डॉ. नागेश टेकाळेAgriculture Article: दुबई हे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले शहर माहीत नसलेली व्यक्ती अगदीच विरळ! या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील अत्याधुनिक पद्धतीने केलेली शेती, समुद्रापासून प्राप्त केलेले गोड पाणी, एकही नदी नसलेले शहर आणि सभोवताली पसरलेले वाळवंट यामुळे येथे उभी शेती म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग हाच शेतीचा पर्याय आहे. धान्याची शेती न करता येथे खजूर, इतर फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन जास्त होते. मातीचा वापर अतिशय कमी म्हणजे जेमतेम दहा टक्केच असावा..दुबईला मी माझ्या मित्राच्या घरी गेलो असता त्याच्या वातावरण नियंत्रित असलेल्या बाल्कनीत अनेक फुलझाडे होती, अर्थात सर्व मातीत लावलेली. आश्चर्यापोटी मी त्यास विचारले ही एवढी माती कुठून आणली? कारण येथे सगळीकडे फक्त वाळूच आहे, त्याचे उत्तर होते ‘भारत.’ आपल्या देशातून येथे मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय माती, गांडूळ खत, कोकोपीट निर्यात होते ज्याचा वापर करून येथे शेती केली जाते. पाण्याचा प्रत्येक थेंब येथे जपून वापरला जातो..Soil Erosion: खरडून गेलेल्या जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना.युरोपमधील स्वित्झलॅंड या देशास पृथ्वीवरील स्वर्गच म्हणतात. कारण तेथील निसर्ग सौदर्यांने नटलेल्या बहरलेल्या आल्प्स पर्वताच्या रांगा! येथील रेल्वेतून मी प्रवास केला आणि निसर्ग सौंदर्यांचा आस्वाद लुटला. निसर्गावर कुठेही ओरखडा नव्हता. मग मनात प्रश्न आला, येथील दोन रुळांच्या मधील ‘खडी’ कुठून आली? स्थानिक मित्राने उत्तर दिले, अर्थात ‘भारत.’ राजस्थानला उत्तर पश्चिम हा थारचा वाळवंटी आणि दक्षिण पूर्व हा शेती पिकणारा प्रदेश अशी यांची विभागणी करणाऱ्या अरवली पर्वताच्या रांगा आम्ही फोडल्या..त्यातून निर्माण झालेली खडी निर्यात केली. ही दोन उदाहरणे देण्याचे मुख्य कारण म्हणजे सप्टेंबरमध्ये मराठवाडा, विदर्भात कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि उभ्या पिकांसह खरवडून गेलेली उपजाऊ जमीन! महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांपैकी २९ जिल्ह्यांमधील ६८ लाख हेक्टर जमिनीस त्यावरील उभ्या पिकांसह मोठा फटका बसला. यातील धक्कादायक बाब म्हणजे ६० हजार हेक्टर जमीन त्यावरील मातीसह वाहून गेली. एक सें.मी मातीचा थर निर्माण होण्यास निसर्गास तब्बल ३०० ते ४०० वर्षे लागतात, जी मेहनत एका रात्रीत संपूर्ण वाहून गेली. जी पुन्हा निर्माण होण्यास केवढा तरी कालावधी लागणार आहे, शेतकरी यासाठी कसे थांबणार?.माती गेली कुठे?जमीन खरडून जाण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या मधील हरवलेली जिवाणूची श्रीमंती! अशी जमीन नेहमीच हलकी, वाऱ्याने सहज उडणारी असते, तिच्यात घातलेली रासायनिक खते उत्पन्न देतात, पण मातीला जैविक किंमत शून्य देऊनच! आता प्रश्न पडतो, एवढी सगळी माती कुठे गेली? उत्तर सोपे आहे, ती गाव कुसात असलेल्या पण सध्या अस्तित्वात नसणाऱ्या हजारो ओढ्यांमधून नद्यांना मिळाली..