Climate Change : गारपीट : हंगामी हवामान बदलाची प्रक्रिया

गारपीट होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे काय? जागतिक तापमान वाढ किंवा वातावरण बदल यामुळे महाराष्ट्रामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढत आहे काय? गारा पडणे हा हवामान हंगामी बदल प्रक्रियेचा एक नियमित भाग आहे. यात अनैसर्गिक असे काहीच नाही.
Climate Change
Climate ChangeAgrowon
Published on
Updated on

डॉ.प्रल्हाद जायभाये

Maharashtra Weather: महाराष्ट्र हा भारतीय व्दिपकल्पाचा मध्यभाग असून विषुववृत्ताच्या अधिक जवळ येतो. यामुळे महाराष्ट्राच्या जमिनीपासून अवकाशात साधारणपणे एक ते दीड किलोमीटर उंचीवर किंवा त्याहून अधिक उंचीवर वातावरणाच्या थरांमध्ये सतत घुसळण चालू असते.

क्षणाक्षणाला तेथे बदल घडत असतात. या वातावरणीय बदलांमधील अतिशय अल्प बदल भूपृष्ठालगतच्या वातावरणाच्या स्तरांमध्ये पोहोचतात. त्यापैकी काही वातावरणीय तात्पुरत्या बदलांचा परिणाम हा भूपृष्ठावर येत असतो.

यामध्ये मुसळधार पाऊस, उष्णतेची किंवा थंडीची लाट, वादळी वारे किंवा वादळं, आणि त्यापैकीच एक गारपीट सुद्धा!

गारपीट म्हणजे काय ?

१) ‘गारपीट’ ( Hailstorm ) हा एक वातावरणीय अवक्षेपणाचा प्रकार आहे. ‘अवक्षेपण’ म्हणजे पाणी आणि पाण्याचे गोठण रूप. यामध्ये पाणी, पाऊस, बर्फ, गारा, धुके, सांद्रीभवनाचा थर आदी रूपे येतात.

परंतु प्रामुख्याने अवक्षेपणात पाऊस आणि बर्फ यांचाच विचार नेहमी केला जातो. परंतु अलीकडे ‘गारा’ या अवक्षेपणाच्या प्रकाराकडे आपले सर्वांचे लक्ष वेधले आहे.

२) गारपीट होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे काय? महाराष्ट्र गार प्रवण क्षेत्र होत आहे काय? जागतिक तापमान वाढ किंवा वातावरण बदल यामुळे महाराष्ट्रामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढत आहे काय? गारा पडणे हा हवामान हंगामी बदल प्रक्रियेचा एक नियमित भाग आहे.

यात अनैसर्गिक असे काहीच नाही. परंतु दरवर्षीच्या घटनेत आणि तीव्रतेत सातत्याने होणारी वाढ ही मात्र चिंतेची बाब आहे आणि पुढील काळामध्ये ही चिंता अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Climate Change
Crop Insurance : अवेळी पाऊस, गारपीट नुकसानीपासून विमा संरक्षण

राज्यातील गारपिटीच्या नोंदी :

१) महाराष्ट्र गारपीट प्रवण क्षेत्र होत आहे असे म्हणणे आज तरी चुकीचे होईल. याचे कारण महाराष्ट्रामध्ये अगदी स्वतंत्र पूर्व काळापासून गारपिटीच्या ब्रिटिश कालावधीमध्ये नोंदी केलेल्या आढळतात. स्वातंत्र्यानंतर भारतीय हवामान विभागाने या प्रकारच्या नोंदी केल्या आहेत.

२) २००५, २००६ यावर्षीही महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये गारपीट झाल्याची उदाहरणे आणि नोंदी आहेत. २०१४ मध्ये महाराष्ट्रामध्ये इतिहासातील उपलब्ध असणाऱ्या नोंदीनुसार सर्वाधिक गारपिटीचे प्रभावित क्षेत्र नोंदवले गेले आहे.

११ ते १३ फेब्रुवारी यादरम्यान झालेल्या गारपिटीत महाराष्ट्रातील १९ जिल्हे आणि तीन लाख हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले, ज्यामुळे जवळपास सव्वा तीनशे कोटींचे नुकसान झाले.

फेब्रुवारी २०१४ अखेर झालेल्या गारपिटीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास १२ लाख हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, पशुपक्षी, जनावरे यांची हानी झाली आणि तसेच शेतकऱ्यांच्या सांपत्तिक आणि घरे गोठे इतर यंत्रे, सयंत्र यांना मोठ्या प्रमाणात हानी झाली.

फेब्रुवारी २४ ते मार्च १४ या काळात झालेल्या गारपिटीमुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ४.६५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले.

३) २०१४ च्या काळात एकूण महाराष्ट्रातील २८ जिल्हे गारपीटग्रस्त झाले होते. त्यानंतर मात्र सातत्याने दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गारपीट होत आहे. १४ मार्च ते १६ मार्च २०१६ महाराष्ट्रातील ८५ हेक्टर क्षेत्र गारपीटग्रस्त झाले होते.११ फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील शेतीचे नुकसान झाले होते.

