Silk Worm Pest : रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रण

रेशीम शेतीमध्ये उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे कोषांचे ५ ते १५ टक्क्यापर्यंत नुकसान होते. कर्नाटकमध्ये प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक असून, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
Silk Worm Pest
Silk Worm PestAgrowon
Published on
Updated on

रेशीम कीटक व अळीवर (Silk Worm) उपजीविका करणारी परोपजीवी कीड म्हणजे उझी माशी (Uzi Fly Attack On Silk Worm) (शा. नाव ः एक्झोरिस्टा बॉम्बीस) होय. ही अनेक देशांमध्ये उपद्रवी ठरलेली कीड आहे. भारतातही कर्नाटक व त्या शेजारील राज्यांमध्ये आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथे १९८१-८२ च्या दरम्यान या माशीचा प्रादुर्भाव व प्रसार झाला.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही उझी माशीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आहे. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामुळे १० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

जीवनक्रमामध्ये चार अवस्था १) अंडी २) अळी (मॅगट) ३) कोष (प्युपा) ४) प्रौढ माशी.

नुकसानीचा प्रकार

उझी माशी एक किंवा दोन पांढऱ्या दुधाळ रंगाची, टाचणीच्या डोक्याच्या आकाराची अंडी चौथ्या किंवा पाचव्या वाढीच्या अवस्थेतील अळीच्या त्वचेवर अंडी घालते. ४८ ते ६२ तासांमध्ये अंडी उबवतात. त्यातून बाहेर पडलेली अळी (मॅगट) तिच्या छाती जवळील हूकच्या साह्याने छिद्र करून रेशीम कीटकाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या ठिकाणी काळा डाग पडतो. रेशीम कीटकांच्या शरीरावरील या काळ्या डागावरूनच उझी माशीचा प्रादुर्भाव ओळखता येतो.

Silk Worm Pest
Silk Farming : तुमच्याकडे नेमकी कोणती पिके घेतात, शेती करतात कशी?

वातावरणाचा परिणाम

तसा उझी माशीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. मात्र पावसाळा आणि हिवाळ्यात उझी माशीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. बदलता पाऊस, तापमान आणि आर्द्रतेनुसार उझी माशीची अंडी देण्याची क्षमता बदलते. उन्हाळ्यात ३२ ते ४२ अंश सेल्सिअस तापमानामुळे मार्च ते जून महिन्यात उझी माशीचा प्रादुर्भाव कमी आढळतो.

प्रजाती ः भारतीय उझीमाशी, जपानी उझी माशी, काळी उझी माशी, टसर उझी माशी

नुकसान कालावधी ः ऑगस्ट ते नोव्हेंबर प्रादुर्भाव.

Silk Worm Pest
Silk Farming : रेशीम शेतीमुळे उत्पन्नात शाश्वतता आली

ओळख

 प्रौढ उझी माशी घरमाशीपेक्षा मोठी असते. पाठीवर स्पष्ट दिसणाऱ्या चार रेषा असतात. पोटाच्या बाजूवर तीन पट्टे दिसतात. उडताना पंखाचा आवाज करतात. मावा किडीने सोडलेला मधासारखा गोड पदार्थ व फुलांतील गोड भाग माश्‍या खातात.

 नर व मादी यांच्या मिलनानंतर मादी एक एक अंडी ग्रंथीच्या साह्याने तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या वाढीच्या अवस्थेतील रेशीम कीटकाच्या पाठीवर चिकटवते. मादी नऊ दिवसांच्या काळात २०० ते ३०० अंडी घालते.

Silk Worm Pest
Cotton Boll Worm : तेलंगणामुळे बोंड अळीची भीती

 २ ते ३ दिवसांच्या अंडी उबवण काळानंतर अळी बाहेर पडते. पाय नसलेल्या अळ्या हूकच्या साह्याने रेशीम अळीच्या त्वचेवर छिद्र करून आत प्रवेश करतात. त्या ठिकाणी काळ्या रंगाचा डाग पडतो. शरीरातील पेशीतील स्निग्ध पदार्थ खाऊन अळी उपजीविका करते. रेशीम कीटकाच्या शरीरातच तीन कात अवस्था पूर्ण होतात.

Silk Worm Pest
Maize Army Worms : मक्यावर अमेरिकन लष्करी अळी

वाढ झालेली उझी माशीची अळी ६ ते ८ दिवसांचा कालावधी पूर्ण करून रेशीम कीटकाच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीतील छिद्रात किंवा भेगामध्ये कोषावस्थेत जाते. तसेच रेशीम कोष साठवणगृह, विणनगृह किंवा बीज गुणन केंद्रात स्थलांतरित होतात. १० ते १४ दिवसांची कोष अवस्था पूर्ण करून उझी माशी बाहेर पडते.

नियंत्रणाचे उपाय

संगोपनगृहाचे व्यवस्थापन -

संगोपनगृहाच्या सर्व खिडक्यांना माशीच्या नियंत्रणासाठी सापळे लावावेत.

एक लिटर पाण्यात उझीनाशकाची एक गोळी टाकून द्रावण तयार करावे. पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये हे द्रावण ओतावे. हे द्रावण पिवळ्या रंगाचे असते. हा ट्रे खिडकीच्या आतील व बाहेरील बाजूस ठेवावा.

