Agriculture Warehouse License : गोदाम पावती विषयक योजनेच्या अंमलबजावणीकरता गोदाम परवाना

Warehouse Business : गोदामाचा व्यवसाय करू इच्छिणारी व्यक्ति एकापेक्षा जास्त गावात किंवा शहरात गोदाम व्यवसाय करू इच्छित असेल तर गोदाम परवाना घेण्यासाठी अशा प्रत्येक गावात किंवा शहरात त्याच्या व्यवसायाच्या परवान्यांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावे लागतील.
warehouse
warehouseAgrowon

Agriculture Warehouse : शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company), सहकारी संस्था व महिला बचत गटाचे फेडरेशन या सर्व समुदाय आधारित संस्थांनी विविध योजनांमधून उभारलेल्या गोदामांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करण्यासाठी गोदाम भाड्याने देऊन त्यातून कर्जाचे हप्ते भरणे शक्य होणार नाही.

त्याकरिता गोदाम पावतीच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करण्यासाठी व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्जासाठी गोदाम परवाना सहकार विभागांतर्गत कार्यरत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून घेणे आवश्यक आहे.

याकरिता मुंबई वखार कायदा १९५९ मधील अधिनियम ५ सन १९६० अन्वये गोदाम परवाना प्रक्रिया करताना व गोदाम परवाना घेतल्यानंतर खालील नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याने मुंबई वखार कायद्याचे आकलन करणे आवश्यक आहे.

१) मुंबई वखार कायदा १९५९ कलम ४ अन्वये गोदाम परवाना काढण्यासाठी आणि नूतनीकरण करण्यासाठी कलम ६ अंतर्गत अनुक्रमे फॉर्म क्रमांक १ अन्वये नवीन गोदाम परवाना आणि फॉर्म क्रमांक २ मध्ये डुप्लिकेट गोदाम परवाना प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करून अर्जावर अर्जदार आणि त्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

२) गोदाम परवाना प्रत्येक वर्षी नूतनीकरण करणे आवश्यक असून वर्ष सुरू होण्याच्या किमान एक महिना अगोदर अर्ज सादर करून सोबत नियम क्रमांक ४ अन्वये शुल्क भरणे आवश्यक आहे.

३) गोदामाचा व्यवसाय करू इच्छिणारी व्यक्ति एकापेक्षा जास्त गावात किंवा शहरात गोदाम व्यवसाय करू इच्छित असेल तर गोदाम परवाना घेण्यासाठी अशा प्रत्येक गावात किंवा शहरात त्याच्या व्यवसायाच्या परवान्यांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावे लागतील.

समजा एकाच गावात किंवा शहरात एकापेक्षा जास्त गोदाम व्यवसायाची ठिकाणे असल्यास, अशी व्यक्ति त्यापैकी त्याचे कोणते व्यवसायाचे प्रमुख ठिकाण असेल, अशा सर्वांसाठी फक्त एकच परवाना घेण्यासाठी अर्ज करू शकतो.

warehouse
Agriculture Warehouse : गोदाम परवान्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता

४) गोदाम परवाना मंजूर करण्यासाठी शुल्क

एखाद्या गोदामाला त्याच्या व्यवसायाचा परवाना मंजूर करण्यासाठी निर्धारित वार्षिक शुल्काचे प्रमाण (रु...... करिता २५,००० घनफूट पर्यंत साठवण क्षमता असलेले गोदाम त्यानंतर . . . प्रत्येक अतिरिक्त २५,००० घनफूट साठी साठवण क्षमता) कलम ४ अन्वये असावे. प्राधिकरणाकडून यातील शुल्कात वेळोवेळी बदल अपेक्षित आहेत.

५) गोदाम परवाना अटी

गोदाम परवाना घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर गोदाम परवानाधारकाने खालील बाबींचे पालन करावे.

अ) प्रत्येक गोदामधारकाने कृषी उत्पादन (विकास आणि गोदाम) कॉर्पोरेशन अॅक्ट, १९५६ अंतर्गत स्थापन केलेल्या महामंडळाव्यतिरिक्त ज्या गोदामाच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे, अशा प्रत्येकाच्या संदर्भात स्थावर मालमत्तेची किंमत ही गोदाम व्यवसायापासून उद्भवलेल्या कोणत्याही कर्जाचा भरणा करण्याच्या अनुषंगाने गोदाम परवानाधारकाने गोदामाच्या साठवण क्षमतेचे मूल्यांकन किमान रु.. १० प्रति १०० घनफूट पर्यंत असेल असे पहावे.

याकरिता गोदाम परवानाधारकाने त्याच्या कंपनीच्या किंवा संस्थेच्या इतर इमारती, यंत्रसामग्री यांचा या मालमत्तेत समावेश करून आग, घरफोडी आणि चोरीमुळे होणारे नुकसान किंवा नुकसानीपासून बचाव करण्यासाठी त्यांचा विमा उतरविणे आवश्यक आहे.

ब) गोदाम परवाना मिळाल्यावर लगेचच गोदाम मालक त्याच्या व्यवसायाच्या मुख्य ठिकाणी व एका सुस्पष्ट ठिकाणी जेथे अशा गोदामाने दिलेल्या पावत्या ठेवीदारांना दिल्या जातात अशा दर्शनी भागावर फलक लावेल.

क) एखादी अप्रिय घटना घडल्यास गोदामधारकाने त्याला माहीत असलेले तपशील ताबडतोब विहित प्राधिकरणाकडे देणे, हे गोदाम परवानाधारकाचे कर्तव्य असेल.

ड) प्रत्‍येक गोदाम परवानाधारकाने वखार कायद्यातील अधिनियमांतर्गत, गोदामाची तपासणी करण्यासाठी त्याच्याद्वारे नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला कोणत्याही व्यावसायिक दिवशी व्यवसायाच्या नेहमीच्या तासांमध्ये,गोदामात प्रवेश करणे, त्याचे कार्यालय, त्यासंबंधीची पुस्तके, नोंदी, कागदपत्रे, खाती, सामग्री यांची तपासणी करणे किंवा परीक्षण करणे याकरिता परवानाधारक परवानगी देतील.

६) गोदाम व्यवसाय आर्थिक संरक्षण

कृषी उत्पादन (विकास आणि गोदाम) कॉर्पोरेशन कायदा, १९५६, अंतर्गत स्थापन केलेल्या कॉर्पोरेशन व्यतिरिक्त प्रत्येक गोदामधारकाने परवाना अर्ज सादर करण्याच्या वेळी खालील बाबींचे पालन करावे.

१) गोदाम परवानाधारकाने गोदाम परवाना घेताना विहित प्राधिकाऱ्याकडे सुरक्षा अनामत रक्कम फॉर्म क्रमांक ४ मध्ये माहिती भरून जमा करणे आवश्यक आहे.

ब) तसेच १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामीनदारांच्या स्वाक्षरीसह व विहित सुरक्षा अनामत रकमेसह अर्ज सादर करावा.

७) गोदाम परवाना कालावधी

गोदाम परवाना ज्या तारखेपासून विहित प्राधिकरणाने (जिल्हा उपनिबंधक कार्यालय/वखार विकास व नियामक प्राधिकरण) लागू केला असेल त्या तारखेपासून सप्टेंबरच्या ३०व्या दिवशीपर्यंत किंवा पुढील तीन वर्षांपेक्षा जास्त नसलेला कालावधी की जो ३० सप्टेंबरला समाप्त होईल पर्यन्त वैध असेल.

८) गोदाम परवाना नूतनीकरण आणि डूप्लिकेट परवाना देणे:

अ) गोदामपरवान्याचे नूतनीकरण आणि डुप्लिकेट परवाना देण्याच्या अटी या प्राधिकरणाच्या प्रक्रियेमध्ये नमूद केल्यानुसार पाळण्यात येतात. अर्जदाराने फॉर्म क्रमांक ५ नुसार अर्ज केल्यानंतर पूर्वीच्या सर्व बाबी तपासून त्यांना पुन्हा परवाना दिला जातो आणि त्यावर "डुप्लिकेट" असा शिक्का मारला जातो.

ब) गोदाम परवाना धारकाकडील परवाना फाटलेला, विद्रूप केलेला किंवा अपात्र ठरलेला परवाना असेल तर तो गोदामाच्या मालकाने विहित प्राधिकरणाकडे (जिल्हा उपनिबंधक कार्यालय) जमा करावा.

