Dam Water
Dam Water Agrowon

Dam Water Level : धरणांत ३० टीएमसी पाण्याची आवक

Pune Rain Update : राज्यात मॉन्सून दाखल होऊन जवळपास आठ दिवस उलटले आहेत. या काळात पश्चिम घाटमाथ्यावर व पूर्व विदर्भात पाऊस झाल्याने धरणांत आवक सुरू झाली आहे.

Pune Monsoon News : राज्यात मॉन्सून दाखल होऊन जवळपास आठ दिवस उलटले आहेत. या काळात पश्चिम घाटमाथ्यावर व पूर्व विदर्भात पाऊस झाल्याने धरणांत आवक सुरू झाली आहे. मागील दहा दिवसांत नव्याने एकूण ३० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. यामध्ये पुणे विभागातील धरणांत सर्वाधिक १२ टीएमसी, नागपूर विभागातील धरणांत दहा टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास पाणीसाठा वाढण्यास मदत होईल.

यंदा जून महिन्यात ऐन पावसाळ्यात सुमारे ३६ हून अधिक धरणे कोरडी पडल्याचे चित्र होते. राज्यातील काही धरणक्षेत्रात पावसाचा जोर होता. मात्र, अजूनही अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षाच लागून राहिली आहे. परंतु २५-२६ जूनपासून पावसाचा जोर काहीसा वाढला. आतापर्यंत काही धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडला असला तरी बहुतांश धरणक्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही.

Dam Water
Radhanagari Dam Water Storage : राधानगरीतील धरणांत महिनाभर पुरेल इतका साठा

जलसंपदा विभागाकडे लहान, मध्यम व मोठे असे एकूण तब्बल दोन हजार ९८९ प्रकल्प आहे. या प्रकल्पाची उपलब्ध पाण्याची क्षमता ही सुमारे १४२२.१२ टीएमसी एवढी आहे. यंदा २६ जूनपर्यंत या धरणांत अवघा ३१८ टीएमसी म्हणजेच सरासरी २२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात पाट टक्केने घट झाली असल्याची स्थिती तयार झाली होती.

त्यामुळे धरणक्षेत्रात पावसाच्या जोरदार पावसाची आवश्यकता होती. त्यातच राज्यात २३ जूनपासून राज्यातील वातावरणात वेगाने बदल झाल्यानंतर पावसास सुरुवात झाली. सुरुवातीच्या दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कमी होता. त्यानंतर पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला.

सध्या १ जून ते ३ जुलै या काळात राज्यातील एकूण प्रकल्पामध्ये सुमारे ३४८.२१ टीएमसी (९८६३.२३ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच सरासरी २४.४९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात २८.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

मागील दहा दिवसांपासून राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी कमीअधिक स्वरूपाचा पाऊस पडला. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे कोकण, नागपूर आणि पुणे या विभागातील धरणांतील पाण्याची वाढ झाली असून छत्रपती संभाजीनगर, नाशिक या विभागातील पाण्यासाठ्यात किंचित घट झाली आहे.

मोठ्या प्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा

राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३९ मोठी धरणे आहेत. मागील दहा दिवसांपूर्वी या मोठ्या धरणांत पाणीसाठा २२९ टीएमसी म्हणजेच सरासरी २२ टक्के उपलब्ध होता.

त्यानंतर त्यामध्ये तब्बल २६ टीएमसीपर्यंत वाढ झाली असून सध्या २५५.५० टीएमसी एवढा झाला असून सरासरी २४.९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी या प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी मोठी घट झाली आहे.

Dam Water
Dam Water Stock : धरणांत पाण्याची आवक सुरू

मध्यम, लघू प्रकल्पांत पाणीसाठा कमीच

यंदा मध्यम व लघू प्रकल्पांत पावसाचे प्रमाण कमीअधिक राहिले. त्यामुळे काही धरणांत अजूनही पाण्याची आवक सुरू झालेली नाही. सध्या मध्यम असलेल्या २६० प्रकल्पांत ५७.४० टीएमसी म्हणजेच २९.९४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या धरणांत ३२ टीएमसी पाणीसाठा होता. लघू असलेल्या २५९० प्रकल्पांमध्ये ३५.३० टीएमसी म्हणजेच १७ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या धरणांत १८ टक्के एवढा पाणीसाठा होता.

विभागनिहाय धरणातील पाणीसाठा (टीमसीमध्ये)

विभाग ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के

अमरावती -- २५९ --- ४६.९२ --- ३५.४८

छत्रपती संभाजीनगर -- ९१९ --- ६२.३० -- २४.६४

कोकण --- १७३ --- ४५.३० --- ३६.४१

नागपूर --- ३८३ -- ७०.७९ --- ४३.५४

नाशिक --- ५३५ -- ५१.५२ -- २४.६०

पुणे --- ७२० -- ७१.३५ -- १३.३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com