Kharif Season : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण १९ लाख ५० हजार ६९२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनची २४ लाख ६६ हजार ७६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या सोयाबीनवर नांदेड, धाराशिव व लातूर या तीन जिल्ह्यांत काही ठिकाणी अल्प प्रमाणात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला. याशिवाय धाराशिव व लातूर जिल्ह्यातील काही भागांत अल्प प्रमाणात ‘येलो मोझॅक’नेही डोके वर काढल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. खुद्द कृषिमंत्र्यांच्या पाहणीत बीड जिल्ह्यातही शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला होता हे विशेष.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १९ लाख ५० हजार ६९२ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील ३ लाख ७८ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रासह लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांतील १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्याचा अपवाद वगळता इतर सर्व जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊनच सोयाबीन पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आदी जिल्ह्यांत तर सर्वसाधारण क्षेत्राच्या दीड पट पेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली. काही जिल्ह्यांत शंखी गोगलगाय व ‘येलो मोझॅक’चे आक्रमण अल्प असले तरी शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे आहे.
कृषी विभागाकडून शंखी गोगलगायी नियंत्रणासाठी सूर्योदयापूर्वी अथवा सायंकाळी त्या गोळा करून नष्ट करणे, बांधाच्या बाजूने १० सेंटिमीटर रुंद चुन्याची फंकी मारणे, लहान शंखी गोगलगायीवर १० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करणे, बांधावर रिकामा बारदाना गुळाच्या पाण्यात बुडवून ठेवणे व त्याखाली जमा झालेल्या शंखी गोगलगायी नष्ट करणे, आदी उपाय सुचविले जात आहेत.
काही शेतकऱ्यांना शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पुन्हा पेरावे लागले. आताही शिवारात काही प्रमाणात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. शिवाय सोयाबीनवर पान कुरतडणारी अळीही आक्रमण करते आहे.
- श्रीराम मोरे,
सारोळा मांडवा, वाशी, जि. धाराशिव
शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत असला तरी तो आताच्या घडीला खूप नुकसान करेल, अशा स्थितीत नाही. त्यावर नियंत्रणाचे उपाय शेतकऱ्यांना सुचविले आहेत. ‘येलो मोझॅक’ मे महिन्यात शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या सोयाबीनवर आढळून येतो आहे. खूप प्रादुर्भाव नसलेली रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करण्यासह इतरही उपाय सुचविले आहेत.
- अरुण गुट्टे, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.