Ujani Dam Water Storage : जुलैचा अर्धा महिना संपला तरीही रुसलेला वरुणराजा बरसण्यास तयार नसल्याने आता पोशिंद्यावर दुष्काळाचे ढग दाटू लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूने उजनी जलाशयाचा पाणीसाठा उणे ३४ टक्क्यांवर आला आहे.
त्यामुळे भर पावसाळ्यात नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. हवामान खात्याच्या भरवशावर बसलेल्या आणि पूर्वनियोजन न करता उशिरा जागी झालेली प्रशासकीय व्यवस्था यामुळे आता उजनीचा पाणीसाठा राखीव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुणे, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांना उजनी धरण वरदान ठरले आहे. या उजनीवर पाण्याच्या जेवढ्या योजना आहेत त्यापेक्षा अधिक शेती व औद्योगीकरण अवलंबून आहे. गेल्या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले.
मात्र मार्च ते जुलै या पाच महिन्यांतच उजनीचा पाणीसाठा मायनस ३४.५४ टक्क्यांवर जाऊन पोचला आहे. उजनीच्या पाणी वापरावर मर्यादाच नसल्याने दरवर्षी खऱ्या धरणग्रस्तांना पाण्यासाठी टाहो फोडावाच लागतो. यावर्षी तर उजनीची परिस्थिती फारच बिकट बनली आहे.
आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
धरणग्रस्तांना उजनीच्या पाण्याचा मोठा आधार असतो; मात्र पाणलोट क्षेत्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. पळसदेव व टाकळी, केत्तूर, पारेवाडी भागापासून खालच्या भागात आता पाणी सरकले आहे.
आता उजनी मायनस ३४.५४ वर आल्याने व पाऊस साथ देत नसल्याने भविष्यात पाण्याचे मोठे संकट घोंगावताना दिसत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने आता शेती आणि औद्योगीकरणाचा पाणीपुरवठा बंद करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.
साहजिकच उजनीवर अवलंबून असलेला शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. असे असले तरी अजूनही औद्योगीकरण क्षेत्र पाणी वापरत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. संभाव्य पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन औद्योगीकरणासाठी पाणी उचलण्यावर तत्काळ बंदी घालणे अतिशय गरजेचे बनले आहे. सध्या पुणे खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाचा जोर नसल्याने ही धरणे खालावलेल्या अवस्थेत आहेत.
गेली सलग दोन-तीन वर्षे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने यावर्षी पाण्याचे कसलेही नियोजन झाले नाही. त्यातच उजनीतून सोलापूरसाठी नदीद्वारे व इतर कारणास्तव सहा पाळ्यांमध्ये पाणी सोडण्यात आल्याने जवळपास ४२ टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला आहे. यापुढे मृत साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या कारणावरून उजनी लाभक्षेत्रातील वीज कपात केली तर मोठे जनआंदोलन केले जाईल. केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे उजनीच्या पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.- शिवाजीराव बंडगर, अध्यक्ष, धरणग्रस्त समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.