारदरा, निळवंडेतून आवकेनुसार पाणी विसर्ग

Satpuda Rainfall : यावल तालुक्यातील हरिपुरा, वड्री प्रकल्प तुडुंब

New Post Offices : माढा लोकसभा मतदारसंघात तेरा ठिकाणी पोस्ट कार्यालयांना मंजुरी

Soybean Yellow Mosaic : सोयाबीनवरील ‘येलो मोझॅक’ची कृषी विभागाकडून पाहणी

Shaktipeeth Highway : सांगोल्यात ‘शक्तिपीठ’चे मोजणीदार पाठविले माघारी

SCROLL FOR NEXT