जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Dairy Election) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे आव्हान आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadase) मोडून काढतील, असे बोलले जात आहे. निवडणुकीवरील स्थगिती उठविली असून, १० डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांची जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत युती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेल आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत खऱ्या अर्थाने ‘राजकीय’ वर्चस्वाची लढाई होत आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय लढाई सुरू आहे. दूध संघात एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार घेतला. मात्र, त्यावर खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयाने प्रशासक मंडळ अवैध ठरवून संचालक मंडळाकडेच कारभार दिला. मात्र, प्रशासकपदाचा कारभार हाताशी असताना, मंगेश चव्हाण यांनी संघातील माहिती घेऊन संघात अखाद्य तूप व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. मात्र, याप्रकरणी खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने आरोप फेटाळून लावला व ही चोरी झाली आहे.
याप्रकरणी कार्यकारी संचालकाच्या माध्यमातून पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. मात्र, फिर्याद घेण्यात आली नाही. त्यासाठी खडसे यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलनही केले. त्यानंतर भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी कार्यकारी संचालकासह काही जणांना अटक केली आहे.
तिसऱ्या लढाईची रंगत
दूध संघ निवडणुकीअगोदर ही पहिली राजकीय लढाई दूध संघात सुरू झाली. संघात दुसरी लढाई राज्यातील सत्ताधारी व विरोधी गटाच्या प्रशासकीय डावपेचांची लढाई झाली. आता तिसरी राजकीय लढाई सुरू झाली असून, आता रंगत वाढणार आहे. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकारचे सहकार पॅनेल आहे, तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेल आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.