क) डुप्लिकेट परवान्यासाठी अर्ज विहित प्राधिकरणाकडे (जिल्हा उपनिबंधक कार्यालय) प्राप्त झाल्यानंतर, परवाना हरवला किंवा नष्ट झाला याचे कारण तपासून किमान एकदा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन एक आठवड्याचा कालावधी देऊन ड्यूप्लिकेट परवाना देण्यापूर्वीची प्रक्रिया राबविली जाते. या करिता स्थानिक वर्तमानपत्रातील जाहिरात देण्यासाठी येणारा खर्च गोदाम परवाना धारकाकडून वसूल केला जातो.

warehouse
Warehouse Management : गोदाम व्यवस्थापनच्या कश्या करणार उपाययोजना?

९) नूतनीकरण आणि डुप्लिकेट परवाना करिता शुल्क

गोदाम नूतनीकरण आणि ड्यूप्लिकेट परवाना देण्यासाठीचे शुल्क कलम ६ अंतर्गत नमूद केल्यानुसार तसेच नियम ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल आणि डुप्लिकेट परवाना जारी करण्यासाठीचे शुल्क कलम १२ अंतर्गत नमूद केल्यानुसार असेल.

१०) गोदाम परवाना, निलंबन आणि परवाने रद्द करणे तसेच गोदामांची यादी बाबतचे प्रकाशन

मुंबई वखार कायद्यांतर्गत १ ऑक्टोबर पर्यन्त परवाना मिळालेल्या गोदामधारकांचे पत्ते, गोदामांची नावे, स्थान दरवर्षी १५ नोव्हेंबरपूर्वी अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात येतात. त्यानंतरच्या परवाने निलंबन किंवा रद्द करणे बाबतची यादी देखील अधिकृत राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात येते.

११) शेतमाल अथवा वस्तु जमा करण्यासाठी आणि वितरणासाठी गोदाम मालकाकडे अर्ज

शेतमाल अथवा वस्तू जमा करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ नुसार अर्ज करण्यात येतो व वितरणासाठी फॉर्म क्रमांक ७ नुसार अर्ज करावा.

१२) गोदाम पावती

गोदामात शेतमाल अथवा वस्तू जमा केल्यानंतर गोदामधारकाकडून गोदाम पावती दिली जाते. त्या पावतीमध्ये खालील प्रमाणे तपशील नमूद केलेला असतो.

(अ) गोदाम पावती फॉर्म क्रमांक ८ मध्ये देण्यात येते. त्यात खालील बाबी नमूद असतात.

तपशील

(१) गोदामाचे स्थान ज्या ठिकाणी शेतमाल/वस्तू साठविल्या जातात.

(२) ज्या व्यक्तीद्वारे किंवा कोणाच्या वतीने माल दिला जातो अथवा साठवला जातो त्याचे नाव.

(३) गोदाम पावती ज्या दिवशी दिली ती तारीख.

(४) साठवणुकीचा दर, वजन आणि हाताळणी शुल्क.

(५) साठवणूक केलेल्या शेतमालाचे अथवा वस्तूंचे वर्णन, वजन आणि प्रमाण.

(६) ठेवीदाराने नियम क्रमांक ११ अंतर्गत ठेवींच्या अर्जात घोषित केलेल्या मालकीबाबतचा तपशील, धारणाधिकार किंवा गहाणखत इत्यादी तपशील पावतीमध्ये समाविष्ट.

(७) गोदाम पावतीवर " हस्तांतरणीय " किंवा " अहस्तांतरणीय" ची मोहोर अथवा शिक्कामोर्तब.

(८) गोदामाच्या मालकाची किंवा त्याच्या अधिकृत एजंटची अथवा गोदाम व्यवस्थापकाची स्वाक्षरी.

१३) गोदामचालकाची शेतमालाच्या गोदाम पावतीबाबत जबाबदारी

मुंबई वखार कायदा १९५९ नियम १२ नुसार ज्या गोदाम मालकास ‘ हस्तांतरणीय' किंवा ‘अहस्तांतरणीय' गोदाम पावती देण्याच्या तरतुदींमधून वगळण्यात आले असेल, आणि ही बाब ठेवीदारास माहिती नसेल अशा वेळेस ठेवीदारांच्या झालेल्या नुकसानीसाठी गोदाममालक जबाबदार असेल.

१४) गोदाम पावती वर सही करण्यास अधिकार दिलेल्या व्यवस्थापकाबाबत

वखारदाराने अथवा गोदाममालकाने विहित केलेल्या कार्यालयात नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे आणि पत्त्यांशी संबंधित माहिती प्राधिकरणास (जिल्हा उपनिबंधक कार्यालय/वखार विकास व नियामक प्राधिकरण) सादर करावी.

