Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड तीन जिल्ह्यांतील सर्वसाधारण २० लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १९ लाख ५१ हजार ८४० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. म्हणजे अजूनही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७ टक्के क्षेत्र पेरणी विना असल्याची स्थिती आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर, जालना जिल्ह्यात ६ लाख १९ हजार ६९५ हेक्टर तर बीड जिल्ह्यात ७ लाख ८५ हजार ७८६ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी ठरविण्यात आले होते.
परंतु प्रत्यक्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९१.२८ टक्के म्हणजे ६ लाख २५ हजार २५ हेक्टरवर, जालना जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९३.४९ टक्के म्हणजे ५ लाख ७९ हजार ३५४ हेक्टरवर तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९५.१२ टक्के म्हणजे ७ लाख ४७ हजार ४६० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
तीनही जिल्हे मिळून सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ३८ हजार ३५८ हेक्टर म्हणजे जवळपास ७ टक्के क्षेत्र अजूनही पेरणी विना असल्याची स्थिती आहे.
अशी आहे पीक स्थिती
खरीप ज्वारीचे पीक रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे. बाजरी पीकही रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे. मकाचे पीक उगवण व वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पीक रोप ते वाढीच्या अवस्थेत असून मूग पीक वाढीच्या तसेच फुलोराच्या अवस्थेत आहे.
उडीद पीक वाढीच्या अवस्थेत असून, भुईमूग पीक रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पीक रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीच्या तर काही ठिकाणी पाते लागण्याच्या अवस्थेत आहे.
किड-रोगांचे आक्रमण
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात कपाशी पिकावर काही ठिकाणी मावा, तुडतुडे आदी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. मका पिकावर काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. बीड जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर काही प्रमाणात उंट अळी व खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
पावसाची दांडी पिकाच्या मुळावर
अपेक्षित पाऊस नसल्याने छत्रपती संभाजी नगर जालना बीड या तिन्ही जिल्ह्यांतील पिकाच्या वाढीवर थेट परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तर पावसाने मोठी ओढ दिल्याने जमिनी भेगाळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. अपेक्षित नसलेला पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवतो आहे. दुसरीकडे कायम ढगाळ व दमट असणारे वातावरण किड-रोगांना पोषक ठरत असून पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ ही सहन करावी लागते आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.