Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : एक कोटी ४ लाख शेतकरी पीक विमा योजनेत

Team Agrowon

Mumbai News : राज्यात २४ जुलैअखेर एक कोटी ४ लाख ६८ हजार ३४९ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाल्याची माहिती कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी विधान परिषदेत दिली. मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची सूचना विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी विधान परिषद नियम ९३ अन्वये मांडली. या निवेदनावर मुंडे यांनी उत्तर दिले.

मंत्री मुंडे म्हणाले, ‘महाराष्ट्रात पाऊस जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार राज्यात मॉन्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी २०२३ मध्ये ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मॉन्सूनचे आगमन झाले. २५ जून, २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सून पर्जन्यमानाने व्यापला आहे. राज्यात जूनचे सरासरी पर्जन्यमान २०७.६ मिमी असून प्रत्यक्षात १११.३ मिमी (सरासरीच्या ५४ टक्के) पाऊस पडला.

राज्यात १ जून ते २३ जुलैपर्यंत सरासरी पाऊस ४५३.१ मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस ४४१.५ मिमी आहे (सरासरी २७.४ टक्के). मराठवाड्यात जूनचे सरासरी पर्जन्यमान १३४.० मिमी असून प्रत्यक्षात ५५.५ मिमी पाऊस पडला (सरासरीच्या ४१.४ टक्के), मराठवाड्यात १ जून ते २३ जुलै पर्यंत सरासरी पाऊस २७२.१ मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस २५१.१ मिमी आहे (सरासरी ९२.३ टक्के). राज्याचे सरासरी पेरणी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर आहे.

२३ जुलैअखेर राज्यात ११४.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ८० टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत १२७.१२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मराठवाडा विभागाची सरासरी पेरणी क्षेत्र ४८.५७ लाख हेक्टर आहे. २३ जुलैअखेर मराठवाड्यात ४२.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ८८ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत ४५.३३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

पीकनिहाय पेरणी (२३ जुलैअखेर)

सोयाबीन ४३.८७ लाख हेक्टर (१०६ टक्के)

कापूस ३९.७९ लाख हेक्टर (९५ टक्के)

तूर ९.६७ लाख हेक्टर (७५ टक्के)

मका ६.६४ लाख हेक्टर (७५ टक्के)

उडीद १.६२ लाख हेक्टर (४४ टक्के)

मूग पिकाची १.३९ लाख हेक्टर (३५ टक्के)

पीक आराखडा तयार करणार

नियमित मॉन्सून पाऊस वेळेत सुरू न झाल्यास पिकांच्या नियोजनामध्ये पिकाचे वाण, खत व्यवस्थापन आणि अन्य बाबींवर होणारा परिणाम लक्षात घेता कृषी विद्यापिठे, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रांना पीक आराखडा तयार करण्याची सूचना दिल्याचेही कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षण प्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशिरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते.

खरीप हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य तसेच तृणधान्य इत्यादी पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी पिकांच्या नियोजना बाबत शिफारशी केलेल्या आहेत.

नियमित मौसमी उशिरा सुरू झाल्यास परिस्थितीत पिकांचे नियोजनामध्ये पिकांचे वाण, खत व्यवस्थापन तसेच रोपांच्या प्रतिहेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो, अन्यथा प्रतिहेक्टरी उत्पादन कमी येते. यासाठी जिल्हा स्तरावर कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्रे व कृषि विज्ञान केंद्रे यांच्या सल्ल्याने जिल्ह्याचा पिक आपत्कालीन पीक आराखडा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत केळी दर

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीला गती नाहीच

Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्‍न कायम

Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

SCROLL FOR NEXT