गोदाम मालकाने स्वत:च्या वतीने अधिकृत केलेल्या व्यक्तींच्या वतीने पावत्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकार प्रदान केल्याबाबतची माहिती सुद्धा प्राधिकरणास तत्काळ सादर करावी.

तसेच अशा व्यक्ती बदलल्या गेल्यास अधिकृत व्यक्ती नवीन असल्यास त्याबाबतची माहिती शक्य तितक्या लवकर प्राधिकरणास देण्यात यावी व त्यांच्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे देखील पुरविण्यात यावी.

warehouse
Agricultural Warehouse : गोदाम पावती योजनेचे कामकाज कसे चालते?

१५) डुप्लिकेट गोदाम पावती देणे

काही वेळेस ठेवीदाराकडून गोदाम पावती गहाळ होऊ शकते, अशा वेळेस कायद्यात ड्यूप्लिकेट पावतीबाबत खालील प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.

(१) मूळ गोदाम पावती फाटली, विद्रूप झालेली अथवा हरविली असल्यास डुप्लिकेट पावतीची मागणी करण्यासाठी ठेवीदाराने गोदामाच्या मालकाकडे अर्ज सादर करणे आवश्यक असून सोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

(अ) अर्जदार कायदेशीररीत्या पात्र आहे हे दर्शविणारे प्रतिज्ञापत्र की ज्यात मूळ पावतीचा ताबा अर्जदाराकडे होता आणि त्याने याबाबत कोणतीही वाटाघाटी केलेली नाही किंवा, ज्या परिस्थितीत मूळ पावती हरवली किंवा नष्ट झाली आणि ती शोधण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले गेले, परंतु पावती शोधण्यास अपयश आले असल्याबाबत परिस्थितीनुरूप पुरावा नमूद करणे आवश्यक,

(ब ) शेतमाल अथवा वस्तूंच्या किमतीएवढ्या रकमेचा अथवा मूळ पावती द्वारे प्रस्तुत रकमेचा बॉण्ड सादर करणे आवश्यक

(क) एकूण मालाच्या किमतीच्या मुल्याएवढया रुपयाची रक्कम.

(२) प्राधिकरणास ड्यूप्लिकेट गोदाम पावतीबाबत अर्ज मिळाल्यावर डुप्लिकेट पावती देण्यासाठी, पावती हरवल्याची वस्तुस्थिती, पावती नष्ट होणे, पावती फाटणे, विद्रूप होणे याबाबत स्थानिक वर्तमानपत्रात किमान एका आठवड्याची स्पष्ट सूचना देऊन सूचित करणे आवश्यक असते. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या अशा सूचनेचा खर्च ठेवीदाराद्वारे किंवा गोदाम पावती धारकाद्वारे उचलला जाणे अपेक्षित.

(३) उप-नियम(२)मध्ये नमूद केलेला गोदाम पावतीचा कालावधी संपल्यानंतर गोदाम व्यवस्थापकाने डुप्लिकेट पावती जारी करून त्यावर ‘डुप्लिकेट पावती‘ असा शिक्का मारणे आवश्यक.

(४) डुप्लिकेट पावत्या दिल्यानंतर, मूळ पावत्या सादर केल्यास, त्या ग्राह्य धरण्यात येणार नाही.

१६) हस्तांतरणासंबंधी माहिती पुरवण्यासाठी ठेवीदाराकडील पावत्या

प्रत्येक ठेवीदार त्याच्या स्वाक्षरी केलेल्या गोदाम पावतीच्या प्रती हस्तांतरण, गहाण किंवा बोजा म्हणून ठेवण्यास तसेच मान्यता देण्यास जबाबदार असेल.

१७) गोदाम पावतीचे दर आकारणी बाबत

(१) कोणताही गोदामधारकामार्फत त्याच्या सेवांसाठी त्याच्याद्वारे परवान्यासाठी दाखल केलेल्या गोदाम परवाना अर्जामध्ये नमूद दरपत्रकापेक्षा जास्त आणि प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी मंजूर शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही किंवा वसूल करू शकणार नाही.

(२) नियम क्रमांक ३५ नुसार आणीबाणीच्या परिस्थितीत गोदाम मालकास आवश्यकता असताना किंवा आवश्यकतेनुसार गोदामातून माल काढणे किंवा हस्तांतरित करणे, या करिता स्टोरेज शुल्क किंवा शेतमाल तारण शुल्क ठेवीदाराकडून वसूल केले जाईल परंतु अशा वस्तू अथवा शेतमाल हस्तांतरित करण्याची किंमत अथवा खर्च गोदामाच्या मालकामार्फत उचलला जाईल.