गारपिटीचे कारण :

हा तापमान वाढीचा किंवा जागतिक वातावरण बदलाचा परिणाम होय, असे आज म्हणणे तरी पोरकटपणाचे किंवा बाळबोधपणाचे होईल. कारण यास हवामान सांख्यिकीय माहितीचा तसा सबळ आधार नाही.

त्याचे संबंध तपासण्याचे काम झालेले नाही आणि निष्कर्ष ही निघालेले नाहीत. परंतु स्थानिक पर्यावरणीय हानीमुळे, वातावरणातील वाढलेल्या धुळीमुळे, म्हणजे संघनन रेणुमुळे गारपीट पडण्यास निश्चितपणे मदत होते.

गारपिटीचे प्रमाण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतीय उपखंडामध्ये सातत्याने पुढच्या काळामध्ये वाढत जाणार आहे.

त्याचे कारण स्थानिक पातळीवर झालेल्या पर्यावरणाची हानी , बदललेले हवामान , बदललेली शेती पद्धती, अंतर मशागत पद्धती, सिंचन व रासायनिक खत वापर पद्धती, कीड व रोग नियंत्रण पद्धती इत्यादी आणि वैश्विक पातळीवर वाढणारे तापमान व आद्रतेचे प्रमाण यास कारणीभूत आहे.

गारा :

१) गारा पडणे हा अवक्षेपणाचा एक प्रकार असून, यामध्ये पारदर्शक आणि दुधाळ रंगाच्या ५० मायक्रोमीटर याहून मोठ्या गोलाकार आकाराच्या बर्फाच्या गोळीस गार असे म्हणतात. गारांचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.

२) विविध हंगामात आणि विविध प्रदेशात, विशिष्ट हवामान स्थितीत, या वेगवेगळ्या प्रकारच्या गारांचा वर्षाव होतो. परंतु महाराष्ट्रामध्ये सन २०१४ पासून सातत्याने दरवर्षी या तीनही प्रकारच्या मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या भूभागावर गारा पडण्याचा अनुभव आपल्या राज्यात येत आहे.

गारांचे प्रकार :

१. मृदूगार किंवा बारीक गार किंवा मऊ गार : पाच मिलिमीटर आकारापेक्षा लहान असणाऱ्या बर्फ कणांचे कच्चे एकजीव मिश्रण जे भूपृष्ठावर पडतात, आणि लहान लहान तुकड्यात फुटले जातात, अशा गारेस मऊ गार म्हणतात.

२. लहान गार : अर्ध पारदर्शक, लहान गारा पावसाबरोबर जमिनीवर आदळतात परंतु त्या कडक आणि कणखर असतात. या गारा भूपृष्ठावर आदळूनही फुटत नाहीत.

३. खरी गार किंवा प्रखर गार : कणखर आणि खडक अशा प्रकारची ५.५ मायक्रोमीटर आकाराहून मोठ्या असणाऱ्या या गारा आहेत.

Climate Change
गारपीट, पावसाच्या स्थितीत द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना

गारपिटीमुळे शेतीचे नुकसान:

१) शेती, पूरक व्यवसाय, शेतमाल प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर गारपिटीचा वाईट परिणाम होत असतो. कारण गारपीट होत असताना, फक्त गारांचा पाऊस पडत नाही, तर गारांबरोबर पाऊस अधिक जोरदार वादळी वारे याचाही समावेश असतो.

यामुळे प्रत्यक्षात शेतामध्ये असणारी उभी पिके, भाजीपाला, फळबागेचे अंशतः नुकसान (पीक लोळणे, पानगळ, फळगळ इत्यादी होणे किंवा फळझाडांच्या लहान लहान फांद्या मोडणे) किंवा पूर्णतः पिकांचे, फळबागेचे नुकसान होते.

(पूर्णतः शेत पिकांची नुकसान, काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान, काढून शेतामध्ये ठेवलेल्या शेतमालाचे नुकसान, फळबागेतील झाडे मुळासहित उन्मळून पडणे इत्यादी).

२) गारपिटीनंतरच्या काळामध्ये पीक सडणे, फळे सडणे-कुजते, पिकांमध्ये कीड व रोगाचे प्रमाण वाढते, पिकांमध्ये विकृती येते.यामुळे शेती पिकांचे उत्पादन कमी होते. शेतमालाची प्रत किंवा दर्जा घसरतो, यामुळे बाजार भावही कमी मिळतो.

३) गारपिटीमध्ये सापडलेल्या पशू-पक्षांचा तत्काळ मृत्यू येतो किंवा त्यांना इजा होऊन त्यांचे आरोग्य बिघडते. गारपिटीत सापडलेल्या जनावरांना नंतरच्या काळामध्ये अनेक आजार होऊन मृत्यूही येतात.

४) गारपिटीमुळे जनावरांचा गोठा, कोंबड्यांची शेड, शेतमाल प्रक्रिया, शेती जोडधंद्यांसाठी उभारलेले छत, गोदामाचे मोठे नुकसान होते.

५) फळ पिके, भाजीपाला रोपवाटिकेतील शेडनेट, पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

संपर्क : डॉ. प्रल्हाद जायभाये, (कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com