सातारा : मध केंद्र (मधमाश्यापालन) (Bee Keeping) ही योजना संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. या योजनेचा मधपाळांना चांगला प्रतिसाद मिळत असून, मध व्यावसायिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मंडळ स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
तसेच मधाचे गाव-मधुमित्र अभिनव उपक्रम (Madhumitra Initiative) राज्यात राबविणार असल्याचे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.
मध संचालनालय महाबळेश्वर येथे राज्यातील मधपाळ, प्रगतिशील मधपाळ, मधोत्पादक, सोसायटीचे प्रतिनिधी व अधिकारी कर्मचाऱ्यांची श्री. साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी ते बोलत होते.
महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील, अर्थ सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मुंबई येथील विद्यासागर हिरमुखे, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी एन. जी. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एन. एम. तांबोळी व सर्व तांत्रिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, श्री. साठे यांनी देशातील पहिले मधाचे गाव सातारा जिल्ह्यातील मांघर गावास भेट दिली.
विविध मधपाळांना राज्याबाहेर मधपेट्या वाहतूक करण्यासाठी व परराज्यांतून मध वसाहतींचे स्थलांतर करताना टोलनाका, चेक पोस्टवर थांबावे लागते. त्यामुळे वेळ वाया जात असल्याने मधमाश्या मरण्याची भीती असते.
यासाठी मधपाळांना ओळखपत्र द्यावे. मधपाळांच्या बरोबर मधमाशांच्या संवर्धनाविषयी प्रशिक्षण द्यावे. मधपाळ आणि मधमाश्यांचा विमा उतरण्यात यावा.
मधमाश्यापालन उत्पादने विक्रीसाठी स्टॉल व बाजारपेठ उपलब्ध करावी. मधांबरोबर मधाची इतर उत्पादने मंडळांनी विक्रीसाठी घ्यावीत. वन्य प्राण्यांपासून मध वसाहत संरक्षण करण्यासाठी योजना आखावी.
मध उद्योगासाठी अनुदान ९० टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या मागण्या मधपाळांनी केल्या. यावर श्री. साठे यांनी व्यावसायिकांसाठी राबविलेल्या योजनांविषयी माहिती देऊन मंडळ स्तरावर मांडणार असल्याचे सांगितले. दिग्विजय पाटील यांना स्वागत केले. राजू कानुगडे यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.