Irrigation
Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Irrigation : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११ हजार कोटी

टीम ॲग्रोवन

मुंबई : उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळी (Drought) तालुक्यांना संजीवनी ठरणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी (Krushna Marathwada Irrigation Project) ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.

या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२३ पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील २४ हजार हेक्टर क्षेत्री सिंचनाखाली येईल, असा दावा करण्यात येत आहे. या प्रकल्पास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांतील अवर्षणप्रवण क्षेत्रातील १३३ गावांतील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणे अपेक्षित आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळ, औरंगाबादअंतर्गत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याच्या भागात प्रस्तावित असून प्रथम टप्प्यात ७ अब्ज घन फूट व दुसऱ्या टप्प्यात १६.६६ अब्ज घन फूट असे एकूण २३.६६ अब्ज घन फूट पाणी वापर आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.

या प्रकल्पातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना क्रमांक एक व दोनची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, त्यांना गती मिळाली नव्हती. या प्रकल्पाचे द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक फडणवीस सरकारच्या काळात ऑगस्ट २०१९ रोजी तयार झाले होते. त्याची तपासणीही राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून झाली. मात्र, त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती.

सुरेवाडा उपसा सिंचन योजनेसाठी ३३६ कोटी

भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पासाठी ३३६ कोटी, २२ लाख सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील २७ व गोंदिया जिल्ह्यातील १ अशा २८ गावांतील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतील असा दावा करण्यात आला आहे. सुरेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर हा प्रकल्प बांधण्यात येत असून यासाठी ३८.६२५ दलघमी पाणी उपलब्ध आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

SCROLL FOR NEXT