Agriculture Technology
Agriculture Technology  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Technology : शेती, तंत्रज्ञानाचा बांधला सेतू

Team Agrowon

शेतीतील नवे तंत्रज्ञान (Agriculture Technology), नवे प्रयोग, शेतीपूरक आणि प्रक्रिया उद्योगाच्या यशोगाथा सांगणाऱ्या सकाळ ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला (Agrowon Exhibition) शुक्रवारी (ता.१३) पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी प्रत्येक स्टॉलवर जात माहिती घेत नावीन्याचा ध्यास घेताना दिसत होते. प्रदर्शनातील तंत्रज्ञान (Technology) आणि शेतीचा नवा सेतू या निमित्ताने बांधला गेला.

औरंगाबाद येथील कलाग्राममधील विस्तीर्ण परिसरात सकाळ ॲग्रोवनच्या प्रदर्शनाला शुक्रवारी थाटात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या भागात उभारलेल्या स्टॉल्सना चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शेतकऱ्यांची पावले कलाग्रामकडे वळत होती. काही शेतकऱ्यांनी पेरणी, मशागत आणि लागवडीच्या यंत्रांची माहिती घेत त्यांचे बुकिंगही केले.

चिकू, मोसंबी, स्ट्रॉबेरी, मधमाशी पालन, पशुखाद्यातील नवीन प्रकार, मातीचा पोत सुधारण्याचे तंत्रज्ञान, मशागतीची यंत्रे, ट्रॅक्टर, पोकलेन, तणनाशके, कीटकनाशके, शेतीक्षेत्रातील नव्या प्रयोगांची पुस्तके आदी स्टॉलवर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. रोप लागवडीपासून सिंचनापर्यंत आणि जनावरांच्या सर्वांगीण आहाराबाबत घ्यावयाची काळजी या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांनी घेतली.

नव्या तंत्रज्ञानाकडे तरुण शेतकऱ्यांचा कल

प्रदर्शनात सिंचन, रोपलागवडीच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देणारे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.

‘सेन्सर’ च्या साहाय्याने सिंचनासाठी बसविलेल्या ‘व्हॉल्व’ची माहिती घेण्यासाठी तरुण शेतकरी उत्सुकता दाखवत होते, हे तंत्रज्ञान ‘वाडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट’च्या प्राध्यापकांनी तयार केले असून ‘ॲप’च्या माध्यमातून ते संचलित करता येते.

हव्या असलेल्या प्लॉटला हव्या, त्या वेळी पाणी देण्याची व्यवस्था कशी होते याची माहिती शेतकऱ्यांनी या माध्यमातून झाली.

बियाणे, सेंद्रिय खतांची माहिती

मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन आणि तूर हे मुख्य पीक असल्याने त्याबाबतची चौकशी प्रदर्शनात केली जात होती. या प्रदर्शनात अनेक स्टॉलवर सोयाबीन बियाणांची माहिती दिली जात होती.

तसेच तुरीच्या वेगवेगळ्या जातीची बियाणे प्रदर्शन आणि विक्रीसाठीही सादर झाली. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांच्या माहितीचे स्टॉलही प्रदर्शनात मांडले होते. त्याविषयी जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांची भेट

प्रख्यात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषीप्रदर्शनाला आवर्जून भेट देत या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. सिंचन आणि नद्यांचे महत्त्व सांगत राणा यांनी शेतकऱ्यांना नदी संवर्धनाचे महत्त्व सांगितले.

या वेळी ते म्हणाले, की प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोळ्यांतील पाणी पाहिले, तर त्याला नदीचे आणि पाण्याचे महत्त्व कळू शकते. डोळ्यांत पाणी केव्हा येते हे समजले, की ती व्यक्ती नदीतील पाण्याचे महत्त्व नक्की समजून घेतो.

नद्यांचे संवर्धन भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. सकाळ- ॲग्रोवन सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याबाबत नेहमीच शेतकऱ्यांचे प्रबोधन करत असून, त्यात सातत्य आहे.

अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधनाची चळवळ अखंड ठेवल्याबाबत ॲग्रोवनचे कौतुक करावे तितके कमी आहे असेही ते म्हणाले. श्री. राणा यांनी या वेळी प्रदर्शनासाठी आलेल्या उपक्रमशील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पशुधनासाठी ‘कन्हैया ॲग्रो’ची उत्पादने

निरोगी पशुधनासाठी ‘कन्हैया ॲग्रो’ ही कंपनी २०१७ पासून कॅटल व पोल्ट्री फीड उत्पादनात अग्रगण्य मानली जाते. पशुधनाला जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध प्रकारच्या पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने कन्हैया ॲग्रोने सखोल संशोधन करून विविध प्रकारच्या पशुखाद्याची निर्मिती केली आहे.

