Sharad Pawar Sugar
Sharad Pawar Sugar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar Sugar : सहकार, साखर उद्योगामुळेच ग्रामीण अर्थकारणात सुधारणा

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः ‘‘सहकार व साखर उद्योगाने सातत्याने चालू ठेवलेल्या कष्टपूर्वक वाटचालीमुळेच राज्याच्या ग्रामीण भागाचे अर्थकारण सुधारले. जनतेच्या जीवनमानात बदल झाले. त्यामुळे सहकाराच्या बळकटीकरणासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने (Sakal Media Group) हाती घेतलेला सहकार महापरिषदेचा उपक्रम राज्याच्या विकासाला चालना देणारा ठरेल,’’ असे गौरवपूर्ण उद्‍गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad pawar) यांनी काढले.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने पुण्याच्या टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये कालपासून (ता. १७) आयोजित केलेल्या दोनदिवसीय दुसऱ्या सहकार महापरिषदेचे (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) शानदार उद्‍घाटन करताना श्री. पवार बोलत होते.

या वेळी राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे निंबाळकर, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, रिझर्व्ह बॅंकेचे संचालक सतीश मराठे, ‘एस. एस. इंजिनिअर्स’चे अध्यक्ष शहाजी भड उपस्थित होते.

राज्यातील नागरी व सहकारी बॅंका, पतसंस्था तसेच साखर कारखान्यांसह विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी या महापरिषदेत सहभागी झाले आहेत.


श्री. पवार म्हणाले, “विखे-पाटील, तात्यासाहेब कोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तसेच इतर सहकारधुरिणांमुळे राज्यात सहकारी साखर कारखानदारी विस्तारली. लोकांनी दशम्या खाऊन गावोगावी फिरून कारखाने बळकट केले.

त्यामुळेच ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळाली. मात्र काळाची पावले ओळखून आता आर्थिक व्यवस्थापन बदलावे लागेल. पगार आणि खर्च मर्यादित करीत तंत्रज्ञानाचा काटेकोर वापर करावा लागेल. गुणवत्तापूर्ण ऊस उत्पादन वाढवावे लागेल.

साखर कारखान्यांनी २०-२५ कोटी रुपये बाजूला काढून उतारा वाढीसाठी चांगल्या ऊस बेण्याचा पुरवठा करावा. व्यावसायिक व्यवस्थापन देणारे उत्तम तांत्रिक मनुष्यबळ आणावे.”

श्री. प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘बारामतीमध्ये शेती व शिक्षण या दोन मुद्यांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, तसेच विद्या प्रतिष्ठान या संस्था शरद पवार यांच्या माध्यमातून स्थापन झाल्या. या संस्थांसोबत आता आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिर्व्हिसिटी काम करीत आहे.

त्यातून राज्यातील बॅंका व उद्योगांना हजारोच्या संख्येने प्रगत मनुष्यबळ मिळेल. ही कामगिरी श्री. पवार यांच्या द्रष्टेपणातून होत असल्यामुळे त्यांना सहकार महापरिषदेसाठी निमंत्रित केले आहे. सहकार बळकट होण्यासाठी धोरणकर्त्यांशी संवाद सेतू तयार करण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.’’

श्री. अनास्कर यांनी सहकाराच्या वाढीला अडथळा ठरणारे कायदे बदलण्याची गरज या वेळी व्यक्त केली. तर ‘‘सहकारासाठी रिझर्व्ह बॅंक व निबंधक यांची भूमिका सासूसारखी समजली जाते. सहकारावरील नियंत्रण कमी केले तर विकासाचा वेग वाढेल,’’ असे मत श्री. ठाकूर यांनी मांडले.


श्री. दांडेगावकर म्हणाले, ‘‘सहकार वाढविण्यासाठी सरकारी अधिकारी फारसे अनुकूल काम करीत नाहीत. मान्यतेसाठी सहा सहा महिने वाट पाहावी लागते. सेवा सुविधा तत्काळ व सुटसुटीत मिळाल्यास सहकार बळकट होईल.’’

श्री. दरेकर यांनी, “उद्योगपतींनी कर्जे बुडविल्यास सरकारी अर्थसंकल्पात तरतूद होते. मात्र सहकारी बॅंकांची कर्जे ‘एनएपीए’त गेल्यावर कारवाई होते,” अशी खंत व्यक्त केली.

‘अॅग्रोवन’चा गौरव
श्री. दांडेगावकर यांनी सहकार महापरिषदेत ‘अॅग्रोवन’चा गौरव केला. ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकाराला बळकट केल्याशिवाय पर्याय नाही. ग्रामीण महाराष्ट्र व शेतकऱ्यांचे प्रश्‍न ‘सकाळ’ समूह अधिक हाताळतो. ‘अॅग्रोवन’ तर ग्रामीण भागाचा शिक्षक असून मी त्याचा वाचक आहे,’’ असे गौरवोद्‍गार त्यांनी काढले.

श्री. शरद पवार म्हणाले....
- देशाचे नवे सहकारमंत्री अमित शहा यांना मी भेटायला गेलो असता काही मुद्दे त्यांनी एका महिन्यात सोडविले. त्यांचा दृष्टिकोन सहकाराला अनुकूल.


- ब्रिटिश काळात खासगी उद्योजकांनी खंडाने जमिनी घेतल्यामुळे साखर उद्योगाचा पाया रचला गेला.
- कमाल जमीन धारणा कायद्याने खासगी कारखान्यांच्या जमिनी गेल्या. त्यामुळे खासगी कारखान्यांची पीछेहाट झाली.


- सहकारी तत्वाला पोषक भूमिका राज्यकर्त्यांनी घेतल्यामुळे राज्यात सहकारी कारखाने वाढले.
- यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टिकोनामुळे राज्यात सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ, जिल्हा बॅंका, राज्यस्तरीय सहकारी संस्थांचे जाळे तयार झाले.
- सहकारी साखर कारखान्यांमुळेच ग्रामीण भागाची आर्थिक पत वाढली. शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक उपक्रम वाढले.


- डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचे रूपांतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये करण्याचा निर्णय माझा होता. आज ‘व्हीएसआय’ जागतिक दर्जाचे काम करतेय.


- ‘व्हीएसआय’ची शाखा आता खानदेशातदेखील उघडणार.
- साखर उद्योगाला आता साखरेच्या पलीकडे जात मळी, अल्कोहोल, इथेनॉल, सीबीजी, हरित हायड्रोजन अशा संपूर्ण साखळीवर काम करावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT