Honey bee : मधमाश्यांच्या वसाहती वाढवल्या पाहिजेत

मधमाशीपासून सहा मौल्यवान पदार्थ मिळत असले तरी तिचा पिकांच्या परागीभवनासाठी होणारा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे. म्हणूनच आता शेतकऱ्यांकडून परागीभवन सेवेसाठी मधमाश्यांच्या वसाहतींची मागणी वाढत आहे.
Honey Bee
Honey BeeAgrowon

- डॉ. बी. बी. पवार

अल्बर्ट आइनस्टाईन हे भौतिकशास्त्रज्ञ होते. परंतु या भौतिकशास्त्रज्ञानं मधमाशीचं कार्यदेखील बारकाईनं पाहिलं. मधमाशीच्या कार्याचं निरीक्षण केल्यावर त्यांनी आश्‍चर्यकारक विधान केलेलं आहे, ते असं - ‘‘जर पृथ्वीतलावरून मधमाशी नष्ट झाली तर अवघ्या चार वर्षांत मानवजातही नष्ट होईल.’’ मधमाशीने पिकांचे परागीभवन केले नाही, तर पिकांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. त्यामुळे जगात अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि परिणामी भूकबळींची संख्या वाढेल, असं त्यांना सुचवायचं आहे. पृथ्वीतलावरील सपुष्प वनस्पतींचा विचार केला, तर ८० टक्के वनस्पती परपरागीभवन होणाऱ्या आहेत. बाजरी, मका, कांदा, सूर्यफूल, मोहरी, मुळा, बीट, कारली, गिलकी, दोडका, टरबूज, खरबूज, भोपळा व इतर काकडीवर्गीय पिके तसेच संत्रा, मोसंबी, लिंबू, डाळिंब, पेरू, शेवगा, आंबा, लिची, सफरचंद, आवळा, पपई इत्यादी पिकांचा या गटात समावेश होतो. साधारण १८-२० टक्के वनस्पती स्वपरागीभवन होणाऱ्‍या आहेत.

Honey Bee
Honey bees : मधमाशा का आहेत महत्वाच्या?

गहू, भात, मूग, उडीद, चवळी, मटकी, वांगी, टोमॅटो, मिरची, भुईमूग, सोयाबीन, वाल, वाटाणा, सिमला मिरची, बार्ली, ओट, ज्यूट इत्यादी पिकांचा या गटात समावेश होतो. १-२ टक्के वनस्पती ऑफन क्रॉस पॉलिनेटेड आहेत. म्हणजे त्यांच्यात मुख्यतः स्वपरागीभवन होते, पण काही प्रमाणात परपरागीभवनही होते. ज्वारी, तंबाखू, तीळ, कापूस, तूर अशा पिकांचा या गटात समावेश होतो. याचा अर्थ असा, की ८० टक्क्यांपेक्षा अधिक वनस्पतींना कृत्रिम परागीभवनाची गरज भासते. त्याच फुलातील किंवा त्याच झाडावरील दुसऱ्‍या फुलातील किंवा त्याच प्रकारच्या दुसऱ्या झाडावरील फुलातील परागकण त्या फुलातील स्त्रीकेसरावर पडण्याच्या क्रियेला परागीभवन म्हणतात.

Honey Bee
Honey Portal : मधाच्या नोंदीसाठी ‘मधुक्रांती पोर्टल’

सन १९६५ ते १९७१ च्या दरम्यान देशात हरितक्रांती घडून आली. रासायनिक निविष्ठांचा अविवेकी आणि अतिरेकी वापर सुरू झाल्यामुळे पुढे जमीन, पाणी व पर्यावरणाचा ऱ्‍हास झाला. शत्रुकिडींबरोबर मित्रकिडीही नष्ट झाल्या. मधमाश्याही त्यातून सुटल्या नाहीत. त्यापूर्वी मोठ्या नाल्यांना वर्षातील अनेक महिने पाणी असायचे. त्यांच्या काठांवर अनेक काटेरी झाडेझुडपे असायची. शेतात मोठमोठे बांध असायचे. त्यावरही भरपूर झाडेझुडपे असायची. जंगलतोड नियंत्रणात होती. या काटेरी झाडाझुडपांमध्ये फुलोरी व सातेरी मधमाश्यांची अनेक पोळी आढळत. उंच झाडांवर, उंच इमारतींवर आणि डोंगरकपारीत आग्या मधमाश्यांची मोठमोठी पोळी आढळत. झाडांच्या पोकळ खोडांमध्ये डंखविरहित ट्रायगोना माश्यांची (कोया माश्या) पोळी आढळत. या सर्व प्रकारच्या मधमाश्या शेतकऱ्यांच्या नकळत शेतातील पिकांचे आणि जंगलातील झाडे व वेलींचे परागीभवन करीत.

पुढे जंगलतोड वाढली. डोंगर- टेकड्या उघड्याबोडक्या झाल्या. शेतजमिनीच्या वाटण्यांमुळे बांध लहान झाले. त्यावरील झुडपं काढण्यात आली. अशा प्रकारे मधमाशीचा ‘अधिवास’ नष्ट होत गेला. आग लावून मध काढण्याच्या क्रूर पद्धतीमुळे असंख्य मधमाश्या मेल्या. त्यांच्या वसाहती नष्ट झाल्या. या कारणांमुळे परागीभवनासाठी शेतात पाळीव मधमाश्यांची गरज भासू लागली. सातेरी माशी पेटीत पाळता येते. फुलोरी माशीला मात्र अंधार आवडत नाही, त्यामुळे ती पेटीत पाळता येत नाही. त्यांचं मध उत्पादन कमी असतं. कोया माश्या अतिशय लहान असतात. त्या हरितगृहातील पिकांचे परागीभवन चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्यापासून अतिशय कमी मध मिळतो. त्या लहान पेटीत पाळता येतात.

Honey Bee
Bee Keeping : मधमाश्‍यांच्या संवर्धनासाठी शंभर टक्के अनुदान

मधाचं आणि मधमाशीचं महत्त्व अधोरेखित करताना डॉ. कलाम म्हणतात - ‘‘आपल्या कामात मधासारखे गोड परिणाम मिळवायचे असतील तर मधमाशीसारखे वागा.’’ मधमाशी हा अतिशय उद्यमशील, शिस्तप्रिय, सामूहिक जीवन जगणारा व परोपकारी कीटक आहे. मधमाशीच्या वसाहतीमध्ये एक राणी, १०० ते २०० नर आणि प्रजातीनुसार २० ते ८० हजार कामकरी माश्या असतात. या सर्व मधमाश्यांनी कामाचे विभाजन अतिशय कल्पकतेने केलेले असते. मधमाशीपासून सहा मौल्यवान पदार्थ मिळत असले, तरी तिचा पिकांच्या परागीभवनासाठी होणारा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे. म्हणूनच आता शेतकऱ्यांकडून परागीभवन सेवेसाठी मधमाश्यांच्या वसाहतींची मागणी वाढत आहे.

उत्तर भारतामध्ये मधमाशीपालकांची व त्यांच्याकडील वसाहतींची संख्या महाराष्ट्राच्या मानाने खूपच जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये मोजकेच मधमाशीपालक असून फारच कमी वसाहती आहेत. राज्यामध्ये वर्षभर फुलोरा उपलब्ध होत नसल्यामुळे मधमाशीपालकांना आपल्या वसाहतीचं इतर राज्यांमध्ये स्थलांतर करावं लागतं. विशेषतः गुजरात, हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू- काश्मीर या राज्यांमध्ये वसाहतींचं स्थलांतर करणं भाग पडतं. उत्तर भारतातील मोहरीचं पीक आपल्या मधमाशीपालकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मोहरी पिकासाठीही मधमाश्या आवश्यक आहेत. त्यामुळे आपल्या मधमाशीपालकांची चांगली सोय होते. त्याचप्रमाणे धने, ओवा, लिची, निलगिरी, सफरचंद इत्यादी पिकांचा फुलोरा आपल्या राज्यातील मधमाशीपालकांना उपयोगी ठरतो.

हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला, तथापि कडधान्ये आणि तेलबिया यांच्या उत्पादनात फरक पडला नाही. सन १९८५ मध्ये केंद्र सरकारने तेलबिया मिशन आणि सन १९८७ मध्ये डाळी मिशन सुरू केले. तरीही आपण सध्या खाद्यतेल व डाळी आयात करीत आहोत. इंडोनेशिया व मलेशिया या देशांतून पामतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात होते. युक्रेन व रशिया या देशांतून आपण सूर्यफुलाच्या तेलाची आयात करीत आलो. सध्या या देशांतील युद्धामुळे तेथील आयात बंद झाली आहे. शेतकऱ्‍यांना सरकारने आवाहन केले तर ते कोणत्याही पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊ शकतात. तूर उत्पादनाचा महाराष्ट्रातील अनुभव आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला. तुरीचं प्रचंड उत्पादन घेतलं. परंतु त्याची खरेदी करून साठवण करण्यात शासन अपयशी ठरले. खाद्यतेल व डाळी यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आता मोहरी, सूर्यफूल, भुईमूग, करडई, खुरासणी, तीळ, जवस आदी तेलबिया व तूर, उडीद, मूग, मटकी, चवळी, हरभरा आदी कडधान्ये यांच्या लागवडीस महत्त्व देण्याची गरज आहे.

प्रत्येक गावात समविचारी शेतकऱ्‍यांच्या गटांची स्थापना करावी. प्रत्येक गटाने ५० ते १०० मधमाश्यांच्या वसाहती आणाव्या. त्यातील काही इटालियन मधमाश्यांच्या व काही सातेरी मधमाश्यांच्या असाव्यात. अन्नधान्ये पिकांबरोबरच वरील कडधान्ये व गळीतधान्ये पिकांची योग्य प्रमाणात लागवड करावी. तसेच आंबा, पेरू, शेवगा, आवळा, संत्रा, मोसंबी, लिंबू आदी फळझाडांची लागवड करावी. त्यामुळे मधमाशीच्या वसाहतींना वर्षभर फुलोरा उपलब्ध होईल. वसाहतींचे स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक गटाने एक-दोन तेलाचे लाकडी घाणे व एक-दोन लहान डाळ मिल खरेदी कराव्यात. घाण्याच्या तेलाला अलीकडे प्रचंड मागणी आहे. तेलात होणाऱ्या भेसळीमुळे घाण्याच्या तेलाची सहज विक्री होईल. त्याचप्रमाणे कडधान्ये न विकता त्यांच्या डाळी तयार करता येतील.

तेल व डाळी यांचं चांगलं ब्रॅण्डिंग करून शहरी ग्राहकांनाही आकर्षित करता येईल. अशिक्षित व अर्धवट शिक्षण घेतलेल्या तरुण- तरुणींना गावातच काम मिळेल. मध, मेण, परागकण, घाण्याचे तेल व डाळी यांच्यापासून चांगला आर्थिक फायदा होईल. मधमाश्यांच्या परागीभवनामुळे उत्पादनात भरीव वाढ मिळेल. त्याचप्रमाणे अन्नधान्ये व फळांच्या प्रतीमध्येही लक्षणीय सुधारणा होईल.
डॉ. बी. बी. पवार
मो.नं. ९९२२४१०८७५
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com