Team Agrowon
यंदा अल्प पावसावरच कापसाचे पीक (Cotton Crop) जोमात आहे. मात्र यंदाही कापसावर सेंद्रिय बोंड अळीचे (Boll Worm) कापसावर संकट आल्याचे दिसून येत आहे. सध्या कापसाचे पीक पाते लागण्याच्या तयारीत असून फुलोऱ्यात आहेत. मात्र फुलात तसेच पाते लागण्याच्या स्थितीतील देठात बोंड अळी पडल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रादुर्भाव दिसून आलेल्या क्षेत्राची पाहणी केली. प्रादुर्भाव थांबवण्यासाठी उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन केले जात आहे. मात्र बोंड अळीमुळे यंदाही उत्पादनावर (Cotton Production) परिणाम होण्याची भीती आहे.
यंदा कापसाची १ लाख २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. शेवगाव तालुक्यात सर्वाधिक ४२ हजार हेक्टर, पाथर्डी तालुक्यात २७ हजार हेक्टर, नेवासा तालुक्यात २२ हजार हेक्टर, राहुरी तालुक्यात १३ हजार हेक्टर, श्रीरामपूरला पाच हजार हेक्टर, श्रीगोंद्याला पाच हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.
मराठवाड्यातील (Marathwada) एक मुख्य असलेले पीक नगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून बऱ्यापैकी रुजले. आता पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहुरीसह अन्य तालुक्यांतही कापसाची लागवड होऊ लागली. मात्र गेल्या दहा वर्षांची परिस्थिती पाहता कापसाचे पीक सतत संकटात आहे.
तरीही नगदी पीक म्हणून शेतकरी कापूस लावत आहेत. मागील पाच वर्षांत सातत्याने बोंड अळीचा कापूस उत्पादकांना (Cotton Producer) मोठा आर्थिक फटका बसला.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव भागात यंदाही कापसावर सेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव अढळू लागला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सतत अडचणीत असलेले कापूस पीक (Cotton Crop) यंदाही संकटात सापडले आहे.
त्यानंतर तातडीने शेतकऱ्यांनी कृषी विभागाला संपर्क केला. कृषी अधिकारी सुधीर शिंदे, मंडळ कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी सहायक संदीप ढाकणे, मेनीनाथ बेलेकर आदींनी खरवंडी येथील आश्रुबा दौंड यांच्या शेतात जाऊन कापूस पिकांची पाहणी केली.
तेथे कापसावर बोंड अळी पडल्याचे आढळून आले. शेवगाव, नेवासा तालुक्यांतही काही भागात हा प्रादुर्भाव आढळला आहे.