सोयाबीनचं आमचं उत्पादन (Soybean Production) गतवर्षीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्के राहील, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. सुरूवातीला जादा पाऊस (Heavy Rainfall) झाला. सोयाबीनची पुरेशी वाढ झाली नाही. शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दिलेल्या तीन आठवड्याच्या ताणामुळे एकूण पिकांपैकी ३० टक्के सोयाबीनमध्ये बियाणे (Soybean Seeds) तयार झालेले नाही.
त्यानंतरच्या रोगाचा फटका सुस्थितीतील सोयाबीनलाही बसला. एकंदरीत उत्पादन खर्चही निघेल, असं वाटत नाही. कालपासून सोयाबीनची काढणी सुरू आहे. तीन एकर रानातील सोयाबीनचा ढीग गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्केच आहे. गतवर्षी काढणीचा दर ३१०० रुपये होता. यावर्षी सात बॅगला ३५ हजार रुपये दिले.
म्हणजेच बॅगच्या मागे १९०० रुपये वाढ झालीय. माझी त्याबद्दल तक्रार नाही. शेती हे असं एकमेव क्षेत्र आहे, जिथं मजूर त्यांच्या मजुरीचे दर ठरवतात. तरीही ते खूष नाहीत. सगळ्या महागाईचं ओझं शेतकऱ्यांनी उचलावं अशी त्यांची अपेक्षा आहे. यावर फार बोलण्यासारखं नाही.
मी मात्र या अनुभवातून नक्की धडा घेणार. या जूनपासून टप्प्याटप्प्याने धान्य पिकविणारी शेती बंद करणार. सोयाबीनचं क्षेत्र निम्म्यावर आणणार. म्हणजे काय ते माझं नक्की ठरलं की घोषित करतो. गुगलवर कालपासून बघतोय, शिरूर ताजबंद परिसरात अजिबात पाऊस दाखवत नाही.
सकाळी ऊन पडलं म्हणून कालच्या सोयाबीन ढिगावर झाकलेलं प्लॅस्टिक काढलं. दुपारी दोनच्या सुमारास गुगलवर बघितलं, दहा टक्के पाऊस दाखवत होतं. या अंदाजात पावसाचे चार थेंबही पडत नाहीत. उन्हाची तीव्रता बघून वाटत होतं की, पाऊस येईल. आकाशात विखुरलेले ढग दिसत होते.
ढिगावर झाकायला हवं, असा विचार मनात आला. तरीही अभ्यासिकेत येऊन बसलो. फक्त पाच मिनिटे झाले असतील, वामनचा फोन आला, पाऊस येईल असं वाटतं, चवाळं झाकू या. मी अक्षरशः ढिगाकडं पळतच गेलो. वामन आला होताच. आम्ही ताडपत्री झाकायची सुरुवात केली तोच जोरदार वारा सुटला.
दोन टोक आमच्या हातात आणि अख्खी ताडपत्री हवा भरल्याने उडत होती. बऱ्याच प्रयत्नानंतर ताडपत्री स्थिर करून दगड ठेवतोय तोच पाऊस सुरू झाला. आम्ही कशाबशा दोऱ्या बांधून वरच्या बाजूने आत पाणी जाणार नाही, याची व्यवस्था केली...पूर्ण भिजलो. एवढे हाल झाले की विचारता सोय नाही. दहा मिनिटांत पाऊस थांबला.
एक एकर रानावर काढलेलं सोयाबीन तसंच रानावर आहे. वाटलं पाऊस गेला. पण आताच जोरदार वाऱ्यासह अर्धा तास जोराचा पाऊस झालाय. हा पाऊस हातातोंडाशी आलेला अर्धामुर्धा घासही हिरावून घेणार असं दिसतंय.
मला खरोखरचं भीती वाटतेय छोट्या शेतकऱ्यांची. ते या संकटाला कसे तोंड देतील? कसं सहन करतील हे नुकसान! मी त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो. त्यांना हे संकट सहन करण्याची शक्ती मिळो! निसर्गाच्या या प्रकोपात शेतीचा निभाव लागणं कठीण आहे. आज मी स्वतःला भरपूर शिव्या देऊन घेतल्या! खरंच शेतकरी होणं ही भयंकर शिक्षा आहे.
महारुद्र मंगनाळे, रुद्राहट लातूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.