Agriculture News : शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषी आयुक्तालयाने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप व्हॉट्सॲप आधारित तक्रार निवारण उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत दोन हजार जणांनी संपर्क साधला आहे, अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
सामान्य शेतकऱ्यालाही त्यांची अडचण थेट कृषी आयुक्तालयाकडे सहज मांडता येणारी यंत्रणा तयार करावी, अशी सूचना नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार घेताच केली होती.
त्यानुसार कृषी खात्याचे प्रधान सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी तातडीने तक्रार निवारणाची पर्यायी कार्यपद्धती तयार केली. कृषी आयुक्तालयात ‘कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ तयार करण्यात आली आहे. त्यासाठी ९८२२४४६६५५ या भ्रमणध्वनी क्रमांक राज्यभर खुला करण्यात आला.
विशेष म्हणजे सात दिवस २४ तास सुरू असलेल्या या हेल्पलाइनचे संनियंत्रण राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रदीप देशमुख व्यक्तीशः करीत आहेत. ते तक्रारी स्वीकारत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
व्हॉटस्अॅप हेल्पलाइन सुरू झाल्याची माहिती कृषिमंत्र्यांच्या छायाचित्रासह समूह माध्यमांमध्ये पसरली. त्यामुळे हेल्पलाइनला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पहिल्या २४ तासात ५०० जणांनी हेल्पलाइनशी संपर्क साधला. निविष्ठांसह डीबीटी, अवजार अनुदान, पाणंद रस्ते, वीज, आरोग्य अशा समस्याही शेतकऱ्यांनी सांगितल्या. चार दिवसांत या हेल्पलाइनवर किमान दोन हजार जणांनी संपर्क साधला आहे.
दरम्यान, या हेल्पलाइनवर आता निविष्ठा सोडून अन्य तक्रारीही येऊ लागल्या आहेत. ‘‘शेतकऱ्यांनी फक्त बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत तक्रार असल्यास व्हॉट्सॲपवर लेखी तक्रार करणे अपेक्षित आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्याने आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, समस्या किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील साध्या कागदावर लिहावा. या कागदाचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्अॅप हेल्पलाइनवर पाठवावे,’’ अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
तोंडी तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा
व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक संभाषणासाठी किंवा इतर तक्रारींसाठी नाही. कृषीविषयक अन्य तक्रारींसाठी किंवा संभाषणासाठी १८००२३३४००० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, कृषी आयुक्तालयाच्या तक्रार निवारण कक्षातील ८४४६११७५००, ८४४६२२१७५० किंवा ८४४६३३१७५० या भ्रमणध्वनी क्रमांकांवर तोंडी तक्रारदेखील करता येईल, असे असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
कृषिमंत्री महोदयांच्या सूचनेनंतर सुरू केलेल्या ‘कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही तक्रार येताच ती स्वीकारतो आणि तालुका कृषी अधिकाऱ्याकडे पाठवतो. त्याने या तक्रारीचे निवारण करावे व शेतकऱ्याला कळवावे, असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.- विकास पाटील, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, कृषी आयुक्तालय
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.