संगोपन गृह, कोष खरेदी केंद्र, अंडीपुंज निर्मिती केंद्र, धागानिर्मिती केंद्र अशा सर्व ठिकाणी अळ्या, कोष गोळा करून जाळून नष्ट करावेत.

 या सर्व ठिकाणच्या जमिनीच्या भेगा बुजवून घ्याव्यात.

 गोळा केलेल्या अळ्या, कोष ०.५ टक्का डिटर्जंटच्या द्रावणात टाकून नष्ट करावेत.

 रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेपासून पुढे उझी माशीचे सापळे कोष विणन काळापर्यंत रॅकवर लावावेत.

 रेशीम कीटकांना उझीनाशक गोळी किंवा सापळ्यांचा त्रास होत नाही.

जैविक पद्धतीने नियंत्रण

 उझी माशीच्या कोषावर उपजीविका करणारे लिसोलायनेक्स थायमस हे परोपजीवी कीटक संगोपनगृहात रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सोडावेत. १०० अंडीपुंजासाठी परोपजीवी कीटकांचे दोन पाऊच लागतात.

रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर लिसोलायनेक्स थायमस परोपजीवी कीटकांचे पाऊच चंद्रिकेजवळ ठेवावेत.

कोष काढणीनंतर परोपजीवी कीटकांचे पाऊच खताच्या खड्ड्याजवळ ठेवावेत.

 परोपजीवी कीटकांची केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथे आवश्यकतेनुसार मागणी नोंदवावी. मागणी करताना रेशीम कीटक अंडीपुंज संख्या आणि अंडी फुटण्याची तारीख त्यावर नमूद करावी. आधी पैसे भरून मागणी केली असता पोष्ट किंवा कुरियरच्या साह्याने परोपजीवी कीटकांचे पाऊच पाठवले जातात.

 केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने उशी माशीच्या नियंत्रणासाठी उझी साइड, २ टक्के ब्लिचिंग पावडर द्रावण, उझी पावडर आणि उझी नाश यांच्या फवारणीची शिफारस केलेली आहे.

 रासायनिक उझीनाशकाची फवारणी आणि जैविक उपाय एकाचवेळी केले तर उझी माशीवर ७७ टक्क्यांपर्यंत नियंत्रण मिळवता येते.

 उझी साइड, जैविक उपाय आणि उझी ट्रॅप या तिन्ही उपायांचा एकाच वेळी वापर केला तर ८४ टक्क्यांपर्यंत उझी माशीवर नियंत्रण मिळविता येते.

संगोपनगृहाची स्वच्छता महत्त्वाची

राज्यात शेडनेटच्या साह्याने बनविलेल्या कच्च्या संगोपनगृहांचे प्रमाण ९९ टक्के आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी पक्के सिमेंट कॉँक्रीटमध्ये बांधकाम करून शिफारशीप्रमाणे दरवाजे, खिडक्या आणि हवा खेळती राहण्यासाठी तिरपी वायुविजन व्यवस्था करावी. खालच्या व वरच्या बाजूस झरोके ठेवावेत.

 सर्व खिडक्या व दरवाजांना नायलॉन वायर मेश जाळीचे संरक्षण करावे. उझी माशीला कीटक संगोपनगृहात सरळ प्रवेश मिळणार नाही.

 संगोपनगृहात सरळ प्रवेश व्यवस्थेऐवजी बाहेर लहान खोली तयार करावी. प्रथम तिथे प्रवेश केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दरवाजामधून आत जाण्याची सोय असतील. त्यातही दोन्ही दरवाजांना आपोआप बंद होण्याची व्यवस्था करून घ्यावी. दोन्ही दरवाजे एकाच वेळी उघडे राहिले नाही, तर आपोआपच उझी माशीला मज्जाव होतो.

 तुती पाने साठवण करण्यासाठी वेगळी अंधारी खोली असावी. फांदी खाद्य देण्याअगोदर उझी माशी फांद्या किंवा पानांद्वारे सरळ संगोपनगृहात प्रवेश करते. यासाठी नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

 संगोपनगृहात उंदीर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

 कोष विक्री केलेल्या बाजारातून पोते घरी आणू नये. कारण या सोबत उझी माशीच्या अळ्या, कोष आपल्या संगोपनगृहात येण्याची शक्यता असते.

 प्रादुर्भावग्रस्त गावात एक दीड महिना (एप्रिल व मे महिना) रेशीम कोषाचे पीक बंद ठेवावे.

किडीची लक्षणे

 रेशीम कीटकाच्या शरीरावर लहान एक ते दोन अंडी असणे किंवा रेशीम कीटकाच्या त्वचेवर काळ्या रंगाचा डाग असणे किंवा कोषाला छिद्र पाडून मॅगट बाहेर आलेला असणे.

 उझी माशीचा प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेत झालेला असल्यास रेशीम कीटक कोषावस्थेपूर्वीच मृत होताना आढळतात.

 जर प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या पाचव्या अवस्थेत झालेला असेल, तर पोचट कोषांची निर्मिती होते. होणारे नुकसान १० ते ३० टक्के असते.

- राहुल साळवे, (आचार्य पदवी विद्यार्थी), : ९१६८४९७८८३ ,

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com