गारपीट, पावसाच्या स्थितीत द्राक्ष बागेत करावयाच्या उपाययोजना

गेल्या तीन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात वाळवा, तासगाव, मिरज, पलूस आणि वीटा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस व त्यासोबत गारपीट झाल्याचे कळते. या जिल्ह्यात वाळवा तालुक्यात मुख्यतः काळ्या द्राक्षजातींची लागवड केली जाते. तर पलुस, मिरज या तालुक्यांत लांब मण्याच्या हिरव्या द्राक्ष जाती लागवड होते.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

गेल्या तीन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात वाळवा, तासगाव, मिरज, पलूस आणि वीटा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस (Rainfall) व त्यासोबत गारपीट (Hailstorm) झाल्याचे कळते. या जिल्ह्यात वाळवा तालुक्यात मुख्यतः काळ्या द्राक्ष जातींची (Black Grape Verity) लागवड केली जाते. तर पलुस, मिरज या तालुक्यांत लांब मण्याच्या हिरव्या द्राक्ष जाती लागवड (Grape Cutivation) होते. उर्वरित भागात थॉमसन, तास-ए-गणेश या जातींचा समावेश असतो. या भागात बेदाणा व स्थानिक बाजारपेठेसाठी प्रामुख्याने व्यवस्थापन केले जाते. वेगवेगळ्या उद्देशानुसार बागेतील फळकाढणी व त्यासोबत खरडछाटणीचा कालावधी मागे पुढे दिसून येतो. नुकत्याच निर्माण झालेल्या पावसामुळे वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेतील बागांमध्ये उद्‍भवणाऱ्या समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांची माहिती घेऊ. या उपाययोजना केल्यामुळे सूक्ष्मघड निर्मितीवर विपरीत परिणाम होणार नाही.

१) नुकतीच छाटलेली बाग

काही भागात स्थानिक बाजारपेठेकरिता द्राक्ष पुरवले जातात. या ठिकाणी ग्राहकांची पसंती, द्राक्षांना कोणत्या वेळी चांगली किंमत मिळू शकते आणि पुढील हंगामातील व्यवस्थापनाची सुलभता यानुसार फळछाटणी उशिरा घेतली जाते. यामुळे फळकाढणीही उशिरा होते. अशा परिस्थितीतील बागांतील खरडछाटणी नुकतीच झालेली दिसून येते. या बागेत जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीत ओलावा चांगल्या प्रकारे जास्त काळ टिकून राहील. आर्द्रता ६० टक्क्यांच्या पुढे जास्त टिकून राहिल्यामुळे डोळे फुटण्याकरिता याचा फायदा होईल. या पावसामुळे बागेतील तापमानातही तितक्याच प्रमाणात घट झाली असेल. कमी तापमान व जास्त आर्द्रता ही बागेमध्ये खरडछाटणीनंतर डोळे फुटण्याकरिता पोषक ठरते.

ज्या बागेत खरडछाटणी झाल्यानंतर १० ते १२ दिवसांचा कालावधी उलटलेला आहे, अशा ठिकाणी डोळे फुटण्याची प्रक्रिया जलद गतीने होईल. काही ठिकाणी डोळे फुटण्यास सुरुवात होऊन डोळ्यावरील आवरण बाहेर निघालेले असेल. अशा अवस्थेत गाराचा मार बसल्यास निघणाऱ्या फुटी कमकुवत निघण्याची दाट शक्यता असेल. या परिस्थितीत नत्राचा वापर फायदेशीर ठरेल. उदा. युरिया एक ते सव्वा किलो प्रति एकर प्रति दिवस (३ ते ४ दिवस.) द्यावे. ज्या ठिकाणी एक ते दोन पाने निघालेली आहेत, अशा ठिकाणी गारांमुळे जखम झालेली असल्यास पुन्हा चार ते पाच पानांपर्यंत फुटी वाढू द्याव्यात. त्यानंतर झालेल्या जखमांच्या परिस्थितीनुसार एकतर फुटी वाढू द्याव्यात किंवा दोन डोळ्यांवर खुडून पुन्हा नव्या फुटी वाढवाव्यात. या जखमांवर प्रभावी उपाययोजना म्हणून कॉपरयुक्त बुरशीनाशकांची एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी करून घ्यावी. ही फवारणी उन्हाची वेळ टाळून सायंकाळी करावी. या बागेत युरिया ७५० ते १००० ग्रॅम पर्यंत प्रति एकर या प्रमाणे जमिनीतून चार ते पाच दिवसापर्यंत द्यावे. आणि डीएपी (१८-४६-०) जमिनीतून २५ किलो प्रति एकर या प्रमाणे एकदाच द्यावे.