नद्या अस्तित्वात नसल्या तरी त्यांना त्यांची स्मरणशक्ती असते, अचानक जिवंत झाल्यावर कुठून कसे वाहायचे याचा इतिहास त्यांच्याकडे असतो. म्हणून नाले, ओढ्यातील पाण्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून त्या त्यांच्या मूळ प्रवाहातून पुराच्या रूपात वाहू लागतात. अशा वेळी मार्गात जो अडथळा येईल त्यास त्या बरोबर घेऊन जातात. माती निर्माण होण्याचा नैसर्गिक कालावधी लक्षात घेता खरडून गेलेल्या जमिनीत पुन्हा लगेच माती निर्माण होणे कठीण आहे..Soil Erosion: जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना.म्हणून नदी, नाले, ओढे या माध्यमातून वाहून गेलेली माती पुन्हा आपल्या शेतात कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न हवा. ही माती पुन्हा परत आली, तर शेतजमीन नक्कीच श्रीमंत होईल. वाहून गेलेले उभे पीक हिरवे खत म्हणून शेतातच गाडले ,तर ते शेत जमिनीस श्रीमंत करते. भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या संकटास सामोरे जाताना शेतांच्या बांधांना ग्लिरीसिडिया, धेंचा, वाळा या वनस्पतींनी श्रीमंत करावे, उतारावर मोठमोठे खोल चर घ्यावेत. जमिनीत जर सेंद्रिय कार्बन भरपूर असेल तर जमीन एवढी वाहून जात नाही..शेतामधील वाहून गेलेली माती नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांनी श्रीमंत असते. ही अशी माती वाहत्या नद्यांमध्ये शेवाळ आणि जलपर्णीस आमंत्रण देते, ज्याचा परिणाम नदी थांबण्यात होतो. महाराष्ट्रातील अनेक नद्यांना या जलपर्णीने वाहण्यापासून थांबवले आहे. नद्यांमध्ये आलेली ही शेतजमिनीतील माती आता पुन्हा वेगाने जलपर्णीस आमंत्रित करणार! हे दृष्ट चक्र आपणास थांबावयास हवे आणि हे काम शेतकरीच करू शकतो..मातीच्या प्रत्येक कणाचा सन्मान करणारी राष्ट्रे दुबई आणि इस्राईल यापासून आपण काय शिकणार? येथील शेतीला उपजाऊ करणारे कोकोपीट, सेंद्रिय खत आपलेच, त्यातून ते श्रीमंत झाले आणि आम्ही आमच्याच मातीला गरीब केले. थोडा आत्मचिंतनाचा भाग आहे. संकट कोसळले की सर्वच उपदेश करतात, हे खरे असले तरी त्या उपदेशातून आपण काय उचलावयाचे हे शेतकऱ्यांनी ठरवायला हवे. वाहून गेलेली माती नदी पात्रापुरतीच गाळ म्हणून सीमित राहते, या गाळाला काढून नदीला पुन्हा वाहते केले, तर पुढच्या पावसाळ्याचे मोठे संकट नदीच सहन करून शेत जमिनीस वाचवू शकते..खचायचे नाहीएक बोधकथा आठवली. खरिपाची काढणी, मळणी करण्यासाठी एक आनंदी सुखी शेतकरी कुटुंबासह त्याच्या शेतावर गेला. मळणीचे धान्य शेतामधील लहानशा घरात ठेवून सर्व जण रात्री तेथेच झोपले. रात्री ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस झाला आणि त्या शेतकऱ्याचे गावातील मातीचे घर जमीनदोस्त झाले. पाऊस थांबला. सकाळी त्याच्या घराभोवती गर्दी जमा झाली, सर्व जण हळहळ व्यक्त करत होते..मातीखाली दबलेल्या कुटुंबास बाहेर काढण्यासाठी अनेक हात पुढे आले आणि अचानक तो शेतकरी बैलगाडीतून कुटुंबासह शेतातून येताना लोकांना दिसला. अनेक पिढ्या पाहिलेले ते छोटे घर कोसळलेले पाहून शेतकरी क्षणभर हतबल झाला, पण त्याच्या मनाने पुन्हा उभारी घेतली आणि म्हणाला, ‘‘मी येथेच राहणार, हीच माती वापरून पुन्हा घर बांधणा,र कारण येथील गंध आमच्या काही पिढ्यांपासून मी जपलेला आहे.’’ शेतकऱ्याने काही महिन्यातच त्याचे ते घर पुन्हा उभे केले आणि मातीचा सन्मान केला. घर पुन्हा गंधाने श्रीमंत झाले. यातून आपण काय शिकतो? संकटे येतात, जातात पण आपण खचावयाचे नाही. जो खचला तो संपला.९८६९६१२५३१(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.