
Technology-Based Agriculture:
शेतकरी : प्रमोद विठ्ठल वाघोले
गाव : दारूब्रे, ता. मावळ, जि. पुणे
क्षेत्र : साडेचार एकर
भात क्षेत्र : अर्धा एकर
पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा कास धरत आहेत. त्यात ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाचा अवलंब हेच वैशिष्ट्य असलेले शेतकरी म्हणून दाररुंब्रे (ता. मावळ) येथील प्रमोद वाघोले यांचे नाव घ्यावे लागेल. ते गेल्या अकरा वर्षापासून भातामध्ये एसआरटी तंत्रज्ञान वापरत आहेत.
पारंपरिक भात लागवडीसाठी चिखलणी, पुनर्लागवड इ. कामांमुळे लागवड खर्चिक व कष्टप्रद वाटू लागली आहे. परिणामी प्रमोद वाघोले हे भात लागवडीच्या कमी खर्चिक, कमी मजूर लागणाऱ्या ‘एसआरटी’ (सगुणा राइस तंत्रज्ञान) तंत्रज्ञानाकडे वळले. यात एकदा गादीवाफे बनविले की कोणतीही मशागत न करता पुढील अनेक वर्षे पीक घेतले जाते.
शून्य मशागतीवर कमीत कमी माणसांमध्ये भात लागवडीच्या या तंत्रासाठी नेरळ येथील चंद्रशेखर भडसावळे व मावळ तालुका कृषी सहायक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांचे मार्गदर्शन मिळाले. गेल्या पाच वर्षांपासून गादीवाफे न मोडता भात पीक घ्यायचे, त्यानंतर त्याच वाफ्यावर अन्य पिके घेत आहेत. वाघोले यांच्याकडे एकूण साडेचार एकर शेती असून, त्यापैकी अर्धा एकरांवर दरवर्षी भात लागवड करतात. त्यानंतर सोयाबीन पिकांमध्येही एसआरटी पद्धतीचा अवलंब केला जातो.
...अशी आहे एसआरटी साचाची रचना
एसआरटी भात लागवडीसाठी सर्वांत महत्त्वाचे साहित्य म्हणजे ‘एसआरटी साचा’ होय. हा साचा १०० सें.मी. बाय ७५ सें.मी. आयताकृती साच्याच्या खालील बाजूस २५ सेंटिमीटरवर एक अशा एकूण २० लोखंडी खालील बाजूस निमुळत्या खुंट्या बसविलेल्या आहेत. त्यांची उंची १३ सेंटिमीटर आहे.
दोन व्यक्तीने धरण्यासाठी ४५ सेंटिमीटर उंचीचा दोन्ही बाजूंनी दांडा बसविला आहे. हा साचा आपल्या गादीवाफ्यावर ठेवून एक इंच खोली इतका दाबून घेतला जातो. त्यानंतर त्या पडलेल्या पाइपमध्ये दाणे टाकायचे असतात. हा साचा स्थानिक पातळीवर कारागिराकडूनही बनवून घेता येतो. यासाठी साधारण २ ते अडीच हजार रुपयांपर्यत खर्च येतो.
...अशी केली जाते लागवड
अकरा वर्षांपूर्वीपर्यंत प्रमोद वाघोले हे पारंपरिक पद्धतीने भातशेती करत असतात. त्यानंतर त्यांना एसआरटी तंत्रज्ञानाविषयी माहिती समजून घेत एसआरटी पद्धतीने भात लागवडीचा निर्णय घेतला. पहिल्यादा शेतातील जमीन चांगली नांगरून घेतली जाते. त्यातील मोठी ढेकळे फोडून माती भुसभुशीत घेतात.
त्यानंतर बीबीएफ यंत्राच्या (रिझर) साह्याने १३६ सेंटिमीटरचे गादीवाफे बनवून घेतले. वाफ्याच्या माथ्यावरील अंतर १०० सेंटिमीटर ठेवून एसआरटी लागवडीसाठी बनविलेल्या विशिष्ठ साचाने गादीवाफ्यावर अर्धा इंच खोल खड्डे पाडून घेतले जातात. त्यामध्ये मजुरांच्या साह्याने चार ते पाच भाताचे दाणे व त्यासोबत १५.१५.१५ खत टाकून टोकण केली जाते. लोखंडी साचाच्या प्रत्येक दांडीचे माप २५ सेंटिमीटर असल्याने गादीवाफ्यावर पाच ओळी बसतात.
साधारणपणे एकरी सात ते आठ किलो बियाणे लागते. टोकण झाल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये शिफारशीत तणनाशकाची फवारणी केली जाते. परिणामी तण उगवणीचे प्रमाण खूप कमी होते. टोकण केल्यानंतर पंचवीस दिवसांनी हलकी बेणणी करून घेतात. त्यानंतर चार चुडाच्या मध्ये युरिया डीएपी ब्रिकेट खोचल्या जातात.
