Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीने शेतीसह पिकांची दैना

मोसम खोऱ्यात खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांना मोठा फटका

Mukund Pingle

नाशिक : सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्यात ८ ऑगस्ट रोजी ढगफुटीसदृश पाऊस (Rain) झाला. त्यामुळे जवळपास १५ गावांमध्ये दाणादाण उडाली. नंतर हे संकट काही अंशी ओसरले; मात्र अतिवृष्टी झाल्यानंतरही सतत पाऊस सुरू असल्याने नुकसान वाढते आहे. शेतांचे बांध तुटल्याने पाणंद रस्ते, पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांना मोठा फटका बसला (Crop Damage) . शेती, शिवारांसह पिकांची दैना झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

जायखेडा व नामपूर महसूल मंडलांतील अतिवृष्टीबाधित गावांमध्ये पिके नावापुरतीच उभी आहेत. काही पिके पाण्याच्या प्रवाहात आडवी झाली, तर काही पाण्यासोबत वाहून गेली. तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, १२०० हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा हंगाम आता वाया गेल्याची स्थिती आहे. त्यांना आता दुबार पेरणीही करता येणार नाही. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. सततच्या पावसामुळे शेतीशिवारात सर्वत्र पाणीच पाणी आहे. सुरुवातीला मका, सोयाबीन, बाजरी ही पिके पाण्याखाली गेली. तर काही शेतकऱ्यांची पिके मातीसह वाहून गेली आहेत. पाणी ओसरले असले, तरी पिके पिवळी पडली आहेत. मका, बाजरी या अन्नधान्य पिकांची वाढ खुंटली आहे. तर मठ, मूग, कुळीद ही पिके सडली आहेत.

डाळिंब उत्पादक शेतकरी अगोदरच फळकुज, प्लेग, तेलकट डाग व मर रोगामुळे हैराण होते. त्यातच सततच्या पावसामुळे डाळिंब फळांची कुज होऊन फळे झाडावरच सडून गेली आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळांची गुणवत्ता संपुष्टात आली आहे. मोठ्या प्रमाणावर फळांची गळ होऊन झाडांखाली खच साचला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पूर्वहंगामी द्राक्ष बागांमध्ये गोडी बहर छाटण्या पूर्ण झाल्या आहेत. या शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

वाघळे येथील शेतकरी शिवाजी चव्हाण म्हणाले, ‘‘अचानक झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. कांदा चाळीत पाणी घुसल्याने १०० क्विंटल कांदा वाहून गेला. १ लाख रुपयांवर नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.’’

ब्राद्मणपाडेतील डाळिंब उत्पादक शेतकरी राजेंद्र पगार म्हणाले, ‘‘एप्रिलमध्ये डाळिंब बागांची छाटणी करून बहर धरण्यासाठी पाणी व खते देऊन फवारण्यांचे नियोजन केले. फळांची धारणा चांगली होती. मात्र ऑगस्टमधील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बागेत पाणी असून, काम करता येत नाही. फवारणी न करता आल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागेतील झाडांवरील फळांची कुज झाली. झाडाला धक्का लागला तरी फळे गळून पडतात. झाडाखाली फळांचा खच आहे. त्यामुळे खर्च पाण्यात गेला. मागील वर्षी ६ टन माल निघून तो ५५ रुपये प्रतिकिलोने विकला होता. मात्र आता हातातोंडाशी आलेला घास वाया गेला.’’

वस्तुनिष्ठ पंचनामे झालेच नाहीत...
अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीपिकांसह रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शिवारात वाहने घेऊन जाता येत नसल्याने ज्या ठिकाणी शक्य होईल, त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेने पाहणी केली. प्रत्यक्ष बांधावर कुणी आले नाही. फोनवरून माहिती घेत पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण केले आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

प्रमुख नुकसानग्रस्त गावे :
श्रीपूरवडे, उत्राणे, खामलोण, वाघळे, टेंभे खालचे, ब्राह्मणपाडे, बिजोरसे, इजमाने, राजपूरपांडे, मोराने, द्याने, जायखेडा, आसखेडा, नामपूर आदी.

नुकसान दृष्टिक्षेपात :
- नाल्यांचे पाणी कांदा चाळीत शिरून कांदा वाहून गेला
- सततच्या पावसामुळे डाळिंब बागेत फळांची गळकुज
- मका, बाजरी पिके पिवळी पडली, वाढही खुंटली
- वेलवर्गीय पिकांमध्ये वालपापडी वेली पिवळ्या; उत्पादनावर परिणाम
- सततचा पाऊस व सूर्यप्रकाशाअभावी भाजीपाला पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव; पावसामुळे खर्चही वाया
- पाणंद रस्त्यांना नाल्याचे स्वरूप; शेतात जाण्यात अडचणी.

प्रतिक्रिया:
अतिवृष्टीमुळे शेतीसह शेतरस्ते, पाणंद रस्त्यांचे मोठे नुकसान आहे. शेतात, वाडीवस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत येताना अडचणी आहेत. काही ठिकाणी पंचनामे झाले, मात्र काही ठिकाणी शासकीय यंत्रणा पोचलेली नाही. वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- कुणाल पाटील, उपसरपंच, वाघळे, ता. सटाणा

पंचनामे करून स्थानिक शेतकऱ्यांना मदत तातडीने द्यावी. पिके वाया गेल्याने कर्जदार शेतकऱ्यांचे पीककर्ज राज्य सरकारने माफ करावे, तरच शेतकरी पुढील हंगामात उभा राहू शकेल.
- दीपक पगार, प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती संघटना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT