Mumbai News : अनिल अंबानी यांच्या ताब्यातील रिलायन्स एअरपोर्ट कंपनीने त्यांचे देखरेख शुल्क भरलेले नाही. तसेच त्यांची देणीदेखील बाकी असल्याने नांदेड, लातूर आदी विमानतळे बंद आहेत.
ही देणी नंतर संबंधितांकडून वसूल करण्याच्या शर्तीवर सध्या राज्य सरकार भरेल व ही विमानतळे सुरू करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चेदम्यान फडणवीस यांनी ही माहिती दिली.
विमानतळ प्राधिकरणाशी संबधित प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी गुलाबराव पाटील यांच्यावर होती. मात्र, अपुऱ्या माहितीमुळे पाटील यांची भंबेरी उडाली. त्यामुळे फडणवीस यांनी पाटील यांना सांभाळून घेतले.
दरम्यान, नवी मुंबईतील आंतराष्ट्रीय विमानतळ पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडेसहाशे कोटी रुपये खर्चुन नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधण्यात येईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच कराड शहर हे धोरणात्मक दृष्टीने राज्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे लवकरच कराड येथेही विमानतळ सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.
चव्हाण यांनी नांदेड, लातूरमधील विमानतळांचा विषय उपस्थित केला होता. राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या १८ विमानतळांपैकी फक्त सातच विमानतळ प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.
तसेच मुंबईहून गुजरातमध्ये जाण्यासाठी विमानाचे तिकिट फक्त १९०० रुपये आहे. पण तितकाच प्रवासवेळ लागत असताना महाराष्ट्राअंतर्गत विमानसेवेसाठी प्रवाशांना तीन ते साडेतीन हजार रुपये मोजावे लागत असल्याचे चव्हाण म्हणाले.
त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सध्या मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी आहे. या धावपट्टीवर रोज किमान सातशेपेक्षा जास्त उड्डाणे तसेच लँडिंग होत असते. जास्त ट्रॅफिकमुळे मुंबई विमानतळावर राज्यांतर्गत सेवेसाठी प्राईम स्लॉट उपलब्ध नाहीत.
त्यामुळे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात हा विमानतळ कार्यरत होईल. हा विमानतळ कार्यरत झाल्यानंतर महाराष्ट्राअंतर्गत विमानसेवेचा प्रश्न सुटलेला असेल.
तसेच अनिल अंबानी यांच्या अखत्यारितील रिलायन्स एअरपोर्ट कंपनी नांदेड, लातूर आदी विमानतळांची देखरेख बघते. मात्र या कंपनीने त्यांचे देखरेख शुल्क भरलेले नाही. त्यांची देणीदेखील बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून भविष्यात ही देणी वसूल करण्याच्या शर्तीवर ही देणी राज्य सरकार सध्या भरेल व हे विमानतळ सुरू होतील.
नांदेड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच कोल्हापूर येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी मदत पोहोचविण्यासाठी जवळपास विमानतळ असणे गरजेचे होते. कराड या शहराची जागा विमानतळासाठी मोक्याची आहे. म्हणून लवकरच कराड येथेही विमानतळ उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शिर्डी विमानळावर अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंग
शिर्डी विमानतळाबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शिर्डी विमानतळावर अद्याप नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध झालेली नसल्याचे थोरात म्हणाले. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, की शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सोय उपलब्ध आहे.
मात्र त्यासाठी प्रत्येक लँडिंगच्या वेळी स्वतंत्रपणे परवानगी घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याशी चर्चा करून लवकरच ही सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शिर्डी विमानतळावर ६५० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक टर्मिनल बिल्डिंग उभारण्यात येईल. त्याची निविदा येत्या एक-दोन दिवसांत काढण्यात येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.