Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Satara News : सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट

खंडाळा तालुक्यातील पाडळी व बोरी परिसराला रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोराचा वारा आणि गारपिटीने झोडपले.

Team Agrowon

Satara Weather News : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला आहे. महाबळेश्‍वर, वाई, खंडाळा, माण तालुक्यांत काही ठिकाणी वादळी वारे, गारपिटीसह (Hailstorm) जोरदार पाऊस झाला आहे.

डाळिंब, टोमॅटो, मका, केळी, आंबा, घास, भेंडी, कांदा, गवार, ऊस आदी उन्हाळी पिकांना या गारपिटीने अक्षरशः झोडपल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत.

खंडाळा तालुक्यातील पाडळी व बोरी परिसराला रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोराचा वारा आणि गारपिटीने झोडपले.

शेतात व डोंगर परिसरात सर्वत्र सहा ते सात इंचांपर्यंत, तर सखल भागात गुडघ्यापर्यंत गारांचा खच पडल्याने येथे जणू मिनी काश्मीरच अवतरल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना आला.

दरम्यान, उन्हाळी पिकांना या गारपिटीने अक्षरशः झोडपल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत.

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील पाडळी, बोरी, सुखेड, कोपर्डे, हरळी, घाटदरे, भोसलेवाडी, धावडवाडी, अहिरे परिसरांत जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट व विजांच्या लखलखाटात जोरदार पाऊस झाला.

पाडळी व बोरी येथे तर गारांचा मोठा पाऊस झाला. पाडळी गाव गारांच्या पावसाचा केंद्रबिंदू होते.

शेतात व डोंगर परिसरात गारांचा खच पडल्याने येथील शिवारात जणू पांढरी शाल पांघरल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाई शहर व परिसरात विजेच्या कडकडाटात व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.

काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वाई तालुक्याच्या पश्‍चिम भागातही जोरदार पाऊस झाला. चिखली परिसरात गारांचा सडा पडला. ठिकठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले. पाचगणी शहर व परिसराला आज बेफाम पावसाने झोडपून काढले.

गारांचा वर्षाव, विजांचा कडकडाट, पाण्याचे लोट, ठिकठिकाणी झाडे पडणे यामुळे अक्षरशः नागरिकांची दाणादाण उडाली. या पावसाने आज स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले. पावसाने ग्रामीण भागातील स्ट्रॉबेरी पिकाचा शेवट झाला. स्ट्रॉबेरी शेतात गारांचा खच पडल्याने हे पीक संपले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना हा शेवटचा टप्पा पावसात संपल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. बेलोशी (ता. जावळी) येथील महादेव बेलोशे, नितीन गावडे, दिनकर बेलोशे, आनंदा कोंडीबा बेलोशे यांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. माण तालुक्यातील मलवडी परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वळवाने जोरदार तडाखा दिला.

यात कांदा उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कांद्यासोबतच मिरची, टोमॅटो, मका आदी पिकांची सुद्धा मोठी हानी झाली आहे. रविवारी दुपारी पुन्हा एकदा सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने या परिसराला झोडपून काढले. काही वेळातच सर्वत्र पाणी पाणी झाले. ओढे, नाले, ओघळ भरभरून वाहिले. मात्र या तडाख्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar | अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात, सरकारने लक्ष द्यावे- शरद पवार

Crop Advisory: कृषी सल्ला: कोकण विभाग

Trade War: व्यापारयुद्धात शेतकऱ्यांचे हित सांभाळा!

Agriculture Growth Rate: आकड्यांत अडकलेला विकास

Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी

SCROLL FOR NEXT