Banana Management : शेतकरी नियोजन पीक ः केळी

जळगाव जिल्ह्यातील केऱ्हाळे बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ (ता. रावेर) येथील भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात अतुल पाटील यांची ५० एकर जमीन आहे. त्यापैकी साधारण २१ एकरांवर नवती केळीची लागवड आहे.
Banana Management
Banana ManagementAgrowon

शेतकरी ः अतुल मधुकर पाटील

गाव ः केऱ्हाळे बुद्रुक, ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र ः ५० एकर

केळी लागवड ः २१ एकर (३४ हजार झाडे)

जळगाव जिल्ह्यातील केऱ्हाळे बुद्रुक, पिंप्री, मंगरूळ (ता. रावेर) येथील भोकर व अभोळा नदीच्या लाभक्षेत्रात अतुल पाटील यांची ५० एकर जमीन आहे. त्यापैकी साधारण २१ एकरांवर नवती केळीची लागवड (Banana Cultivation) आहे.

केळी प्रमुख पीक असून, बेवडसाठी तूर, हळद (Turmeric) ही पिकेही घेतली जातात. पीक फेरपालटीवर विशेष भर दिला जातो. जमीन मध्यम, पाण्याचा निचरा करणारी असल्याने त्या दृष्टीनेच सर्व बाबींचे नियोजन केले जाते. निर्यातक्षम केळी उत्पादन (Banana Production) घेण्याची अतुलराव प्रयत्न करतात.

अतुल यांनी मागील वर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टप्प्याटप्प्याने केळी लागवड केली आहे. सध्या त्यांच्याकडे २१ एकरांत सुमारे ३४ हजार केळी झाडे आहेत. संपूर्ण क्षेत्रावरील लागवडीसाठी उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला आहे.

लागवड ६ बाय ५ फूट व साडेपाच बाय ५ फूट अंतरावर गादीवाफा पद्धतीने केली आहे. केळी बागेचे संपूर्ण व्यवस्थापन हे जळगाव येथील अखिल भारतीय फळे (केळी) संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

Banana Management
Banana Export : निर्यातीच्या केळीचा तुटवडा कायम

व्यवस्थापनातील बाबी

सध्या केळी बागेतील झाडे सव्वाआठ महिन्याची झाली आहेत. मागील महिन्यात निसवण सुरू झाली आहे. त्यानुसार नियोजन करून कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

मागील काही दिवसांपासून थंडी व ढगाळ हवामान अशी विषम हवामान स्थिती आहे. त्यामुळे एकसमान निसवण होत नसल्याचे दिसून येत आहे.

ढगाळ हवामानामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता असते. ही हवामान स्थिती पुढील ३ ते ४ दिवस राहण्याची शक्यता असल्याने झाडांचे सातत्याने निरीक्षण करत आहे.

बागेतील काही झाडांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यासाठी बुरशीनाशकांच्या आतापर्यंत २ फवारण्या घेतल्या आहेत.

निसवण सुरू असल्याने बागेत खत व्यवस्थापनात सातत्य राखले आहे. प्रति एक हजार झाडांना युरिया ८ किलो, पोटॅश १२ किलो, मॅग्नेशिअम सल्फेट दीड किलो याप्रमाणे रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या आहेत. तसेच मागील २० दिवसांत कॅल्शिअम नायट्रेट अडीच किलो, बोरॉन अर्धा किलो प्रमाणे दिले आहे.

सध्या निसवणीस वेग आला आहे. एका झाडावर ९ फण्या ठेवल्या आहेत. घडाचा दर्जा राखण्यासाठी घडांवर कीडनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घेतली जात आहे.

Banana Management
Banana Export : निर्यातीच्या केळीचे २८००-३००० रुपये

वाढलेले फुटवे काढून घेतले जात आहे. फण्यामधील वाळलेली पाने हवेच्या झोतामुळे केळी घडांवर आदळून केळीचा दर्जा खालावण्याची शक्यता असते. घडांना काळे डाग पडतात. त्यामुळे अशी पाने काढून घेण्याचे काम सुरू आहे.

कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमानही १५ अंश सेल्सिअसवर आहे. त्यामुळे बागेस रात्रीच्या वेळी सिंचन करण्यावर भर देत आहे. एकदिवसाआड रात्री ४ तास सिंचन केले जात आहे.

बागेच्या बांधावरील वाढलेले गवत मजुरांकरवी कापून घेतले आहे. तणनाशकांचा वापर टाळला जातो.

Banana Management
Banana Board : केळी महामंडळाचा प्रश्न रेंगाळलेलाच

पुढील १५ दिवसांतील नियोजन

या महिन्याच्या सुरुवातीपासून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. बदलत्या वातावरणामुळे बागेत कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशके आणि कीडनाशकांच्या आवश्यकतेनुसार फवारण्या घेतल्या जातील.

मागील काही दिवसांत बागेत कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे नांग्या भराव्या लागल्या होत्या. नांग्या भरल्यामुळे बागेत एकाचवेळी निसवण झालेली नाही. त्यामुळे झाडांची अवस्था पाहून घड झाकणे व इतर कार्यवाही सातत्याने करावी लागणार आहे.

पुढील काही दिवस केळी निसवण सुरूच राहील. त्यानुसार ४ ते ५ दिवसांआड फण्यांची विरळणी केली जाईल. तसेच घडांच्या संरक्षणासाठी स्कर्टिंग बॅग लावण्याची कार्यवाही केली जाईल.

घड केळीच्या कोरड्या पानांचा एक चुडा करून झाकून घेतले जातील. उष्णता वाढत असल्याने ही कार्यवाही केली जाईल.

घडांमुळे झाडांवर अधिक भार येतो. त्यामुळे झाडांना बांबूच्या साह्याने आधार दिला जातो. आधार देण्यासाठी निसवण झालेल्या झाडांच्या घडाच्या खालील बाजूस एक दोरी बांधून ती खांबाला बांधली जाईल.

येत्या काळात तापमानात वाढ होत जाईल. त्यानुसार सिंचनाची मात्रा आणि कालावधीमध्ये वाढ केली जाईल. रोज किमान ५ ते ६ तास सिंचन केले जाईल. ठिबक सिंचनाची तपासणी केली जाईल.

बागेतील फुटवे, कोरडी पाने नियमित काढून घेतले जातील.

- अतुल पाटील, ९८२२४५१६२१

(सायंकाळी सहा ते नऊ

या वेळेत संपर्क साधावा.)

(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com