२) सहा ते सात पानांची अवस्था ः

या भागात काळ्या द्राक्षजाती (उदा. कृष्णा सीडलेस, शरद सीडलेस, ज्योती सीडलेस इ) लागवड दिसून येईल. या द्राक्षाची काढणी हिरव्या रंगाच्या द्राक्षजातीपेक्षा थोडी लवकर केली जाते. त्यानुसार खरडछाटणीसुद्धा लवकर सुरुवात होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या जातींची छाटणी घेतली जाते. या वेळी बागेत नेमकी सहा ते सात पानांची अवस्था दिसून येईल. या अवस्थेत नेमके फुटी विरळणी करण्याची कार्यवाही सुरू असते. जर गाराचा मार जास्त बसला असल्यास फुटींची विरळणी करताना जखमांची स्थिती पाहून निर्णय घ्यावा. जास्त जखमा झालेल्या फुटी काढून टाकाव्यात. काही परिस्थितीत ५० ते ६० टक्के फुटींना जखमा जास्त झालेल्या असल्यास यावेळी गुणोत्तरानुसार काड्या ठेवून बाकीच्या जखमी काड्या काढून घ्याव्यात. २५ ते ३० टक्के जखम झालेली असल्यास फार काळजी करण्याचे कारण नाही. या ठिकाणी बागेत फुटींची विरळणी केल्यानंतर कॉपरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करावी व त्यानंतर ट्रायकोडर्माची (मांजरी ट्रायकोशक्ती, मांजरी वाईनगार्ड) फवारणी आणि ठिबकद्वारे उपलब्धता करावी.

साधारणतः फुटींची विरळणी झालेल्या बागेत जर जखम कमी प्रमाणात झालेली असल्यास, अशा ठिकाणी नत्राचा वापर करून फुटींची वाढ लवकर करून घ्यावी. याउलट जखमा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झालेल्या असल्यास मात्र जखमेच्या एक डोळा खाली ती फूट खुडून घ्यावी. नवीन फुटी वाढवाव्यात. या वेळी नत्र, स्फुरद यांचा वापर महत्त्वाचा समजावा. ज्या भागात पाऊस फार जास्त झाल्यामुळे आर्द्रता जास्त काळ टिकून राहण्याचा अंदाज असल्यास ताम्रयुक्त बुरशीनाशक वापर व त्यानंतर जैविक नियंत्रणावर भर द्यावा.

३) शेंडा पिचिंग केलेली अवस्था ः

लवकर फळ काढणी झालेल्या बागेत विश्रांतीचा कालावधी संपल्यानंतर लगेच खरडछाटणी घेतली गेली. छाटणीनंतरच्या कालावधीत तापमान कमी असल्यामुळे फुटींची वाढ चांगली होऊन ९ ते १० पाने अवस्था आली असावी. या बागेत सबकेनकरिता नुकताच शेंडा मारलेला असेल. या बागेत फुटींची विरळणी आणि सबकेनकरिता शेंडा पिचिंग झाल्यानंतर जर गारांचा मारा बसलेला असल्यास किंवा दडक्याच्या पावसामुळे काडीवर जखमा किंवा पाने फाटलेली असू शकतात. या पावसामुळे साधारणतः शेंडा पिचिंग केलेल्या पेऱ्यावर वरील भागात काडीवर जखम दिसून येईल. त्या खालील काडीवर जखमेचे प्रमाण कमी असेल. वरील भागांमध्ये जास्त जखम झालेली असल्यास त्या काडीवर दगडाने ठेचल्या प्रमाणे चिन्हे दिसतील. बारकाईने लक्ष दिल्यास फक्त साल काळसर झाली आहे, अशा स्थितीत पुढील काळात अडचणी येणार नाहीत, असे समजता येईल. गारपीट किंवा पावसाच्या तिसऱ्या दिवशी जर त्या फुटीवरील अर्ध्यांपर्यंत जखम काळी होऊन, चिरा पडल्या असल्यास त्या काडीवर सूक्ष्मघड निर्मिती होणार नाही, असे समजता येईल. या वेळी जखम भरण्याची जास्त वाट न पाहता जखमेच्या एक डोळा खाली छाटून फुटींची वाढ करून घ्यावी. या नंतर निघालेल्या बगलफुटी एक ते दोन पानांच्या होताच स्फुरद आणि पालाशयुक्त खताच्या उदा. ०-९-४६ किंवा ०-४०-३७ अर्धा ते पाऊण ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे दोन ते तीन फवारण्या तीन दिवसांच्या अंतराने करून घ्याव्यात. या बागेत नत्र उदा. युरिया सव्वा ते दीड किलो प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे तीन दिवसांच्या अंतराने फक्त दोन वेळा द्यावे.

४) सबकेन तयार झालेली बाग ः

काही बागेत सबकेन तयार करून बगलफुट सात ते आठ पानांची झाली असून, त्यावर पाच पानांनंतर शेंडा मारलेला आहे. ही अवस्था सूक्ष्मघड निर्मितीची असून वाढ नियंत्रणात ठेवणे फारच गरजेचे असेल. अन्यथा, वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढून सायटोकायनिन कमी होऊन काडीवरील डोळ्यात सूक्ष्मघडाचे रूपांतर बाळीमध्ये होण्याची दाट शक्यता असेल. तेव्हा या बागेत पुढील दोन आठवडे पाण्यावर नियंत्रण ठेवून वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असेल. या बागेत नत्राचा वापर पूर्णपणे बंद करावा. पालाशयुक्त खते ०-०५० दीड किलो प्रति एकर प्रति दिवस या प्रमाणे दोन दिवसांच्या अंतराने तीन वेळा उपलब्धता करावी. या व्यतिरिक्त फक्त पालाश उपलब्ध असलेल्या अन्य ग्रेडचाही वापर करता येईल. काडीवर तयार झालेल्या डोळ्यामध्ये सूक्ष्मघड निर्मितीच्या अनुषंगाने आवश्यक न्यूक्लिक अॅसिडचे प्रमाण वाढवणे गरजेचे असेल. त्यासाठी स्फुरदचा वापर तितकाच महत्त्वाचा आहे. काही परिस्थिती आपल्याला स्फुरद व पालाश उपलब्ध असलेल्या संयुक्त ग्रेडचा वापर करता येईल. उदा. ०-५२-३४, ०-४०-३७ किंवा ०-९-४६ इ. याच सोबत संजीवकांचा (६ बीए आणि युरासील) वापर तितकाच महत्त्वाचा समजावा.

या बागेत काडीवर पाने तुटलेली, फाटलेली किंवा चिरलेली दिसून येतील. पाने तुटलेल्या परिस्थितीत आवश्यक त्या पानांची संख्या कमी होईल. तेव्हा पुन्हा काही पाने वाढवून पानांची संख्या पूर्ण करावी. काही ठिकाणी पाने टिकून असली तरी फाटलेल्या असल्यास अशा ठिकाणी पानांचे क्षेत्रफळ कमी होईल. म्हणजेच अन्नद्रव्यांचा साठा करण्यासाठी प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रियेसाठी पानांची संख्या अपुरी पडेल. अशा परिस्थितीत पुन्हा काही पाने वाढवून घ्यावीत. बागेचे व्यवस्थापन करावे.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com