Bogus Seed Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seed Act : बनावट निविष्ठांबाबतची विधेयके संयुक्त समितीकडे

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Mumbai : शेतकऱ्यांना बनावट खते, बियाणे, कीटकनाशके आदी निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असून, एक लाखापर्यंतचा दंड आणि कारावासाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

तसेच खतांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याचेही कायद्यात प्रस्तावित आहे. याबाबत शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर त्यास नुकसानभरपाई देण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे.

मात्र ही विधेयके अधिक चिकित्सेसाठी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले. त्यामुळे यासंदर्भातील कायद्याची मंजुरी आणि अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पाच विधेयके आणून ती संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याने यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामांत बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीला बसणारा चाप तूर्त टळला आहे.

कृषिमंत्री मुंडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत चार विधेयके मांडली. यातील भेसळयुक्त, अप्रमाणित आणि गैरछापाची बियाणे विक्री केल्यानंतर नुकसानभरपाईसाठी अत्यावश्यक वस्तू अधिनियमाखाली कारवाई करण्यासाठी सुधारणा विधेयक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले.

महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर, आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक उदय सामंत यांनी सादर केले.

राज्यात गैरछापाची, भेसळयुक्त आणि अप्रमाणित खते, कीटकनाशके आणि बियाण्यांकरिता बियाणे अधिनियम १९६६, कीटकनाशक अधिनियम १९६८ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ यांमध्ये सौम्य शिक्षेची तरतूद असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. तसेच कारवाई करण्याच्या अधिकारासंदर्भात स्पष्टता नव्हती. त्यामुळे बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी आता कारावास आणि मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

या विधेयकांतील तरतुदी अशा

खते

जर कोणतीही व्यक्ती सेंद्रिय, असेंद्रिय आणि मिश्र खते नियंत्रण आदेश १९८५ च्या खंड १९ च्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करीत असेल, तर त्या व्यक्तीला कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंतचा कारावास किंवा कमीत कमी २५ हजार आणि जास्तीत जास्त एक लाखापर्यंत दंड करण्यात येईल.

तसेच याप्रकरणी दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्ती न्यायालयात दोषी ठरल्यास त्याच्या विक्री व्यवसायावर कायमची बंदी घालण्यात येणार आहे.

बियाणे

विद्यमान कायद्यानुसार बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना पाचशे रुपये आणि दुसऱ्या अपराधाकरिता एक हजार रुपये दंड किंवा सहा महिने कारावास अशी तरतूद होती. त्यामुळे यात बदल करून बोगस बियाणे विक्रीच्या पहिल्या अपराधाकरिता कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा कमीत कमी १० हजार आणि जास्तीत जास्त ५० हजार रुपये किंवा दोन्ही शिक्षेस संबंधित व्यक्ती पात्र असेल.

दुसऱ्या अपराधाकरिता कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंतचा कारावास किंवा कमीत कमी २५ हजार आणि जास्तीत जास्त एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. तसेच या दोन्ही शिक्षा एकत्र देण्याची तरतूदही केली आहे.

कीटकनाशके ः

बोगस कीटकनाशकांची व्याख्या स्पष्ट करत त्यांच्या विक्री, साठवणूक आणि वितरण या संकल्पना स्पष्ट करत कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद केली आहे.

नोंदणी प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही कीटकनाशकाची आयात किंवा निर्मिती केल्यास, लायसन्स नसतानाही कीटकनाशकांची निर्मिती किंवा आयात केल्यास, साठवणूक, वितरण केल्यास किंवा कीटकनाशकीय निरीक्षकांना कारवाईस अडथळा आणल्यास पहिल्या अपराधाकरिता दोन वर्षे, तर दुसऱ्या अपराधास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा कमीत कमी १० हजार, तर जास्तीत जास्त ५० हजार, तर तिसऱ्या अपराधास कमीत कमी १५ हजार रुपये आणि जास्तीत जास्त ७५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

तसेच कायद्यातील कुठल्याही नियमाचे उल्लंघन करेल त्याला कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच कमीत कमी सहा महिन्यांच्या कारावासाची तरतूद केली आहे.

लायसन्सचे उल्लंघन केल्यास...

कीटकनाशक विक्रीबाबत लायसन्सचे उल्लंघन केल्यास कमीत कमी एक वर्ष शिक्षा आणि पाच ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड, तसेच दुसऱ्या गुन्ह्यासाठी दोन वर्षे शिक्षा, तर १० ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोन्ही शिक्षांना संबंधित व्यक्ती पात्र असेल. गैरछापाची खते, बियाणे, कीटकनाशके म्हणजे...

ज्या नावाखाली पाकिट विकले जात असेल त्या बियाण्यांच्या वाणाऐवजी अन्य वाण

फसवणूक होण्याचा शक्यता असेल अशा रीतीने त्या वाणास सदृश नाव दिले असेल आणि त्याचे खरे स्वरूप दर्शविता यावे म्हणून त्यावर स्पष्टपणे लेबल लावलेला नसेल तर नामसाधर्म्याने खते, बियाणे, कीटकनाशक विकणे

लेबलवर बीज अंकुरणाच्या व शुद्धतेच्या किमान मर्यादा ठळकपणे व अचूक न लिहिणे

वेष्टणावरील लेबलवर बियाण्यांची गुणवत्ता, वाण याबाबत महत्त्वाच्या तपशिलाबाबत खोटे दिशाभूल करणारे संकल्पचित्र, विवरण अथवा आवेष्टन असेल तर व्यापाऱ्याचा नोंदणी क्रमांक नसेल अथवा खोटा असेल तर

माणूस, वनस्पती किंवा प्राण्यांना इजा टाळण्यासंदर्भातील

लेबलवर वाणाचा व्यापारी म्हणून कपोलकल्पित व्यक्तीचे किंवा कंपनीचे नाव असेल तर उत्पादकाने दावा केलेल्या मानकांची पूर्तता करीत नाहीत अशी बियाणे, खते आणि कीटकनाशके

नुकसानभरपाई मिळणार

शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे, खते, कीटकनाशके भेसळयुक्त, अप्रमाणित, गैरछापाची असल्यास त्यांना नुकसानभरपाई मिळविता येण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. बीज अंकुरण टक्केवारीपेक्षा कमी असेल, अधिक प्रमाणात कीड व रोगाची लागण होणे, कृषिक्षेत्राच्या किंवा प्रदेशाबाहेरच्या बियाण्यांची विक्री होणे, भेसळयुक्त, अप्रमाणित किंवा गैरछापाच्या बियाण्यांची विक्री करणे, बीज अंकुरण, कीड व रोग प्रतिरोधक व सहनक्षम, जनुकीय शुद्धता यांच्या बाबतीत आवेष्टनावर छापलेल्या अतिरिक्त दाव्यांची पूर्तता न करणे आदींबाबत नुकसानभरपाई दावा करता येऊ शकतो. आवेष्टणावर केलेल्या दाव्याचे अनुपालन न करणाऱ्या खताची विक्री करणे, खताची, कीटकनाशकता वनस्पती विषकारकता निर्माण होणे याबाबतही नुकसानभरपाई मिळविता येण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत २० दिवसांच्या आत तक्रार दाखल करता येणार आहे. खते आणि कीटकनाशकांबाबत ४८ तासांत तक्रार करता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT