मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
Tomato Nashik Market : नाशिक : उन्हाळी हंगामात (Summer Season) मागील वर्षीप्रमाणे दर साधून दोन पैसे होतील म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी केल्या.
मात्र जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक (Tomato Producer) दर नसल्याने अडचणीत सापडले आहेत. ऐन उन्हाळ्यात मेमध्ये माल काढणीसाठी आला. मात्र २ ते ५ रुपये दर मिळू लागला. त्यामुळे माल बाजारात नेणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी खुडे थांबविल्याची स्थिती आहे.
परिणामी आता शिवारातच टोमॅटोचा लाल चिखल झाल्याची भीषण परिस्थिती आहे.
दरम्यान, आता दरात सुधारणा होत असली तरी शेतकऱ्यांकडे माल नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
गेल्या खरीप हंगामातही नोव्हेंबरमध्ये टोमॅटोची लाली कमी झाली. त्यावेळी २ ते ४ रुपये किलोप्रमाणे टोमॅटो विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.
तर आता पुन्हा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी मे महिन्यात सुरवातीला प्रतिक्विंटल २ ते ३ हजार रुपये दर निघत होते. हेच दर मेनंतर ३ हजार रुपयांवर गेल्याने दराने उसळी घेतली होती.
मात्र यंदा मे महिन्यात २०० ते ७०० रुपयांपर्यंत दर मिळाले. नंतर वाढ झाली ती नावापुरतीच. आता मागील सप्ताहापासून दरात सुधारणा होऊन ते १७५० रुपयांपर्यंत गेले आहेत. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दराचा लाभ मिळालाच नसल्याची स्थिती आहे.
लागवडपश्चात फळ तोडणी सुरू असताना टोमॅटो बाजारात न्यायला सुद्धा परवडत नसल्याने उद्विग्न शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या उभ्या पिकात जनावरे चरायला सोडली आहेत.
तर काही शेतकऱ्यांनी नाशिक बाजार समितीच्या पेठ रोडवरील आवाराच्या प्रवेशद्वारावरच टोमॅटो ओतून संताप व्यक्त केला. त्यामुळे लाल चिखल झाल्याचे पाहायला मिळाले.
तर काही शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतून रास्ता रोको आंदोलन केले. तर आता खुडेच थांबल्याने लाल चिखल शिवारात पाहायला मिळत आहे.
अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ
टोमॅटोच्या एका क्रेटला बाजारात नेण्यासाठी तोडणी, हाताळणी, प्रतवारी व वाहतूक खर्च असा ६० ते ७० रुपये खर्च आहे. मात्र दराचे गणित जुळत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडी तशाच ठेवल्या. अनेकांनी खुडे थांबविले.
त्याने लागवडीकडे लक्ष न दिल्याने आता फक्त शिवारात पिकाचे अवशेष दिसत आहेत. एकीकडे खरिपाची लगबग सुरू आहे.
मात्र शेतकऱ्यांना या लागवडीच्या तारा, बांबू काढण्याची सुद्धा इच्छा उरलेली नाही. त्यामुळे शिवार टोमॅटोच्या सोबत तसाच आहे. त्यामुळे अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
नाशिक बाजार समितीत गेल्या तीन महिन्यातील स्थिती
महिना...आवक (क्विंटल)...मिळालेला सरासरी दर (रुपये)
मार्च...२ लाख २४ हजार ९१३...५००
एप्रिल...४६ हजार ६२०...१,२००
मे...३१ हजार१७४...१२००
टोमॅटोची दोन एकर लागवड केली. मात्र यंदा हंगाम भयानक गेला आहे. २ लाख खर्च करून २ रुपये सुद्धा भेटले नाहीत. टोमॅटोची ही शोकांतिका गेल्या २ महिन्यापासून चालू आहे. बळीराजा आर्थिक संकटातून कसा वरती येईल. ६० टन टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे.
- अमृत कापडणीस, टोमॅटो उत्पादक, आसखेडा, ता. सटाणा, जि. नाशिक.
क्रेट तोडणीला ३० रुपये मजुरी तर बाजारात नेण्यासाठी वाहतूक ५० रुपये असा खर्च येत असताना त्याखाली परतावा मिळत आहे. त्यामुळे मे महिन्यात तोडणी थांबविली होती. आता दरात सुधारणा आहे. मात्र लागवडी आता खराब झाल्या आहेत. त्यामुळे टोमॅटो शेतातच तोडणीविना खराब झाला. परिसरात ९० टक्के शेतकऱ्यांनी माल सोडून दिला.
- रोहिदास जाधव, टोमॅटो उत्पादक, अंतापूर, ता. सटाणा, जि.
नाशिक.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.