Water Testing : सिंचनाच्या पाण्याची तपासणी आवश्यक

जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये पाण्याद्वारे पिकांस उपलब्ध होतात. पाण्याच्या गुणवत्तेवर अन्नद्रव्ये उपलब्धतेचे प्रमाण अवलंबून असते. पाणी परीक्षण केल्यामुळे योग्य सिंचन व्यवस्थापन करण्यास मदत होते. परिणामी, पीक उत्पादनातही भर पडते.
Irrigation
IrrigationAgrowon

प्रा. डी. डी. देसाई, डॉ. जी. डी. साकोरे

सिंचनासाठी (Irrigation) परीक्षण (Water Testing) न करता वापरलेल्या पाण्याचे पिकांच्या वाढीवर, जमिनीच्या गुणधर्मावर तसेच उत्पादन क्षमतेवर (Productivity) विपरीत परिणाम दिसून येतात. अनेक ठिकाणी जमिनी क्षारयुक्त (Salted) होऊन त्यांची उत्पादन क्षमता कमी झालेली पाहायला मिळते. त्यात मध्यम काळ्या तसेच काळ्या जमिनीत पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन (Water Management), कालव्यांचे सदोष व्यवस्थापन तसेच पाणी गुणवत्तेविषयक ज्ञानाचा अभाव या बाबींची भर पडली आहे. ही समस्या मुख्यत्वेकरून पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात जास्त भेडसावत आहे. चिकणमाती असणाऱ्या जमिनीत ही समस्या तीव्र प्रमाणात भेडसावत आहे.

Irrigation
Drip Irrigation: ठिबक सिंचन अनुदानात केला लाखोंचा घोटाळा

का करावे पाणी परीक्षण ः

शेतीमध्ये सिंचनासाठी प्रामुख्याने कालवे, विहिरी, तलाव, बोअरवेल अशा विविध स्रोतांतील पाणी वापरले जाते. प्रत्येक पाण्याची गुणवत्ता ही वेगवेगळी असते. पाण्याची गुणवत्ता सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, पिकाची विम्लता सहन करण्याची क्षमता, सोडिअम स्थिरीकरण गुणोत्तर यावर अवलंबून असते. काही ठिकाणच्या पाण्यात उपयुक्त तर काही ठिकाणी हानिकारक क्षार असतात. भूगर्भातील पाण्याचा झरा क्षारयुक्त खडकातून वाहत असल्यास अशा पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असते. असे पाणी निचरा कमी होणाऱ्या जमिनीत सिंचनासाठी वापरल्यास वातावरणामुळे हे क्षार जमिनीच्या वरच्या थरात जमा होतात. कालांतराने जमीन क्षारपट दिसू लागते.

पाण्याचा नमुना घेण्याची पद्धत ः

सिंचनासाठी पाण्याचे परीक्षण करताना प्रातिनिधिक पाण्याचा नमुना घेणे आवश्यक असते. पाणी हे नदी, विहीर, तलाव किंवा कालवा अशा कोणत्याही स्रोतातील असले तरी नमुना घेताना योग्य पद्धतीने घेणे आवश्यक असते.

- विहिरीतील पाण्याचा पाणी नमुना घेताना मध्यभागी काही बादल्या पाणी उपसून टाकल्यावर घेणे.

- बोअरवेलमधील पाण्याचा नमुना घेण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे पंप सुरू ठेवावा. त्यानंतर पाण्याचा नमुना घ्यावा.

- तलाव, नदी, ओढा अशा वाहत्या पाण्यातून तपासण्यासाठी नमुना घेताना मध्यभागी बादलीने दोन तीनदा विसळून नंतर नमुना घ्यावा.

- तपासणीसाठी सर्वसाधारणपणे १ लिटर पाण्याचा नमुना पुरेसा होतो.

नमुना घेताना घ्यावयाची काळजी ः

- पाण्याचा नमुना बाटलीत भरण्यापूर्वी बाटली त्याच पाण्याने २ ते ३ वेळा चांगली धुऊन घ्यावी.

- बाटली स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा निरमा असे काही वापरू नये.

- कीटकनाशके, तणनाशके यांच्या रिकाम्या बाटल्या नमुना घेण्यासाठी वापरू नयेत.

- कोणत्याही धातूपासून बनवलेली बाटली नमुना घेण्यासाठी वापरू नये.

- काचेची किंवा प्लॅस्टिक बाटली नमुना घेण्यासाठी वापरावी.

- नमुना घेतल्यानंतर २४ तासांच्या आत तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. अन्यथा पाण्यात भौतिक, रासायनिक व जैविक बदल घडण्याची शक्यता असते.

नमुना घेतलेल्या बाटलीवर खालील बाबी असाव्यात ः

- शेतकऱ्याचे नाव आणि संपर्क क्रमांक

- गाव, तालुका, जिल्हा

- नमुना घेतलेला पाण्याचा स्रोत (विहीर, नदी किंवा तलाव इ.)

- नमुना घेतल्याची तारीख

- मागील हंगामातील पीक

- वापरलेल्या रासायनिक खतांची नावे.

