राजकुमार चौगुलेः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar News : कोल्हापूर ः देशात यंदाच्या गळीत हंगामात (Crushing Season) ३३० ते ३३८ लाख टनांपर्यंत साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज ॲग्रीमंडी लाईव्ह या संस्थेने वर्तविला आहे. हवामानाचा व पिकाचा अभ्यास करून संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे.
येत्या हंगामात भारतीय साखरेचे उत्पादन इथेनॉल डायव्हर्जनसह ३८७ लाख टनांपर्यंत पोहोचेल, असा कयास आहे. इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर ५० ते ५५ लाख टन दरम्यान अपेक्षित आहे. निव्वळ साखर उत्पादनाचा अंदाज ३३३ ते ३३८ लाख टन आहे.
महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १३१ लाख टन होणे अपेक्षित आहे. यापैकी १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळल्यास निव्वळ उत्पादन ११३ लाख टनाच्या आसपास होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत साखर उत्पादनात तफावत निर्माण झाली. २०२१-२२ मध्ये १३० टनांवर साखर उत्पादन झाले. तर गेल्या हंगामात १०५ लाख टनापर्यंतच साखर तयार झाली.
गेल्या वर्षात अतिपावसाचा फटका उसाला बसला. सध्या याच्या उलट स्थिती आहे. अजूनही ऊस उत्पादक प्रदेशात पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा उसाचे उत्पादन नेमके किती होईल, याबाबतचा अंदाज अद्याप साखर उद्योगाला आलेला नाही. महाराष्ट्रात यंदाही उसाखालील क्षेत्र साधारणपणे गेल्या वर्षी इतकेच आहे.
उत्तरप्रदेशात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात फारसा फरक पडलेला नाही. गेल्या चार वर्षात १०० ते १०५ लाख टन साखर तयार झाली.
उत्तर प्रदेशात यंदाही साखर उत्पादनाची स्थिती काहीशी तशीच राहील. कर्नाटकातही गेल्या वर्षी इतकेच साखर उत्पादन राहील, असा अंदाज आहे.
५० लाख टन साखर इथेनॉलकडे?
गेल्या काही वर्षांपासून इथेनॉलची निर्मिती वाढविण्यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी ४५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात आली होती.
यंदा यात वाढ होऊन साखर इथेनॉलकडे वळविण्याचे प्रमाण ५० लाख टनांहून अधिक होऊ शकते, असा असा अंदाज आहे.
पावसाचा होणार उत्पादनावर परिणाम
काही संस्थानी साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यास प्रारंभ केला असला तरी सगळे अंदाज पावसावरच अवलंबून आहेत. भारतीय हवामान खात्याने सामान्य मॉन्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. पूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैमध्ये पावसाने सुरवात केली.
ती पण ती अजूनतरी आश्वासक नसल्याची स्थिती आहे. साखर उद्योगातील देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्थांनी हवामान विभागाची पावसाबाबतची माहिती गृहीत धरुन साखरेचे अंदाज वर्तविले आहेत.
पण एखाद्या पंधरवड्यात अतिपाऊस झाल्यास किंवा अवर्षण पडल्यास साखर उत्पादनाचे अंदाज बदलू शकतात, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.