Rani Abbakka Agrowon
ताज्या बातम्या

पहिली भारतीय स्वातंत्र्य सेनानी : राणी अबक्का

Team Agrowon

मनीषा उगले

‘गॉन विथ द विंड’ या जगप्रसिद्ध सिनेमात एक संवाद आहे, या विश्‍वात जमीन अशी एकमेव गोष्ट आहे, की जिच्यासाठी काम केलं पाहिजे, लढलं पाहिजे आणि प्राण दिले पाहिजेत. कारण जमीन ही एकमेव गोष्ट अशी आहे, की ती शाश्‍वत राहते. या विचाराचं मूर्त रूप म्हणजे आजपर्यंत जगातील सर्वांत जास्त रक्तपात आणि युद्धे ही जमिनीच्या नावावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.

भूमीवरचा मालकी हक्क ही अशी गोष्ट आहे, की जी माणसाला त्याच्या अस्तित्वाचा ठळक पुरावा वाटतो. त्यामुळेच दुसरं कुणी हा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करतं, त्या वेळी तो प्राणपणानं आपल्या भूमीचं रक्षण करायला सज्ज होतो. म्हणूनच जेव्हा जेव्हा सर्वार्थाने संपन्न अशा हिंदुस्थानाचे लचके तोडण्याचा प्रयत्न सत्ताकांक्षी परकीयांनी केला, तेव्हा इथल्या भूमिपुत्रांनी त्यांना विरोध केला.

ब्रिटिशांविरोधातल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तर अजून कालपरवा घडल्याइतका ताजा आहे. पण या लढ्याची सुरुवात झाली होती ती फार आधी, सोळाव्या शतकात! या लढ्याची सेनापती, नव्हे नव्हे तर पहिली भारतीय स्वातंत्र्य सेनानी म्हणून जिचा अभिमानाने उल्लेख करता येईल त्या कर्नाटकची राणी अबक्का हिची ही गोष्ट आहे.

वास्को-द-गामाच्या मागोमाग असंख्य पोर्तुगीज जहाजांनी कालिकत बंदरात नांगर टाकला आणि भारत पोर्तुगाल व्यापाराचा एक नवा अध्याय सुरू झाला. हे व्यापारी दक्षिण भारतातून मसाल्याच्या पिकांची निर्यात अरब राष्ट्रांना करत आणि त्या बदल्यात प्रचंड सोनं कमवत. गोवा, मंगलूर आणि तुलूनाडू या व्यापारी केंद्रांचं पोर्तुगिजांना प्रचंड आकर्षण होतं. यांपैकी तुलूनाडू राज्याची गादी चालवत होती राणी अबक्का. दिगंबर जैनपंथीय चौटा वंशातला तिचा जन्म.

पुढे या साम्राज्याचं विभाजन होऊन तुलनाडू हे उल्लाल या राजधानीसह स्वतंत्र राज्य निर्माण झालं. त्याचा कारभार राणी अबक्का पाहू लागली. राणी अबक्का युद्धशास्त्रांमध्ये निष्णात होती. तिचा विवाह मंगलोरच्या बंग साम्राज्याचे राजे लक्ष्मप्पा यांच्याशी झाला. परंतु हा विवाह फार काळ टिकला नाही.

असं म्हणतात, की लक्ष्मप्पा यांनी पोर्तुगिजांना त्यांची सत्ता वाढवण्यासाठी मदत करण्याचं आश्‍वासन दिलं होतं. राणी अबक्काने या गोष्टीचा निषेध म्हणून आपलं स्त्रीधन पतीकडे परत पाठवलं आणि ती पुन्हा उल्लाल येथे निघून गेली. या घटनेमुळे लक्ष्मप्पा याचा अहंकार फार दुखावला. याचा बदला म्हणून त्याने पुढे अबक्काच्या विरोधात पोर्तुगिजांना मदत केली.

