Rural Development
Rural Development Agrowon
ताज्या बातम्या

Panchayat Raj : ग्रामपंचायतींमध्ये देशपातळीवर स्पर्धा घेणार ः पाटील

टीम ॲग्रोवन

पिंपरी ः ‘‘केंद्र व राज्य सरकारतर्फे संयुक्त राष्ट्र संघाच्या १७ ध्येयांपैकी ९ ध्येय मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये देशपातळीवर स्पर्धा (National Level Competition For Gram Panchayat) घेण्यात येईल. देशातील २ लाख ५५ हजार ग्रामपंचायती यात सहभाग घेतील. विजेत्या ग्रामपंचायतींना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार (Award For Gram Panchayat) देण्यात येणार आहेत.

तसेच; पंतप्रधानांची भेट घडवून संवाद साधला जाणार आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी चिंचवड येथे गुरुवारी (ता.२२) केले. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय आणि राज्य सरकारच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयातर्फे ‘जल समृध्द’ व ‘स्वच्छ गाव’ या विषयावर येथे राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. त्याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. या वेळी अध्यक्षस्थानावरुन पाटील बोलत होते.

पंचायत राज विभागाचे केंद्रीय सचिव सुनील कुमार, अतिरिक्त सचिव चंद्रशेखर कुमार, पाणी पुरवठा विभागाच्या सचिव विनी कुमार, राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, हिवरे बाजारचे प्रवर्तक पोपटराव पवार, अभय महाजन आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘दोन दिवसांच्या कार्यशाळेनंतर राज्यातील १४ ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांनी केलेले चांगले काम पाहण्यात येणार आहे. लखनौलाही आम्ही ‘स्मार्ट विलेज’ कार्यशाळा घेतली होती.

केंद्र व राज्य सरकार मिळून गावांचा शाश्‍वत विकास व्हावा. पोपटराव पवार यांची प्रेरणा घेऊन अन्य ग्रामपंचायतींनी विकास करावा, हा या मागचा हेतू आहे. राज्यांनीही त्यांच्या पातळीवर अशा कार्यशाळा घ्याव्यात. २८ हजार ग्रामपंचायतींपर्यंत हा विषय कार्यशाळेद्वारे जावा.’’ राज्यातून या कार्यशाळेत ८५० सरपंच व देशातील २७ राज्यातून २५३ सरपंच सहभागी झाले आहेत.

चांगले काम करणाऱ्या माणसाला लोक वारंवार निवडून देतात. पाणी, आरोग्य व स्वच्छता याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवकांकडे आहे. प्रामाणिकपणे काम करा आमदारही व्हा, जसा मी झालो.
गिरीश महाजन, मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज विभाग.
रोजगार, स्वच्छता, पाणी व आरोग्य या सुविधा गावात जाव्यात. संयुक्त राष्ट्र संघाचे ९ ध्येय मिळविणारे गाव ‘स्मार्ट विलेज’ होईल. गावाचा नागरिक आदर्श झाल्यास गाव स्मार्ट होईल. केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे कसा जाईल, याचे नियोजन केले आहे. -
कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री, पंचायत राज मंत्रालय.

‘बैलपोळा साजरा करू नका’

‘‘जलयुक्त शिवार योजनेची सखोल चौकशी मागील महाविकास आघाडी सरकारने करून त्यांच्या काळातच त्यांनी ‘क्लीन चिट’ दिली. या योजनेचा फायदा जेवढा शेतकऱ्यांना झाला, तेवढा यापूर्वी कधीच झाला नाही. ग्रामीण भागात गायरान क्षेत्रावरील अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्यास आम्ही ते काढण्याचे काम सुरु केले आहे. लम्पी स्कीन आजारावर आम्ही युद्ध पातळीवर काम करत आहोत. प्रादुर्भावग्रस्त भागात बैल पोळा करणे योग्य नाही. परंतु; सक्ती नाही,’’ असे महाजन म्हणाले.

‘ही शेवटची धडपड’

दसरा मेळाव्यासंदर्भात आता उद्धव ठाकरे यांनी दुसरीकडे जागा बघावी, असे सांगून महाजन म्हणाले, ‘‘ठाकरे यांचे एक महिन्यात निवडणुका घ्या म्हणणे म्हणजे ‘आत्या बाईंना मिशा असत्या तर...’ या म्हणी प्रमाणे आहे. जर-तरच्या गोष्टी करतात. ते खूप अस्वस्थ आहेत. त्यांचे ४० आमदार, १२ खासदार गेले. त्यामुळे काही तरी भडक, प्रक्षोभक भाषणे करून काही तरी दाखविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ही शेवटची धडपड आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT