Soybean Rate : सोयाबीन दरवाढीच्या मार्गात खाचखळगे

खाद्यतेल आयातखर्चात होणाऱ्या सात-आठ टक्के वाढीपैकी पाच टक्के जरी सोयाबीनमध्ये प्रतिबिंबित झाली तर डिसेंबरअखेर सोयाबीन ६,००० रुपयांच्या आसपास जायला हरकत नाही. तरी सुद्धा प्रत्यक्ष पुरवठ्यापेक्षा पुरवठ्याविषयी असलेले अंदाज सेंटीमेंट निर्माण करतात. त्यामुळे भारतात सोयाबीनला ५८००-६,००० रुपयांवर अडथळा जाणवेल. तो पार केल्यावर सुद्धा ६,२०० रुपयांचा मोठा अडथळा असेल. एकंदरीत पाहता सोयाबीनमधील दरवाढीचा मार्ग मागील दोन वर्षांएवढा सुकर नसेल. प्रत्येक दरवाढीनंतर करेक्शन येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीन विकत राहणे योग्य ठरेल.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

तांत्रिकदृष्ट्या सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) या महिन्याच्या सुरवातीला सुरु झाला असला तरी मुख्य हंगाम महिन्याअखेरीस किंवा त्यानंतरच सुरु होईल. याचे कारण म्हणजे या महिन्यामध्ये सतत चालू असलेला पाऊस (Rainfall). बरे हा पाऊसदेखील साधासुधा नाही तर अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य (Rain Like Cloudburst) आणि वादळी पाऊस झाला. त्यामुळे त्या भागांत पिकाचे तीन-तेरा (Soybean Crop Damage) झाले आहेत. ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी अजून पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीनही प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. या परिस्थितीमध्ये जेथे शक्य आहे तेथे लवकर काढणी करावी लागणे, त्यातून दर्जावर परिणाम आणि त्यामुळे दर तफावत या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. काहींचे अगदी हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे तर उशिरा लागवड केलेले अनेक शेतकरी अजून सुपात आहेत. हंगामाच्या सुरवातीलाच हे हाल असल्याने बाजारात गोंधळाची परिस्थिती आहे. मध्य प्रदेशातील लहान शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३,७०० ते ४,००० रुपयांत आपले सोयाबीन विकावे लागले तर महाराष्ट्रातदेखील सुरवातीच्या काळात ‘पॅनिक सेलिंग' होऊन शेतकऱ्यांना ४,३०० ते ४,५०० रुपये एवढाच भाव मिळाला.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रचंड प्रमाणात झालेली खाद्यतेल आयात हेदेखील या घसरणीमागचे प्रमुख कारण होते. परंतु त्याच काळात ‘सोपा'सारख्या व्यापारी (प्रक्रिया व्यावसायिक) संघटनेने सोयाबीन वायद्यांविरोधात घेतलेली भूमिका देखील बाजारात उगाचच घबराट निर्माण करून गेली. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान झाले, या गोष्टीकडे कानाडोळा करता येत नाही.

Soybean Rate
Soybean Rate : सोयाबीनचे दर वाढतील का?

आठवड्यापूर्वी इंदूर येथे सोपाची परिषद पार पडली. त्यामध्ये सोयाबीनच्या पीक उत्पादनाचा अंदाज सादर करण्यात आला. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणेच यंदाही सोयाबीन उत्पादन १२० लाख टन असे खूपच आश्वासक दाखवले गेले आहे. हे अनुमान साधारण सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंतच्या परिस्थितीवर आधारित असावे. नेमके यानंतरच्या कालावधीमध्ये पावसाने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. राजस्थानमधील कोटा आणि बुंदी, महाराष्ट्रात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भाग तर मध्यप्रदेशमधील सोयाबीन बहुल बहुतेक सर्वच तालुके जोरदार पावसामुळे बाधित झालेले आहेत.

पीक नुकसानीचे पंचनामे आणि सरकारी अंदाज पुढील काही दिवसांत प्रसिद्ध होतीलच. परंतु या प्रांतांतील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोयाबीन पिकामध्ये १५ ते २० टक्के घट अपेक्षित आहे. या अंदाजाप्रमाणे देशातील सोयाबीनच्या एकंदर उत्पादनात या घडीला किमान १० टक्के घट अपेक्षित आहे.

Soybean Rate
Soybean Rate : पावसामुळे सोयाबीन बाजाराचे चित्र बदलणार

आपल्याला आठवत असेल की नेमकी अशीच परिस्थिती २०२० आणि २०२१ या वर्षातही होती. आणि या दोन्ही हंगामांमध्ये अखेर सोयाबीन बाजारात काय झाले तेही आपल्यासमोर आहे. या दोन वर्षांप्रमाणेच २०२२ मध्ये देखील ला-नीना हा हवामानाचा पॅटर्न राहील असे अंदाज व्यक्त केले गेले आहेत. त्या अनुषंगाने मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदाही नोव्हेंबरपर्यंत पावसाळा लांबू शकतो, हेदेखील कुठेतरी गृहीत धरावे लागेल. असे झाले तर सध्या १० टक्के वाटणारी उत्पादन घट १५-२० टक्क्यांवर देखील जाऊ शकेल.

