Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नुकसानीमुळे दिवाळीची तयारी फिकी

Raj Chougule

कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक गावांनी उसाबरोबरच खरीप पिकाची (Kharif Crop) चांगलीच प्रगती केली. हातकणंगले तालुकाही अशा प्रगतिशील गावांचा एक तालुका. गेल्या आठ दिवसांत झालेल्या पावसाने हा तालुका हादरून गेलाय. सोयाबीन (Soybean), भुईमूग व भाताचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले. तालुक्यात अतिवृष्टी (Heavy Rain) पेक्षा जास्त म्हणजे १०० मिलिमीटर पर्यंतचा पाऊस काही गावांत झाला आणि याचा दणका खरिपाला बसला.

दुपारनंतर काळे ढग जमू लागले की पोटात भीतीचा गोळा उठतो. इतर वेळी वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने आता मात्र खरीप पिकांची वाट लावली आहे. बांध फोडून पाटापाटातून पळणारे पाणी आणि त्यातून खरीप पिके वाहून जाणारे चित्र डोळ्यात अश्रू आणते. त्यामुळे दिवाळीची तयारी फिकी पडल्याचे चित्र गावोगावी आहे.

तालुक्यातील रूकडी, मजले घुणकी, किणी या भागानांही जोरदार पावसाने सलग झोडपले. ठरवून वेळापत्रकाप्रमाणे आलेल्या पावसाने पिकांची वाताहत केली. भात हे पीक अति पाण्याचे. पाणी जास्त झाले तरी भाताला फारसा फरक पडत नाही. पण अति पाणी आणि वाऱ्यामुळे भातच पाण्यात कोलमडून पडले.

पाण्याच्या लोटाने अक्षरशः दणकट भाताची वाताहात केली. या पाण्यामुळे कोवळ्या आडसाली ऊस लागवडी ही धाराशाही झाल्या. काही शेतामध्ये तर केवळ पिकांचे अवशेष असलेल्या खुणा दिसतात. थोडे पाणी ओसरूपर्यंत परत दुसऱ्या दिवशी पाऊस पडतो आणि पुन्हा शेतीचे तळे होते. हे चक्र थांबणार कधी? याचे उत्तर मातब्बर शेतकऱ्यांपुढेही नाही.

अजून काही शिवारे पाण्याखाली आहेत. पाऊस पूर्ण थांबल्यानंतरच नुकसानीची विदारकता सामोर येणार आहे. हजारो रुपये खर्च करून सोन्यासारखी पिके आणलेल्या शेतकऱ्यांपुढे आता पदरचे पैसे घालून शेतातील कचरा बाजूला करण्याची वेळ आली आहे. आता यासाठीही त्याच्याकडे आर्थिक तरतूद नाही हे भयाण वास्तव आहे. हातात पैसाच नाही तर शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करायची? असा सवाल अनेक गावांतील शेतकऱ्यांचा आहे. काही शेतकऱ्यांनी शेताकडे जाणेच टाळले आहे.

घुणकी येथील साजिद पठाण म्हणाले,‘‘सात एकर क्षेत्रात भात केला. सुरुवातीला वादळामुळे तो आडवा झाला. नुकसान टाळण्यासाठी दोन दिवसांतच मशिनने मळणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण इथेही पावसाने पिच्छा सोडला नाही. आता सात एकरांत पाणी साचले आहे. बियाणे व खतांसाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च आला. हा खर्च काढायचा कसा?’’

पठाण यांच्या बरोबरच बाबासो परीट, दशरथ बोणे, सुधीर पाटील, शब्बीर पठाण आधी शेतकरी ही खरीप पिकाच्या नुकसानीत होरपळले आहेत. ‘‘सकाळी शेतात जाऊन कापणीचे नियोजन करण्याचा विचार येतो. संध्याकाळी कापणीचे नियोजन करण्याचे वेळापत्रक करत असतानाच अचानक पाऊस येतो आणि सर्व नियोजन ही धुवून जाते. आठ दिवसापासून असाच क्रम सुरू आहे,’’ असे खोचीतील विजय पाटील म्हणाले.

कसली दिवाळी अन् कसले काय?

सोयाबीन भुईमूग, भात विकून काही पैसे दिवाळीच्या खर्चाला उरतील, या आशेला आता सुरुंग लागला आहे. अनेकांना तर यंदा घरातल्यांच्या आनंदासाठी उदार उसनवारीवरच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. दररोज संध्याकाळी पडणारा जोरदार पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी नव्हे तर दिवाळे निघाले आहे. दिवाळीचा आनंद ही केवळ औपचारिकता उरली आहे.

ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा पीक विमाधारकांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी विमा कंपनी आणि कृषी विभागाने संयुक्तपणे केली आहे. तसेच ऑक्टोबरमधील नुकसान झालेल्या क्षेत्राची पूर्वसूचना विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकवर दिली आहे.
संतोष पाटील, कृषी सहायक.
यंदा अक्षरशः हतबल झालो आहोत. सुरुवातीला कमी पाऊस झाला म्हणून पाणी देऊन सोयाबीन जगवले. मध्यंतरी रोग आला म्हणून महागडी औषधे फवारणी केली. आणि आता पावसाचे पाणी पिकांतून हटण्यास तयार नाही. आता करायचे तरी काय?
विजय पाटील, खोची, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT