Humani Control: १५ दिवसांत हुमणी करा गायब; हुमणी नियंत्रणाचे सोपे ३ मार्ग !

Agriculture Pest Management: पावसामुळे वातावरणात सध्या ८० टक्के आद्रता आहे. हुमणीच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोपली या बुरशीचा वापर करण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे
Humani Control
Humani Control Agrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

१. राज्यातील अनेक भागांत हुमणीचा जोरदार प्रादुर्भाव असून तूर, सोयाबीन, मका, ऊसासह पिकांचे नुकसान होत आहे.

२. हुमणीचे नियंत्रण यांत्रिक, जैविक आणि रासायनिक अशा तीन प्रकारांनी शक्य आहे.

३. यांत्रिक पद्धतीत आंतरमशागतीतील कोळपणी उपयुक्त.

४. जैविक नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोपली, बायोमिक्स, माऊमिक्स वापरण्याचा सल्ला.

५. ऊस व भुईमुगासाठी काही रासायनिक कीटकनाशक शिफारस करण्यात आले आहेत, पण सोयाबीन व कपाशीवर जैविक मार्गच योग्य.

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये सध्या हुमणीचा उद्रेक झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील तूर, सोयाबीन, कापूस, हळद, मका, ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान होत आहे. शेतकरी ३ सोप्या मार्गाचा वापर करून हुमणीवर १५ दिवसांमध्ये नियंत्रण मिळवू शकतात. हुमणीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरमशागत करून यांत्रिक पध्दतीने, रासायनिक कीडनाशक तसेच जैविक पध्दतीने नियंत्रण शक्य आहे.शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे दिलेल्या उपायांचा वापर केल्यास हुमणीचा बंदोबस्त लगेच होऊ शकतो. त्यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज आहे.

हुमणीच्या उद्रेकाचं कारण-

हुमणीचे अंडे बऱ्याचदा जमीनीत असतात. त्यांना पोषक वातावरण मिळाल्यावर त्यांचा उद्रेक होतो. पूर्णपणे न कुजलेले शेणखत शेतात टाकल्यास हुमणीच्या अळ्या त्यांच्या वाढीच्या काळात ते खातात, आणि पूर्ण वाढ झाल्यावर झाडाच्या मुळावर हल्ला करतात. कीटकशास्त्रज्ञांच्या मते, सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आणि उन्हाळ्यातील अवकाळी पावसामुळे हुमणी अळीला पोषक वातावरण मिळाले.त्यामुळे हुमणीचा उद्रेक इतक्या मोठ्या प्रमाणात आहे.

Humani Control
Heavy Rain Nanded : नांदेड जिल्ह्यातील १७ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी

यांत्रिक पद्धत-

यांत्रिक पद्धतीमध्ये पिकांमधील आंतरमशागत उपयोगी ठरते. कोळपणी करताना हुमणीच्या अळ्या मातीच्या पृष्ठभागावर येतात. कोळपणीच्या काळात उष्णता असल्यास ती अळ्यांसाठी बाधक ठरते. उष्णतेमुळे हुमणीच्या अळ्या मरतात. किंवा उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकाव्यात किंवा लोखंडी हुक किंवा खुरप्याने माराव्यात. पाणी देताना एखाद्या दिवशी जास्त वेळ पाणी साचवून ठेवल्यास अळ्या गुदमरुन मरतात. शिवाय हुमणीमुळे सुकलेल्या झाडाला उपटून तिच्या खालील अळ्या नष्ट कराव्या किंवा पृष्ठभागावर आलेल्या अळ्या पक्षी येऊनही खातात.

जैविक नियंत्रण

जैविक पद्धतीमध्ये बुरशी आणि सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. मेटारायझियम अॅनिसोपली ही बुरशी हुमणीवर अतिशय प्रभावशाली असल्याचा सल्ला कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी दिला. ही बुरशी अळीच्या शरीरावरील ओलाव्यावर वाढते. त्यानंतर तिच्या आत शिरुन तिच्यावर उपजीविका करायला लागते. त्यामुळे मेटारायझीमच्या संपर्कात आलेली अळी १० ते १५ दिवसात मरते, हुमणी अळीचा बंदोबस्त होतो. यासोबतच बिव्हेरिया बासियाना या बुरशीचाही वापर केला जातो.

मेटारायझियम हे बुरशीजन्य कीडनाशक वेगवेगळ्या कृषी विद्यापीठ, संस्था आणि कंपन्यांनी उत्पादित केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 'फुले मेटाऱ्हीझीअम(Phule Metarhizium)' तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे बायोमिक्स(biomix), माऊमिक्स (मेटारायझम), माऊफंग हे हुमणी अळीसाठी प्रभावी कीडनाशक आहेत. बायोमिक्स, माऊमिक्स आणि माऊफंग हे पावडर आणि द्रव अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे शिवाय त्याचे प्रमाणही सारखेच आहे. बायोमिक्स हे हळद, सोयाबीन, तूर यांच्यावर प्रभावीपणे काम करते. माऊमिक्स हे विशेषत: हुमणी अळीसाठी उपयुक्त आहे. हे फवरल्यावर ही अळी हिरवट काळी पडून मरुन जाते.

मेटाराझियमचे प्रमाण-

फुले मेटाऱ्हीझीअम- एका हेक्टरसाठी १० किलो मेटारायझियम प्रती २००० लिटर पाण्यात मिसळून साध्या किंवा एच. पी. टी पंपाने फवारावे. तर एका एकरसाठी ४ किलो मेटारायझियम वापरावे.

बायोमिक्सचे- १०० ग्रॅम किंवा १०० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

माऊमिक्स- हे कीडनाशक आवळणीसाठी २०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी तर फवारणीसाठी १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करण्याचा सल्ला कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी दिला.

मेटारायझियम पिकांना देताना घ्यावयाची काळजी-

फवारणीपुर्वी आणि नंतर एक आठवडा रासायनिक बुरशीनाशक टाळावे. तसेच बोर्डो मिश्रण आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड देणेही टाळावे. कोरड्या हवामान पिकास भरपूर पाणी द्यावे. मेटारायझियम फवारणी नंतर चांगल्या नियंत्रणासाठी २ दिवस तिसऱ्या प्रहरी फक्त पाणी फवारावे. मेटारायझियम थंड जागेत साठवावे.

पावसामुळे वातावरणात सध्या ८० टक्के आर्दता आहे. हुमणीच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोपली या बुरशीचा वापर करण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. मेटारायझियम अॅनिसोपली या नैसर्गिक कीडनाशकाचा प्रभाव शेतात दीर्घकालीन राहतो; असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ, डॉ. अनंत लाड यांनी दिला.

रासायनिक पद्धत-

ऊसासाठी: फिप्रोनील (40%) + इमिडाक्लोप्रीड (40% WG) चे 4 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

भुईमुगासाठी: वरील कीटकनाशकाचे 3 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी (40 ग्रॅम/एकर).

भुईमुगावर:

कार्बोफ्युरॉन (3%) दाणेदार कीटकनाशक – 33 किलो/हेक्टर.

थायोमिथॉक्झन 0.4% + बायोस्पीरीन 0.8% – 12 किलो/हेक्टर.

थायोमिथॉक्झन 0.9% + फिप्रोनील 0.2% – दाणेदार प्रकारात प्रभावी आहे.

सध्या सोयाबीन आणि कपाशीच्या पिकासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून कोणतेही रासायनिक कीटकनाशक लेबल क्लेम म्हणून दिलेले नसल्याने जैविक मार्गच सध्या उपयुक्त ठरत आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. हुमणी अळीचा उद्रेक का होतो?
सतत बदलणारे हवामान, अवकाळी पाऊस आणि अपुर्णपणे कुजलेले शेणखत यामुळे हुमणीच्या अंड्यांना पोषक वातावरण मिळते आणि हुमणीची वाढ होते.

२. हुमणीवर घरगुती उपाय कोणते आहेत?
आंतरमशागतीच्यावेळी जमिनीवर आलेल्या अळ्या पक्षी खातात किंवा गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकाव्यात.

३. मेटारायझियम म्हणजे काय?

अळीला मारणारी नैसर्गिक बुरशी; हुमणीवर १०-१५ दिवसांत प्रभावी नियंत्रण मिळते.

४. हुमणीसाठी कोणती कीटकनाशके शिफारस केली जातात?
ऊसासाठी फिप्रोनील + इमिडाक्लोप्रीड, भुईमुगासाठी कार्बोफ्युरॉन, थायोमिथॅक्झन मिश्रण प्रभावी.

५. कापूस आणि सोयाबीनसाठी कोणती फवारणी करावी?
सध्या कोणतेही रासायनिक कीटकनाशक मंजूर नाही, जैविक कीटकनाशकच शिफारस केली जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com