पाण्याची प्रत ठरणारी प्रमाणके ः

सर्वसाधारणपणे पाण्यातील क्षारांची तीव्रता, पाण्यातील एकूण क्षारांचे प्रमाण, सोडिअम स्थिरीकरणाचे गुणोत्तर, पिकांची विम्लता सहन करण्याची शक्ती, जमिनीचे रासायनिक व भौतिक गुणधर्म या सर्व गोष्टी पाण्याची उपयुक्तता ठरविताना विचारात घेतल्या जातात.

Irrigation
Water Management : पाऊस पाण्याचे योग्य नियोजन

१) क्षारता किंवा विद्राव्य क्षार

२) सोडिअम स्थिरीकरणाचे गुणोत्तर

३) रेसिड्युअल सोडिअम कार्बोनेट

४) बोरॉनचे प्रमाण

५) क्लोराइडचे प्रमाण

६) नायट्रेटचे प्रमाण

७) फ्लुराईडचे प्रमाण

सिंचनासाठी वापरले जाणाऱ्या पाण्यातील दोष ः

१) क्षारांचे अति प्रमाण ः

- पिकांना पाणी दिल्यानंतर त्यातील काही भाग पीक मुळामार्फत शोषून घेतात.

- काही पाणी जमिनीत मुरते तर काही पाण्याचे बाष्पीभवन होते.

- बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याच्या क्षाराचे कण जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होण्यास सुरुवात होते. असे कण वर्षानुवर्षे साचल्याने जमीन क्षारपड होते. परिणामी, जमिनीची उत्पादकता कमी होते.

- पाण्याचा निचरा न झाल्याने पिकाची मुळे जळून जातात. त्यांची वाढ मंदावते.

२) सोडिअमचे अति प्रमाण ः

- सोडिअम क्षाराचे लहान कण जमिनीच्या पृष्ठभागाकडून शोषले जातात.

- जास्त प्रमाणात सोडिअम जमिनीतील लहान लहान भेगा भेगा मुजवितो. त्यामुळे जमिनीत पाणी झिरपण्याची क्रिया बंद होते.

- जमीन अत्यंत चिकट बनते. जमिनीतील हवेचे प्रमाण खूप कमी होते. अशी जमीन वाळल्यावर अतिशय टणक बनते.

- जमिनीतील पीक अचानक पिवळे पडून जळून जाते.

- जमिनीत सोडिअमचे प्रमाण जास्त असेल तर परीक्षण केल्यानंतर उपलब्ध पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे.

- खारट म्हणजेच जास्त सोडिअमचे प्रमाण असलेले पाणी सिंचनासाठी वापरणार असल्यास, योग्य पीक पद्धतीची निवड करावी. विशेषतः क्षार सहनशील पिकांची लागवड करावी.

- खारट पाणी सिंचनासाठी वापरणार असलेल्या जमिनीत हेक्टरी ३० ते ४० किलो चांगले कुजलेले शेणखत वापरावे.

- शिफारशीप्रमाणे १५ ते २० टक्के बियाणे जास्त वापरावे.

- पिकांची लागवड सरी वरंब्यावर करावी. सफाट वाफ्यावर लागवड करणे टाळावे.

- सिंचनासाठी आधुनिक पद्धतींचा वापर करावा (उदा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन इ.)

- खारट पाण्याचे सोडिअम अधिशोषित गुणोत्तर हे २० पेक्षा जास्त तसेच मॅग्नेशिअम, कॅल्शिअमचे गुणोत्तर ३ पेक्षा जास्त आणि सिलिकाचे प्रमाण जास्त असल्यास पावसाळ्यात जमिनीत पाणी साठून राहते. अशा जमिनीत जिप्समचा वापर करून पिकाची संवेदनक्षमता वाढविता येते.

- जमिनीचे आरोग्य, गुणधर्म, जमिनीची खोली, खनिजाचे प्रमाण, सामू इत्यादी बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.

१) क्षारांना संवेदनशील पिके ः

संत्रा, मोसंबी, आंबा, बदाम, सफरचंद ही पिके क्षारयुक्त पाण्यात टिकत नाहीत. या पिकांना वारंवार पाणी दिल्यास त्यांची वाढ खुंटते. परिणामी उत्पादनात घट येते.

२) क्षारास मध्यम प्रतिकारक पिके ः

ऊस, डाळिंब, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कोबी, सूर्यफूल, कांदा, पपई, अंजीर इत्यादी.

३) क्षारांना प्रतिकार करणारी पिके ः

कापूस, नारळ, खजूर, धैंचा, बीट, ताग इत्यादी.

पाणी परीक्षण कुठे करता येईल?

शासकीय पाणी परीक्षण प्रयोगशाळा, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र (के.व्ही.के.), खासगी कृषी प्रयोगशाळा, शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत किंवा सहकारी तत्त्वावर आधारित लॅब, कृषी महाविद्यालय येथील माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा.

- डी. डी. देसाई, ७७६९९४५२७७

डॉ. जी. डी. साकोरे, ९४२०८६००५५

(श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com