Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीत पिके भुईसपाट

हापूस आंब्यासह द्राक्षे, डाळिंब, संत्रा, लिंबू, केळी बागांना तडाखा

Team Agrowon

पुणे : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली. उन्हाचा चटका असह्य होत असतानाच, राज्यात वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने (Garpit) दणका दिला. धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत झालेल्या वादळी पाऊस (Rain) आणि गारपिटीने पिके भुईसपाट झाली आहे.

प्रमुख रब्बी पिके (Rabbi Crops) , कांद्यासह भाजीपाला व फळबागांनाही या पावसाचा तडाखा बसला आहे. जोरदार वारे, ढगाळ हवामान, पावसामुळे कोकणासह राज्यातील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.

खानदेशात शनिवार (ता. ४)पासून ठिकठिकाणी वादळ, पाऊस व गारपिटीने तडाखा दिला आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी व रात्री धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील अनेक गावांत जोरदार गारपीट व वादळी पाऊस झाला. यात हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहे.

गारपिटीच्या तडाख्यात मोठे वृक्षही सोलले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

धुळ्यातील साक्री तालुक्यात टिटाणे गावात सोमवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. काही क्षणांत रस्ते व शेतांत गारांचा खच तयार झाला.

वृक्षांनाही गारांनी सोलून काढले. धुळ्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा भागांतही पाऊस व वादळाने कहर केला.

ज्वारी, गहू, फळपिके, केळी, हरभरा आदी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांतही जोरदार गारपीट व वादळाचा पिकांना फटका बसला. नवापुरातील विसरवाडी, खांडबारा, धडगाव मधील सिसा भागांत गारपिटीने मका, ज्वारी व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव, अमळनेर, जळगाव, पारोळा, जामनेर, यावल आदी भागांत वादळ व पाऊस झाला. यात गहू, मका आदी पिके आडवी झाली आहेत. चोपडा, जळगाव तालुक्यांत केळीचेही नुकसान झाले आहे.

चोपड्यातील सनपुले, कठोरा, कोळंबा, कुरवेल, तावले, खाचणे, निमगव्हाण आदी भागांत मका, केळी, गव्हाचे मोठे नुकसान झाले.
नाशिक जिल्ह्यात शनिवार (ता. ४) मध्यरात्रीपासून वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

कळवण, सटाणा, देवळा व मालेगाव तालुक्यांत मोठा फटका बसला. त्यामुळे टोमॅटो व हिरव्या मिरची लागवडी आडव्या झाल्या होत्या.

तर रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह रात्री कोसळलेल्या पावसाने गहू, द्राक्ष, कांदा पिकाला मोठा तडाखा आहे. इगतपुरी व नाशिक तालुक्यांत काही ठिकाणी गारपीट झाली.

निफाड व नाशिक तालुक्यांत द्राक्ष बागांचे मोठे नुकसान आहे. नाशिक, त्र्यंबकेश्‍वर व चांदवड तालुक्यांत आंबा पिकाला फटाका बसणार आहे.

पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी (ता. ६) सायंकाळनंतर दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, हवेली या तालुक्यांत वादळी पावसाने हजेरी लावली.

पावसाचे प्रमाण वाढल्यास मोठे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. या पावसाने गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळिंब पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले.

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ झाली. बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, फवारणीच्या खर्चात वाढ होत आहे.

मराठवाड्यातील अनेक भागांत गत दोन दिवसांपासून विजांचा कडकडाट व वादळासह हजेरी लावणाऱ्या पावसाचा गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांसह आंब्यासह इतरही फळपिकांना मोठा दणका बसला आहे.

पावसाची तीव्रता मंडलनिहाय कमी अधिक असली, तरी शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून पशुधनाचीही प्राणहानी झाल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत अवकाळी पावसाची तीव्रता अधिक होती. जालना जिल्ह्यातील जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता.

बीड जिल्ह्यातील परळी, बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव तालुक्यातील तुरळक मंडलांत, तसेच शिरूर कासार व वडवणी मंडलांत पावसाने हजेरी लावली. आष्टी तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासूनच वादळी वारा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

वादळी वाऱ्यामुळे लिंबू आणि संत्राच्या बागेचे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक गारासह रिमझिम पाऊस पडला. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, शिरूर अनंतमाळ व चाकूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

मध्य महाराष्ट्र : वडगाव मावळ ३०, आंबेगाव २०, जुन्नर , संगमनेर, राहुरी, राहाता, सिन्नर, श्रीरामपूर, येवला, तळोदा प्रत्येकी १०. मराठवाडा : पैठण १०. विदर्भ : बुलडाणा २०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: अहिल्यानगरला कृषी समृद्धी योजनेसाठी सव्वा बावीस कोटी

Rabi Season: शेतकऱ्यांना रब्बीचा आधार

Foodgrain Production: भारतानं धान्य उत्पादनात नवा इतिहास रचला, भात उत्पादन सर्वाधिक, विक्रमी वाढ

Agriculture Minister Bharane: एमएसपीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरव्यवहार; हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी अनधिकृतरीत्या पैसे घेतल्याचे उघड

SCROLL FOR NEXT