अर्थात या ‘जर-तर' च्या गोष्टी असल्या तरी परत एकदा सोपाचेच मागील अंदाज असे सांगतात की २०२० आणि २०२१ मध्ये परतीच्या पावसामुळे ५ ते १० लाख टन एवढे नुकसान झालेच होते. मग यावर्षी देखील ही शक्यता मोठी आहे. अर्थात म्हणून सोयाबीन किंमती मागील दोन वर्षाप्रमाणेच ८-१० हजार रुपयांच्या घरात जातील ही अपेक्षा निदान या घडीला तरी ठेवण्यात अर्थ नाही. परंतु सध्याची ४,५००-५,००० रुपये ही दरपातळी येत्या दोन महिन्यांत चांगलीच सुधारायला हरकत नाही.

अमेरिकी कृषी खाते काय सांगते?

अमेरिकेच्या कृषी खात्याचा (यूएसडीए) ऑक्टोबर महिन्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यानुसार ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादन अंदाजामध्ये मागील महिन्यापेक्षा ३० लाख टन वाढ दाखवल्यामुळे जागतिक उत्पादनामध्ये मागील वर्षापेक्षा सुमारे ३५० लाख टन वाढ झाली आहे. सोयापेंडीचे उत्पादन देखील १०० लाख टन अधिक दाखवले आहे. ब्राझील येत्या हंगामात विक्रमी १५२ दशलक्ष टन सोयाबीन पिकवेल.

वरील आकडे निश्चितपणे सोयाबीन दराच्या दृष्टीने नकारात्मक वाटत असले तरी ब्राझीलमधील सोयाबीन पेरणीदेखील अजून संपायची आहे आणि पुढील चार महिने तेथील हवामान कसे राहील यावर बरेच काही अवलंबून आहे. मागील ला-नीना वर्षाचा अनुभव ब्राझील आणि अर्जेन्टिना मध्ये सर्व काही ठीक असेल असे दर्शवत नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करता सोयाबीनमध्ये मोठी तेजी अपेक्षित नाही.

मजबूत डॉलरचा आधार

सोयाबीन पुरवठ्याबाबत समाधानकारक परिस्थिती दिसत असली तरी भारतात ३०-४० लाख टन सोयातेल आणि इतर १०० लाख टन खाद्यतेले अमेरिकी डॉलर मोजूनच आयात केले जाते. मागील चार-सहा महिन्यांमध्ये रुपयासमोर डॉलर ७७-७८ वरून ८२-८२ रुपयांवर गेला आहे. अमेरिकेमध्ये डिसेंबरपर्यंतची अपेक्षित व्याजदरवाढ लक्षात घेता रुपया ८३-८४ पातळी गाठेल असे जाणकार सांगत आहेत. म्हणजे डॉलरमधील ही संभाव्य सात ते आठ टक्के वाढ खाद्यतेल आयात तेवढ्या प्रमाणात महाग करणार.

शिवाय युक्रेन आणि रशियामधून सूर्यफूल आयात कमी होईल. आणि जी काही आयात होईल, ती वाढीव दराने झाल्यामुळेदेखील सोयाबीनच्या मागणीत वाढ होईल. या परिस्थितीमध्ये खाद्यतेल आयातखर्चात होणाऱ्या सात-आठ टक्के वाढीपैकी पाच टक्के जरी सोयाबीनमध्ये प्रतिबिंबित झाली तर डिसेंबरअखेर सोयाबीन ६,००० रुपयांच्या आसपास जायला हरकत नाही. तरी सुद्धा प्रत्यक्ष पुरवठ्यापेक्षा पुरवठ्याविषयी असलेले अंदाज सेंटीमेंट निर्माण करतात. त्यामुळे भारतात सोयाबीनला ५८००-६,००० रुपयांवर अडथळा जाणवेल. तो पार केल्यावर सुद्धा ६,२०० रुपयांचा मोठा अडथळा असेल.

धोरणबदलाची शक्यता

खाद्यतेलाची भरभक्कम आयात रोखून देशातील शेतकऱ्यांना सन्मानजनक दर मिळावा म्हणून सोपा, सॉल्व्हन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन आणि मस्टर्ड ऑइल प्रोसेसर्स असोसिएशन यांनी खाद्यतेलावर आयात शुल्क वाढीची मागणी केली आहे. तसेच तेलबिया पेंडीच्या निर्यातीवर देखील सवलत देण्याचा प्रस्ताव लावून धरण्यात आला आहे. त्याला यश आले तर सोयाबीन आणि त्याबरोबर फेब्रुवारीमध्ये काढणीस येणाऱ्या मोहरीलादेखील आधार मिळून चार-पाच टक्क्यांनी किमती वाढू शकतात.

एकंदरीत पाहता सोयाबीनमधील दरवाढीचा मार्ग मागील दोन वर्षांएवढा सुकर नसेल. प्रत्येक दरवाढीनंतर करेक्शन येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीन विकत राहणे योग्य ठरेल. तसेच पुढील सहा महिने जगभरात आर्थिक क्षेत्रात आणि बाजारांमध्ये प्रचंड अनिश्चितता आणि अस्थिरता दिसून येईल. त्यामुळे बाजारांमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शेवटी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com