कंपनी पशुपक्षी खाद्य उत्पादन क्षेत्रातही चांगले काम करीत आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर येथे कंपनीचे अत्याधुनिक, संगणकीय पशू-पक्षी खाद्य उत्पादन करणारे दोन कारखाने आहेत. पशुधन निरोगी आणि अधिक सक्षम होण्यासाठी प्रीमियम आणि उत्कृष्ट पौष्टिक खाद्य उच्च दर्जाच्या घटकांपासून बनवले जाते.

पशुखाद्याची पौष्टिक गुणवत्ता कायम राहण्यासाठी, सर्वोत्कृष्ट पशुआहार तज्ज्ञ हे कंपनीसाठी संशोधन करतात. याविषयी तसेच कंपनीच्या उत्पादनांची सविस्तर माहिती या दालनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे.

‘बसवंत गार्डन’चे फळ प्रदर्शन ठरले शेतकऱ्यांचे आकर्षण

‘बसवंत गार्डन’तर्फे ‘मिलांज फळांचा महाराजा’ नावाने संत्रा, मोसंबी, स्‍ट्रॉबेरी, बोर, सीताफळ आणि चिकू या सहा प्रकारच्‍या फळांचे प्रदर्शन आणि स्‍पर्धा भरवण्यात आली आहे. प्रदर्शनात ते शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहे.

निसर्गाशी दोन हात करून पीक उत्‍पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या फळपिकांचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी बसवंत गार्डन नेहमी अग्रेसर राहते. प्रदर्शनातील उत्कृष्ट नमुने पाहून सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकप्रकारचे प्रोत्साहन मिळावे हा उद्देश आहे. दिवसभर शेतकरी याठिकाणी आवर्जून थांबून माहिती घेत होते.

यातील उत्‍कृष्ट फळांचे नमुने आकर्षकरीत्या येथे मांडण्यात आले आहेत. या ठिकाणी ठेवलेल्या फळ उत्पादकांच्या उत्‍कृष्ट नमुन्‍यास पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

विषमुक्त शेती, निर्यातीबाबत ‘केबी एक्स्पोर्ट्स’ ठरतेय मार्गदर्शक

‘केबी एक्स्पोर्ट्‌स इंटरनॅशनल’ व ‘केबी बायो ऑरगॅनिक’ फलटण यांच्यामार्फत विषमुक्त शेती विषयात तसेच निर्यातीमध्ये काम केले जात आहे. संचालक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात कंपनीचा चमू ॲग्रोवनच्या प्रदर्शनात याबाबतची सर्व माहिती कंपनीच्या दालनात उपलब्ध करीत आहे.

या सर्व उत्पादनांचे लाइव्ह डेमॉस्ट्रेशन’ इथे दिले जात आहे. कंपनीच्या उत्पादनांचा वापर केल्यानंतर ४८ तासांत त्याचा निष्कर्ष कसा मिळतो हेही सांगण्यात येत आहे. कंपनीकडून करार शेतीत काम सुरू असून, उत्पादित माल युरोपीय देशांमध्ये निर्यात केला जातो.

‘एमआयटी कार्स’तर्फे विविध सुविधांची माहिती

प्रदर्शनात ‘एमआयटी कार्स’च्या दालनात शेतकऱ्यांना तपासणी सुविधांची माहिती दिली जात आहे.

त्यात प्रामुख्याने माती, पाणी, खते, पान व देठ तपासणी या घटकांचा समावेश आहे. ‘एचपीएलसी’, ‘जीसीएमएस’ या यंत्रांद्वारे तपासणीची सुविधा ‘एमआयटी’ तर्फे दिली जाते. अन्न परिक्षण (फूड टेस्टिंग), ‘एअर मॉनिटरिंग, सूक्ष्मजीवांसंबंधी म्हणजे ‘मायक्रोबियल टेस्टिंग’ची सुविधाही इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कृषी विभाग एनएबीएल प्रमाणित राज्यस्तरीय अशी ही प्रयोगशाळा आहे. तसेच सीपीसीबी प्रमाणितही आहे.

संस्थेमार्फत माती-पाणी तपासणी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. शिवाय माती परीक्षणाचे काय फायदे काय आहेत हे पटवून दिले जात आहे. ‘एमआयटी लॅब’चे संचालक डॅा. दीपक बोरनारे यांच्या मार्गदर्शनात या दालनात माहिती दिली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT