
थोडक्यात माहिती:
१.लष्करी अळी मक्याचे गंभीर नुकसान करते आणि दिवसा लपून राहते, रात्री खाण्यास बाहेर येते.
२. तिचा जीवनक्रम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होतो: अंडी, अळी, कोष, आणि प्रौढ.
३. एकात्मिक नियंत्रणात खोल नांगरणी, अंडी नष्ट करणे, आणि विविध सापळ्यांचा वापर उपयुक्त ठरतो.
४. जैविक उपायांमध्ये ट्रायकोगामा, बुरशीयुक्त औषधे व निंबोळी अर्क प्रभावी ठरतात.
५. रासायनिक फवारणी योग्य टप्प्यावर व वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे.
यंदा खरिप हंगामात मक्याची पेरणी लक्षणीय प्रमाणात झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात शेतकरी मक्यावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. बदलत्या वातावरणामुळे आणि जास्त आद्रतेमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या रासायनिक फवारणीचा फारसा परिणाम झाला नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे लष्करी अळी व्यवस्थापनाच्या एकात्मिक पद्धती समजून घेऊया.
लष्करी अळी ही कीड बहुभक्षीय आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त वनस्पतींवर ती आपली उपजीविका करते. त्यातही तृणधान्यावर जसे की ज्वारी, बाजरी, मका, ऊस, गहु, भात यांच्यात ती सर्वाधिक आढळून येते.
नुकसानीचा प्रकार-
ही अळी वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान करते. त्यामुळे पिकातील नुकसान तपासूनही अळीची अवस्था ओळखता येते. लष्करी अळी पाने खाऊन पिकाचे नुकसान करते. नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या पानांचा हिरवा पापुद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानाला छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात.
या अळ्या मक्याच्या पोंग्यामध्ये राहून पोंग्याच्या पानाला छिद्रे करतात. अळ्यांनी कुरतडलेल्या पानांवर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. अळीचा प्रादुर्भाव वाढल्यावर पिकाचे फक्त खोड आणि पानाच्या शिराच दिसतात. पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते. तर उशिरा पोंगे अवस्थेत सर्वात जास्त बळी पडते. काही वेळेला कणसाच्या बाजूने छिद्र करुन दाणे खाते.
एकात्मिक व्यवस्थापन-
ही एक शाश्वत व विज्ञानावर आधारित पद्धत आहे, ज्यामध्ये पीक उत्पादन वाढवून किडींचे नुकसान कमी करणे हा उद्देश असतो. यात विविध जैविक, यांत्रिक, पारंपरिक व रासायनिक उपायांचे समन्वयाने नियोजन करून अळी, कीड किंवा रोगांवर नियंत्रण ठेवले जाते.
पारंपरिक पद्धत-
१. पेरणीपर्वी कीडग्रस्त पिकाची खोल नांगरणी करुन घ्यावी.
२. लवकर पक्व होणाऱ्या वाणाची निवड करावी, शिवाय गाव आणि विभागीय पातळीवर लवकर पेरणी करावी.
३. मधुमक्याच्या किडीस प्रतिकारक्षम वाणाची निवड करावी.
४. नियमितपणे पिकाची पाहणी करत राहणे.
५. पिकावरील अंड्यांचा समूह गोळा करुन नष्ट करावा.
यांत्रिक पद्धत-
पतंगांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करा. सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत तर सामुहीकरीत्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करण्यासाठी १५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.
जैविक उपाय-
१. मित्र कीटकांचे संवर्धन करा. जसे ट्रायकोग्रामा प्रीटीओसम यांची परोपजीवीग्रस्त ५०,००० अंडी प्रती एकर एक आठवडयाच्या अंतराने ३ वेळा सोडावे.
२. टिलेनोमस रेमस या परोपजीवी किटकांचे एकरी ५० हजार अंडी एका आठवड्याच्या अंतराने शेतात सोडावे. त्यानंतर ४ ते ५ दिवसांपर्यंत रासायनिक कीडनाशकाची फवारणी करु नये.
३. जैविक बुरशीयुक्त कीडनाशकांमध्ये मेटा-हायझीयम अॅनिसोप्ली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २० ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी.
वातावरणातील आर्दता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत असल्यास या बुरशी अधिक चांगल्या प्रकारे काम करु शकतात. सध्या पाऊस आणि जास्त आर्दतेच्या काळात हे कीडनाशक प्रभावी ठरेल, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी दिला आहे.
रासायनिक पद्धती-
१. बीज प्रक्रिया- सायन्ट्रीनीलीप्रोल (१९.८ %) + थायमिथाक्झॉम १९.८ एफ. एस. हे संयुक्त रसायन ६ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया केल्यास पिकास पहिले १५ ते २० दिवस संरक्षण मिळते.
२. पहिली फवारणी- पहिली फवारणी पिकाची रोप अवस्था ते पोंगे येण्यापूर्वी करावी. अळीच्या प्रादुर्भावाने ५ टक्के नुकसान झालेले आढळल्यास निंबोळी अर्क ५ % किंवा अझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे अंडी उबविण्याची क्षमता कमी व्हायला मदत होते.
३. दुसरी फवारणी- पिकाची मध्य ते उशीराच्या पोंग्याच्या अवस्थेत दुसरी फवारणी करावी. अळीच्या दुसर्या आणि तिसऱ्या अवस्थेत १० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आढळ्यास ही फवारणी करावी. स्पिनेटोरम (११.७% एससी) ५ मिली किंवा ब्रोफ्लानिलाइड (२०% एससी) २.५ मिली किंवा आयसोसायक्लोसेरॅम (१८.१% एससी) ६ मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.५% + प्रोफेनोफोस (३५% डब्लूडीजी) हे संयुक्त कीडनाशक १५ ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारावे. पावर / पेट्रोल पंपासाठी हेच प्रमाण तीनपट करावे.
क्लोरांट्रीनीलीप्रोल (९.३ टक्के फवाही) लॅम़डा सायलोथ्रिन (४.६ टक्के झेडसी प्रवाही) हे संयुक्त कीडनाशक ५ मिली प्रति १० पाण्यात मिसळून फवारावे.
४. तिसरी फवारणी- तिसरी फवारणी पिकाच्या उगवणीनंतर ८ आठवड्यांपासून ते तुरा येईपर्यंतच्या अवस्थेत करावी. या अवस्थेत कीडनाशकांचा वापर आर्थिक दृष्टीने हितकारक नसल्याने निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी बी.टी. पावडर १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घालून फवारावी. तिचेही पुष्कळ चांगले परिणाम आहेत, अशी माहिती कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी दिली.
६. आजकाल शेतकरी वाळू आणि चुन्याचाही प्रयोग करत आहेत जो यशस्वीही ठरला आहे. ९ भाग बारीक वाळू आणि १ भाग चुना असे मिश्रण करुन पिकात फेकावे. हे मिश्रण पोंग्यावर पडण्याची खात्री करावी. या पद्धतीत वाळूमुळे अळीला जखम होते आणि ती जखम चिघळण्याचे काम चुन्यामार्फत होते व लवकरच अळी मरते.
दक्षता-
१. चारापिक म्हणून मक्याचे पिक घेत असाल तर रासायनिक कीडनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.
२. मक्याचे पिक हे उभट असते. त्यामुळे त्याच्या बाजून फवारणी करुन फारसा उपयोग होत नाही. औषधाचा संपर्क पोंग्याशी येणे गरजेचे प्रभावी नियंत्रणासाठी गरजेचे असते
३. बुरशीयुक्त कीडनाशके आणि चुना मिसळलेली वाळूचा वापर करताना औषध पोंग्यात फवारले जाते याची खात्री करावी.
४. २ ते ३ फवारण्या केल्यास चांगल्या प्रकारे फरक दिसू शकतो.
या अळीचा जीवनक्रम उन्हाळ्यात साधारणत: एक महिन्यात पूर्ण होते तर हिवाळ्यात हा कालावधी जवळपास दोन महिन्यात पूर्ण होतो. एप्रिल ते डिसेंबर महिन्यापर्यंत पतंगाची संख्या भरपूर प्रमाणात असते तर हिवाळ्यातही थोड्या प्रमाणात असते. या अळ्या दिवसा जमिनीत जातात आणि रात्री पाने खातात त्यामुळे अंडाच्या अवस्थेत नियंत्रण मिळवणे सोपे जाते.
लष्करी अळीचा जीवनक्रम चार अवस्थेत पूर्ण होतो. अंडी, अळी, कोष आणि प्रौढ.
अंडी- ही अंडी एका समूहात १०० ते २०० संस्थेने आढळतात. अंडी देण्याचा कालवधी २ ते ३ दिवसांचा असतो. त्याकाळात एक प्रौढ मादी सरासरी १५०० ते २००० अंडी देऊ शकते. अंड्यांचा समूह केसाळ आणि राखाडी रंगाच्या लव किंवा मऊ केसाने झाकलेले असतात.
अळी- अळीच्या सहा अवस्था असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळीच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचा उलटा वाय (Y) दिसतो. ही अळी दिवसा लपून राहते आणि रात्री पाने खाते. उन्हाळ्यात १४ दिवसांची तर हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात ती एक महिन्यापर्यंत असू शकते.
कोष- कोष हे चकाकणाऱ्या तपकिरी रंगाचे असतात. ते साधारणत: २ ते ८ सेंमी खाली जमीनीत असतात. ही अळी स्वत:भोवती अंडाकृती मातीचे कण आणि रेशीम धागा एकत्र करुन कोष तयार करते. ही अवस्था उन्हाळ्यात ८ ते ९ दिवसांची असते तर थंड वातावरणात ती २० ते ३० दिवसांची असते.
प्रौढ- प्रौढ अवस्थेतील किड्यांना पतंग म्हणतात. ही अवस्था निशाचर असते त्यामुळे उष्ण आणि दमट वातावरणात ते भरपूर सक्रिय असतात. मिलनाच्या ३ ते ४ दिवसांनी ते अंडी देतात. पतंगाची अवस्था सरासरी १० ते १२ दिवसाची असते.
१.लष्करी अळीचे नियंत्रण कसे करावे?
एकात्मिक व्यवस्थापन करा, जैविक, यांत्रिक व रासायनिक उपाय एकत्र करा.
२.मक्यावर लष्करी अळी का येते?
लष्करी अळीच्या पतंगांचे अंडे, मिळालेलं पोषक वातावरण आणि सतत मका लागवड यामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढतो.
३. लष्करी अळी कोणत्या पिकांवर आढळते?
मका, ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, भात यांसह ८०% वनस्पतींवर ती आढळते.
४. जैविक उपाय प्रभावी असतात का?
होय, ट्रायकोगामा, मेटारायझियम आणि निंबोळी अर्क यासारखे जैविक उपाय प्रभावी ठरतात.
५. फवारणी करताना काय काळजी घ्यावी?
औषध थेट पोंग्यावर पडेल याची खात्री करावी आणि योग्य प्रमाणात फवारणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.