१८) शुल्काच्या वेळापत्रकाचे प्रदर्शन

प्रत्येक गोदामचालकाने प्राधिकरणाने मंजूर केलेल्या गोदाम पावतीच्या विहित शुल्काचे वर्तमान/सध्याचे/ चालू दरपत्रक स्पष्टपणे मुख्य ठिकाणी/गोदामातील दर्शनी ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये (इंग्लिश, हिंदी, मराठी व गरजेनुसार इतर भाषा) प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

१९) गोदामाची देखभाल

प्रत्येक गोदामाने आपले गोदाम खालील प्रमाणे व अटींच्या अधीन राहून व्यवस्थित ठेवावे.

(१) गोदाम ओलसरपणापासून मुक्त, पशू-पक्षापासून सुरक्षित आणि उंदीर- घुशीपासून सुरक्षित असावे;

(२) गोदामाची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आवश्यक असून त्यात निर्जंतुकीकरण प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे;

(३) गोदामात साठवलेल्या मालाची उत्तम व्यवस्था करणे अपेक्षित असून शेतमाल अथवा वस्तु अशा रीतीने गोदामात ठेवावे लागेल की जेणेकरून साठ्याचे स्टॉक-टेकिंग/साठा नोंदणी आणि त्याची सत्यता पडताळून पाहणे सोपे होऊ शकेल.

(४) गोदामातील पोत्यांचे स्टॉक अथवा पोत्याची रचना/थप्पी गोदामाच्या भिंतीला स्पर्श न करता रचून ठेवणे गरजेचे असून सर्व बाजूने किमान २ फूट अंतर सोडणे आवश्यक आहे.

warehouse
Warehouse Scheme : शेतकरी कंपन्यांना गोदाम पावतीआधारे व्यवसाय उभारणी

(५) गोदामात साठवणुकीसाठी प्राप्त झालेल्या मालाचे वजन क्युबिक फुटामध्ये (लांबी ,रुंदी आणि उंची) मोजण्यात येऊन साठविण्यात आलेल्या मालाचे वजन करणे अपेक्षित असून हे वजन आणि साठवणूक क्षमता अधिकृत किंवा परवानाधारक वजनमाप अधिकाऱ्यामार्फत तपासणे आवश्यक आहे. तसेच हे वजन व मोजमाप संबंधित गोदामावर दर्शनी भागात लिहावे अथवा शेतमालाच्या पोत्याच्या स्टॉकवर अथवा थप्पीला वजन किंवा मापाच्या तपशीलासह वेळ व तारखेसहित लेबल लावण्यात यावे.

(६) गोदाम व शेतमालाच्या पोत्याच्या थप्पीला विशिष्ट रंगाचे लेबल लावून ठळक अक्षरात ठेवीदाराचे नाव व इतर तपशील लिहिण्यात यावा.

(७) विविध वर्गाच्या किंवा दर्जाच्या किंवा गुणांच्या वस्तू अथवा शेतमाल वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे साठविले जावेत;

(८) पावसाळ्यात छतामधील सर्व प्रकारच्या गळती, भिंती आणि मजल्यांमध्ये आलेला ओलसरपणा, काळजीपूर्वक तपासून त्याची योग्य वेळेत दुरुस्ती करावी;

(९) गोदामातील सर्व उपकरणे, जसे की वजनकाटा, वजनमाप, आणि शिड्या योग्यरीत्या व सुस्थितीत असावेत.

(१०) गोदाम पावती व्यवसाय प्रक्रियेत अथवा गोदाम व्यवसायात विहित केलेल्या इतर कोणत्याही अटी व शर्ती वेळोवेळी प्रसारित करणे आवश्यक असून त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

२०) शेतमालाला इजा होण्यापासून खबरदारी

प्रत्येक गोदाम मालकाने आपल्या गोदामात साठवून ठेवलेला माल नेहमी स्वच्छ, किटकापासून सुरक्षित, काडी कचऱ्यापासून मुक्त तसेच उगाचच साठलेला अनावश्यक कचरा की ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढू शकतो या पासून मुक्त असावा.

संपर्क : प्रशांत चासकर,९९७०३६४१३०, (शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com