पुणे ः जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसाने (Rainfall) खरिपातील काढणीला (Kharif Crop Harvesting) आलेल्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Crop Damage) झाले आहे. तर पाऊस लांबल्याने रब्बीच्या पेरण्यादेखील (Rabi Sowing) खोळंबल्याने खरिपाच्या नुकसानीबरोबरच रब्बी हंगामदेखील अडचणीत आला आहे.
गेल्या आठवड्यात सततच्या पावसाने जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यांतील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कांदा, बटाटा, ऊस, भाजीपाला, फुलांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेले पीक पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
फुल उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशिरस, पुरंदर येथे पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. फुल बाजारात ऐन दिवाळीमध्ये भिजलेल्या मालाचे ढीग पडून, उत्पादक हवालदिल झाला आहे. पावसामुळे भिजलेली शेवंती फुले पुणे येथील फुल बाजारात अंत्यत कमी वीस, तीस रुपये किलो एवढ्या कमी किमतीमध्ये विकली गेली तर मोठ्या प्रमाणावर शेवंतीची भिजलेली फुले ऐन दिवाळीमध्ये मागणी अभावी तशीच पडून असल्याचे चित्र आहे.
शिरूर तालुक्यातील वाघाळे, शिंगाडवाडी, पिंपळे धुमाळ, हिवरे, वरूडे, पिंपरी दुमाला या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. परिसरातील शेत शिवारातील पिके पाण्यात बुडली आहेत. यामध्ये ऊस, कांदा, सोयाबीन, टोमॅटो, मिरची, काकडी, ढोबळी मिरचीच्या समावेश आहे. सातत्याने पावसाचे पाणी शेतात साठून रहात असल्याने पिके सडली आहेत. पाऊस उघडल्यावर आणि शेतातील पाणी ओसरल्यावर गाळ झालेल्या या पिकांची रोपे तेवढी काढून टाकण्याचे शेतकऱ्यांकडे उरले आहे.
तालुक्यात शुक्रवारी (ता. २१) रात्री ढगफूटीसदृश पाऊस झाला. त्यापूर्वी दोन, तीन वेळा झालेल्या जोराच्या पावसाने पिकांना मोठा फटका बसला. शेतातील सुपिक मातीबरोबर काही ठिकाणी नुकतीच लागवड केलेली कांद्याची रोपे, भाजीपाला पिकेही वाहून गेली. जयेंद्र सोनवणे यांनी सात एकरात कांदा लागवड केली होती. बियाणे, लागवड व नांगरणीचा खर्च, खते, औषधे, खुरपणी यासाठी मिळून आत्तापर्यंत साडेतीन लाख रुपये खर्च झाला होता हा खर्च पावसाने पाण्यात गेला आहे.
सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. २२) सकाळी सहा ते सात या वेळेत ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे आरणीमध्ये साठवलेल्या बटाट्याला पाण्याचा वेढा पडला आहे. अनेकांचे शेतात साठवलेले बटाटे पुराच्या पाण्यात वाहून गेले. शिल्लक असलेला बटाटाही सडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऐन दिवाळीत दोन हजार शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवले आहे. १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) येथे तर गावात, वस्त्यावर, रस्त्यांना ओढ्या व नद्यांचे स्वरूप आले होते. या भागातील कुरवंडी, कारेगाव, पेठ, थूगाव, भावडी, कोल्हारवाडी आदी गावात ढगफुटी सदृश पावसाचा फटका बसला. पावसाचा कोप झाला. पारगावच्या प्रवेश द्वारासमोरच रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले. अनेक गुरांच्या गोठ्यात पाणी शिरले आहे. तासाभरात बटाटा पीक होत्याचे नव्हते झाले.
आंबेगाव व जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडलकर व आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी यांनी दिलेल्या आदेशानुसार बटाटा पिकाचे नुकसानीचे पंचनामे कृषी, ग्रामसेवक व कामगार तलाठी यांच्या मार्फत सुरू केले आहे.टी. के. चौधरी, कृषी अधिकारी, आंबेगाव तालुका.
या वर्षी फुलांच्या लागवडी कमी असल्याने दिवाळीच्या हंगामात पाऊस नसता तर शेवंती दोनशे रुपये किलोपर्यंत सहज विकली गेली असती.मोहन शेठ कुंजीर, फुल आडतदार
पावसाने साऱ्या स्वप्नांचे पाणी झाले... साडेतीन लाख रुपये लई वर्षापासून साठवले व्हते...कांद्याच्या लागवडीत, खत-औषधं फवारणीत, खुरपणी-कोळपणीत सारे गेले...आता कांद्यात गुडघाभर पाणी हाय...जमिनी उपाळल्यात साडेतीन रुपयेबी हातात येणार नाहीत...व्हतं नव्हतं ते मातीत घातलं आता दिवाळी कुठून करणार... वाघाळेच्या (ता. शिरूर) शेतशिवारात साठलेले पाणी दाखवत आणि गेले महिनाभर कांद्याच्या पिकात साठलेल्या चिखलात उतरून जयेंद्र सोनवणे सांगत होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.