पारंपरिकपेक्षा रोग, किडीचे प्रमाण कमी
आमच्या मावळ भागामध्ये भात पिकावर प्रामुख्याने करपा, कडा करपा या रोगाचा आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मात्र एसआरटी पद्धतीने लागवडीमध्ये पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये रोग, किडीचे प्रमाण कमी राहते. हे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्यामुळे फारशी फवारणी घ्यावी लागत नाही. मला स्वतःला गेल्या पाच वर्षात भात पिकासाठी एकही फवारणी घ्यावी लागली नसल्याचे प्रमोद वाघोले यांनी सांगितले. त्यामुळे पीक संरक्षणासाठी होणाऱ्या खर्चात (सुमारे दोन ते तीन हजार रुपये) बचत झाली आहे.
कमी खर्चात जास्त उत्पादन
पारंपरिक भात लागवडीमध्ये प्रत्येक वर्षी नांगरट, चिखलणी, रोपवाटिका तयार करणे, पुनर्लागवड, पुन्हा रोग किडींचा प्रादर्भाव इ. घटकांसाठी मोठा खर्च होतो. मात्र शून्य मशागतीवर आधारीत एसआरटी तंत्रामुळे खर्चात मोठी बचत झाली आहे. पूर्वी पुनर्लागवडीसाठीही मोठे मनुष्यबळ लागत असे. आता बाहेरील मजूर फारसे न घेता कुटुंबीयांच्या मदतीनेच लागवड करत आहे. मजुरीचा खर्चही वाचत आहे. पारंपरिक लागवडीच्या तुलनेमध्ये बियाणेही कमी लागते. सर्व विचार केला तर पारंपरिक भात पिकाचा उत्पादन खर्च ४० ते ४५ हजारांच्या घरात जात असे. मात्र यातील बहुतांश खर्च आता वाचला असून, आता २० ते २५ हजार रुपये खर्चामध्ये भातपीक हातात येते.
उत्पादनात वाढ
एसआरटी पद्धतीमध्ये चार ते पाच दाणे टाकून टोकण केलेल्या भाताच्या चुड्यामध्ये पंचेचाळीस ते साठपर्यंत फुटवे येतात. त्यामुळे काढणीच्या वेळी पारंपरिक लागवडीपेक्षा उत्पादन जास्त मिळत आहे. साधारणपणे एकरी एक ते चार क्विंटलपर्यंत वाढ झाली आहे. अर्धा एकरांतून २० क्विंटल भाताचे उत्पादन प्रमोद घेत आहेत.
शेतकऱ्यांसाठी वरदान
भात कापणी झाल्यानंतर गादी वाफे अजिबात न मोडता चार ते पाच दिवसांनंतर पुन्हा एकदा तणनाशकाची फवारणी केली जाते. त्याच क्षेत्रावर रब्बीमधील पीक घेतले जाते. खरिपात अर्धा एकरावर भात लागवड, व दहा गुंठे क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतात. रब्बी हंगामात या पद्धतीनेच कांदा, लसूण इ. पीक घेतले जाते. या हंगामातही शून्य मशागतीवरच लागवड केली जात असल्यामुळे खर्चात मोठी बचत होते. उत्पादन खर्च कमी करणारी ही ‘एसआरटी पद्धत’ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
एसआरटी पद्धतीने लागवड केल्याने झालेले फायदे
गादीवाफे न मोडता त्याच गादीवाफ्यावर फेरपीक घेता येते. खरीप व रब्बी हंगामात खर्चात मोठी बचत झाली.
भात लागवडीसाठी भात रोपे तयार करणे, रोपे खणणे, पुनर्लागवड करण्याची आवश्यकता नाही
लागवड केलेल्या पहिल्या पिकांची मुळे जमिनीत टेवली जातात. त्यातील सेंद्रिय पदार्थ जमिनीत कुजत राहतात. जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी, गांडुळासाठी खाद्य उपलब्ध होते. परिणामी प्रमोद वाघोले यांच्या शेतात गांडुळांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसते.
सेंद्रिय कर्बात वाढ झाल्याने पोत सुधारतो. जमिनीची सुपीकता वाढते
पिकांतील रोग-किडींच्या प्रादुर्भावत लक्षणीय घट झाली आहे.
पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये ५० मजूर लागत असत. ते कमी होऊन केवळ १२ ते १५ लोकांमध्ये कामे होतात. मजुरांवरील अवलंबित्व कमी झाले आहे.
प्रमोद विठ्ठल वाघोले ८४८४९५७२७७
(शब्दांकन : संदीप नवले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.