Milk Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Cow Milk Rate : गाईच्या दूधदरात घसरण सुरूच

Milk Production : मागील सहा महिन्यांपासून टिकून असलेला गाईच्या दुधाच्या दरात महिनाभरापासून घसरण सुरू झाली आहे.

Suryakant Netke

Nagar News : मागील सहा महिन्यांपासून टिकून असलेला गाईच्या दुधाच्या दरात महिनाभरापासून घसरण सुरू झाली आहे. प्रति लिटरला मिळणारा ३८ रुपयांचा दर महिनाभरात सात ते आठ रुपयांनी घसरले असून, सध्या ३०-३२ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. देशांतर्गत दूध पावडर व बटरचे दर कमी झाल्याने दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

दुधाचे दर कमी होऊ लागताच दर टिकून राहण्यासाठी समिती केली. किमान ३५ रुपये दर कायम राहावा यासाठी उपाययोजना करण्याचे जाहीर केले. मात्र अद्याप उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आश्‍वासनानंतर तीन ते चार रुपयांनी दर खाली आले आहेत. पशुखाद्याचे दरही कमी झालेले नाही. त्यामुळे दूध धंदा तोट्यात जात असल्याने दूध उत्पादक त्रस्त झाले आहेत.

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला दूध व्यवसायाची जोड दिलेली आहे. राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा जास्त खासगी दूध संघाच्या माध्यमातून दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील चाळीस टक्के दुधाची पावडर, बटर होते, तर साठ टक्के दूध ग्राहकांना पाऊचमधून विकले जाते. याशिवाय तीस ते चाळीस लाख म्हशींच्या दुधाची थेट ग्राहकांनी विक्री व इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात.

कोरोना व्हायरसच्या काळात मागणी घटल्याने दुधाचे दर कमालीचे खाली आले होते. त्याआधीही दुधाचे दर सतत पाडले जात होते. अगदी दुधाचा दर १८ रुपयांपर्यंत खाली आल्याने आंदोलनही झाली. आता सहा महिन्यांपासून दुधाचे दर बऱ्यापैकी वाढले होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गाईंच्या दुधाला प्रति लिटर ३८-३९ रुपयांपर्यंत दर मिळत होता. गेल्या महिनाभरात मात्र गाईंच्या दुधाचे दर खरेदीदारांनी सात ते आठ रुपयांनी खाली आणले आहेत.

दुधाचे दर कमी होऊ लागताच पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी समिती नियुक्त केली. शिवाय दुधाचे दर ३५ रुपयांच्या खाली येणार नाही याची काळजी सरकार घेईल. पशुखाद्याचे दर पंचवीस टक्क्यांनी कमी करण्याच्या उपाययोजना केल्या जातील, असे जाहीर केले. मात्र त्याबाबत अद्याप काहीही झाले नसल्याने हे सांगितल्यानंतर चार रुपयांनी दूधदर खाली आले आहेत.

सध्या दुधाला ३० ते ३२ रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाचे दर कमी होत असल्याने आता कुठे सावरायला लागलेले दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्याचा दुधाला मिळणारा दर आणि पशुखाद्याचे दर पाहता मिळणारी अर्धी रक्कम पशुखाद्यावरच खर्च होत आहे. चारा, मजुरीचा विचार करता दूध व्यवसाय सध्या तोट्यात आहे.

टोण्ड दूध विक्री दर ‘जैसे थे’ कसे?

राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गाईंच्या दुधाचे दर दूध संघचालकांनी कमी करत प्रति लिटरचा दर ३८-३९ रुपयांवरून ३१-३२ रुपयांवर आणला. मात्र दूध संघाकडून पॅकिंग करून विकल्या जाणाऱ्या दरात एक रुपयाही कमी केला नाही. आजही गाईंच्या पॅकिंग दुधाचा दर पूर्वीएवढाच ४० रुपयांच्या पुढे आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाणारे दूध ३.५ व ८.५ चे आहे. दूध संघाकडून विकले जाणारे दूध हे टोण्ड दूध आहे. आमच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाचे दर कमी झाले, तर तुमच्याकडून विकल्या जाणाऱ्या दुधाचे दर कायम कसे, असा प्रश्‍न नंदू रोकडे या दूध उत्पादक शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.

दुधाला ३८-३९ रुपये दर मिळत होता, त्या वेळी हा व्यवसाय परवडणारा होता. मात्र पुन्हा दर ३१-३२ रुपयांवर आणले असल्याने धंदा तोट्यात गेला आहे. खाद्याचे दर कमी व्हायला पाहिजे मात्र ते केले जात नाहीत. दर कमी झाल्याने खाद्य कमी खाऊ घातले जाते. दूध व्यवसायाची डेव्हलपमेंटही थांबली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दूध व्यवसाय पुन्हा मोडकळीस येऊ शकतो.
- गणेश अंत्रे, दूध उत्पादक शेतकरी, सोनगाव सात्रळ, ता. राहुरी, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

Parbhani Voting Percentage : परभणी जिल्ह्यात सरासरी ७१.४५ टक्के मतदान

Rabi Sowing : रब्बी पेरणीला वेग, हरभऱ्याची लागवड जोरात

Vote Turnout : मतदानाचा टक्का वाढला, आता लक्ष निकालाकडे

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

SCROLL FOR NEXT