१५१० मध्ये पोर्तुगिजांनी गोवा जिंकला. त्यापाठोपाठ मंगलोर हे ठाणं जिंकून घेतलं. पण पोर्तुगिजांची खरी नजर उल्लाल वर होती. कारण उल्लाल ही उत्तम दर्जाच्या मसाल्याच्या पदार्थांची महत्त्वाची बाजारपेठ होती. पण उल्लालवर कब्जा मिळवणं पोर्तुगिजांना वाटलं तेवढं सोपं नव्हतं. राणी अबक्का हिने पोर्तुगिजांना जोरदार विरोध करत पोर्तुगिजांना अक्षरशः पळता भुई थोडी केली होती.

युद्धामध्ये अग्निबाण वापरणारी ती अखेरची योद्धा होती, असं मानलं जातं. तेलात भिजवलेल्या नारळाच्या पानांपासून हे अग्निबाण तयार केले जात, ते फार दूरचा पल्ला गाठू शकत. त्यांचा वापर राणीने समुद्रातील शत्रूच्या जहाजांना टिपण्यासाठी केला. सुमारे दहा वर्षे पोर्तुगीज उल्लालचा पाडाव करण्यासाठी झुंजत होते. परंतु त्यांना त्यात यश येत नव्हतं.

१५५७ पर्यंत पोर्तुगिजांनी उल्लालवर चार वेळा आक्रमण केलं, परंतु चारही वेळा राणीच्या सैन्याने पोर्तुगिजांना पाणी पाजलं! १५६८ चा हल्ला करताना मात्र पोर्तुगिजांनी कूटनीतीचा वापर केला. राणीचा पती लक्ष्मप्पा हा पोर्तुगिजांना आधीच जाऊन मिळाला होता. राणीवरच्या रागाचा बदला घेण्यासाठी त्याने पोर्तुगिजांना राणीच्या विरोधात काही गुप्त माहिती पुरवली, तिचा वापर करून पोर्तुगीज थेट अबक्काच्या राजदरबारात घुसले.

पण त्या वेळी त्यांना राणी तिथे सापडली नाही. आपल्याला भिऊन राणी पळून गेली आहे असं समजून पोर्तुगिजांनी जल्लोष सुरू केला. मात्र त्या वेळी राणी एका मशिदीत दबा धरून बसली होती. रात्रीच्या वेळी निवडक २०० सैनिकांसह तिने बेसावध पोर्तुगीज सैन्यावर जोरदार हल्ला केला. या लढाईत पोर्तुगिजांचे बरेच सैनिक मारले गेले. त्यांचा जनरलही राणीच्या हातून ठार झाला. उरलेले पोर्तुगीज सैनिक जीव मुठीत धरून पळून गेले.

१५७० मध्ये अहमदनगरचा सुलतान आणि कालिकतचा झामोरिअन यांच्याशी हातमिळवणी केली. त्याच्या सोबतीने पोर्तुगिजांशी लढणं राणीला सोपं गेलं. पण अखेरीस पतीच्या विश्‍वासघातामुळे राणी पोर्तुगिजांच्या ताब्यात सापडली. त्यांनी तिला अटक केली. कैदेत असतानासुद्धा राणीने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सुटकेसाठी शर्थीने झुंज देत असतानाच राणी शहीद झाली.

राणी अबक्का यांचं नाव अनेकांना माहिती नसलं, तरी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं पहिलं पान लिहिणाऱ्या असामान्य योद्धा म्हणून त्यांचं कार्य मोलाचं आहे. कर्नाटकातील यक्षगान या नृत्यशैलीतून तसंच पारंपरिक ‘कोला’ नृत्यातून (अलीकडेच कांतारा सिनेमात आपण बघितलेलं नृत्य) राणी अबक्का हिच्या पराक्रमाच्या गोष्टी तुलू भाषक प्रदेशांत आजही सांगितल्या जातात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil Rate : तीस लाख टन साठा संपेपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नका

Vasantdada Sugar : ‘वसंतदादा शुगर’च्या धर्तीवर चालणार सिट्रस इस्टेटचा कारभार

Shwetkranti 2.0 : केंद्रीय मंत्री शहांच्या हस्ते ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ

Bioenergy Production : जैवऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा फसला

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

SCROLL FOR NEXT