Jalgaon News : खानदेशात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात कापसाची सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यातच धुळे जिल्ह्यातील काही भागांत कमी पाऊस असून, याचा फटका पेरणीलाही बसला आहे.
धुळ्यातील धुळे, शिंदखेडा तालुक्यांत काही मंडलांत दुबार पेरणीदेखील करावी लागली आहे. तसेच दुबार पेरणी करूनही कमी पावसामुळे पीक हवे तसे नाही.
नंदुरबारातही नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग आणि शहाद्यातील पूर्व भागातही कमी पाऊस आहे. धुळ्यातील दक्षिण पूर्व भागात कमी पाऊस होता. धुळ्यात ८८ टक्के, नंदुरबारात ८७ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत.
आजअखेरपर्यंत ७ लाख ३८ हजार ५२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र पाऊस आहे. परंतु चाळीसगाव, भडगावच्या पश्चिम भागात कमी पाऊस आहे.
पीक लागवडीत कापूस पिकाचे क्षेत्र अधिक दिसत आहे. त्यात धुळ्यात दोन लाख हेक्टरवर, नंदुरबारात एक लाख हेक्टरवर आणि जळगावात ५ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.
खानदेशात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र १७ लाख हेक्टर एवढे आहे. धुळ्यात चार लाख, नंदुरबारात अडीच लाख आणि जळगावात ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर इतके आहे. यंदा जून महिना हा कोरडा गेला आहे. कापूस लागवडीस उशीर झाला. मात्र, जुलैपासून चांगला पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे. खानदेशात ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, इतर गळीतधान्य, कापूस, तसेच नवीन ऊस पिकाची लागवडही केली जाते.
जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम ऊस पिक वगळून ७ लाख ३४ हजार ६०६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नवीन ऊस पिक लागवडीसह ७ लाख ३८ हजार ५२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
जळगावातील पेरणीची माहिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
मका- ८६ हजार १९९ हेक्टर, ज्वारी- २० हजार ७६२, सोयाबीन- १७ हजार ७१८, उडीद- १४ हजार ७५८, तूर- १० हजार ८२५, मूग- १३ हजार ७८७, बाजरी- ७ हजार ८५४, नवीन ऊस लागवड- ३ हजार ९१४, इतर तृणधान्य- २ हजार ३६०, भुईमूग- ९००, इतर कडधान्य- ४६४, तीळ- १७४, सूर्यफूल- १४ व इतर गळीतधान्य ११ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.