International Women's Day : कष्टाने माखलेल्या हाताचे बोल

Article by Ganga Bakle : खेड्यात राबणाऱ्या बायांचे आणि त्यांच्या मुलांचे कष्टाचेही मोजमाप जरूर व्हायला पाहिजे. त्यांचे कष्ट रंगलेत. त्यांच्यामुळेच माणसांचे आयुष्य रंगलेले आहे. पण किती आयाबायांच्या आयुष्यात इथल्या शिक्षणाने आणि व्यवस्थेने रंग भरले? याचाही विचार आज जागतिक महिला दिनी व्हायला पाहिजेत.
International Women's Day
International Women's DayAgrowon
Published on
Updated on

गंगा बाकले

Women Empowerment : "तुमची नजर भेदक आणि चेहरा हसरा दिसतो. बोलण्याची शैली आणि संप्रेषण (आपल्या बोलण्याचा इतरांवर पडणारा प्रभाव आणि परिणाम) जबरदस्त आहे,’’ कुणीतरी मला एकदा म्हणाले. मी गावखेड्यातून आल्यामुळे आणि खेड्यातच नोकरीला असल्यामुळे शिक्षिका म्हणून राबताना शेतीत कष्टाने माखलेल्या बायांचे मन जाणून घ्यायला माझ्या व्यक्तिमत्त्वाचे गुण मला उपयोगाचे ठरले.

खेड्यातल्या बाया जीव लावून बोलतात. त्यांच्या बोलण्यात सूर -लय आणि ताल असतो. मव्हळाच्या मधाचा गोडवा त्यांच्या जिभेवर सदैव असतो. मला बायांचे ते बोलणे खूप आवडते. काही जणींना मी बोलते केले.

रमाबाई सांगू लागल्या, ‘‘बाई बसा. नेहमी शाळात येळावर येता, येळावर जाता. लेकराईला नादर शिकविता. तुमचा जल्म सार्थकी झाला. हे बघा, कापूस येचायला गेले होते. कापसाच्या नख्या लागून अंग वरबाडून निघालं. नख्यातून कापूस काढताना हाताच्या बोटाचे नखं रक्ताळले. आठ ते दहा रुपये किलोने कापूस येचावा लागायलाय.

सीझनमध्ये १२५ किलोग्रॅमपर्यंत कापूस येचला. एक हजार रुपयांपासून साडेबाराशे रुपयापर्यंत रोजगार पडला. पण पहाटं चार वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत चार घास खाऊन रगत आटवावं लागतंय. लेकरंबाळं म्हातारे सासूसासरे शाळात वाटं लावतात. दिवसभर कितीबी मरमर करा, तरीपण रातच्याला सैपाक थापावं लागतंयच. धुणीभांडी घासून मंगच एकटीला अंग भुईला टेकवावे लागते. लेकरं शिकायलेत तुमच्या भरवशावर.

आमचे कारभारी दिवसभर गावात. रानात आम्ही कमवायलोत पण ते साधं दोन शब्द विचारपूस करीत नाहीत. लेकरांना शिकवून साहेब आणि साहेबीण करणार हाये. सूनबाई अन् जावई तसेच पाहणार हाये. आमच्या आयुष्याची तीच कमाई आहे. शेतातील कष्ट देवाबिगर या पृथ्वीतलावर कोणाला कळून फायदा नाही.

International Women's Day
Women Entrepreneurs : सौर वाळवण तंत्र वापरातून ३५ महिला झाल्या उद्योजिका

बाईच्या जल्मा। कामाचा वसा

उल्टाच फासा। देवाचा भरोसा

काय करावे? पण आता काळ बदलायलाय. सोयाबीन कापण्यापेक्षा तुमच्यासारख्या ‘साहेबीण’ झालेल्या माझ्या पोरी मला देवानं बघायला इथं ठेवावं. हे त्यांचे असे काळीजकातर बोलणं ऐकून मी काळजातून आतल्याआत पाझरत होते. दिवसभर वर्गात असलेल्या अशा अनेक रमाबाईंचे लेकरं माझ्यासमोर असतात. अभावग्रस्त वातावरणातून आल्यामुळे त्यांच्या अध्ययनावर कमी-जास्त परिणाम होताना मला दिसतो. मग मी अशा मुलांना समजून घेत शिकवते.

रमाबाईला त्यांचे कष्ट चुकणार नाहीत. त्यांना मिळत असलेला एक हजार ते साडेबाराशे रुपये रोजगार सीझनमध्ये मिळतो. मग लाकूडफाटा गोळा करणे, पिकांचा सर्वा पाहणे, दुभत्या जनावरांना चारापाणी करणे, गोधडे शिवून देणे, घरी डाळदाणा तयार करणे, पापड, वडा, भुरकी कुटून ठेवणे, शेणपाणी करणे आदी कामे करावी लागतात. मात्र या कष्टाचा मोबदला बिनापैशाचा असतो, हे मला जाणवते.

गडचिरोली जिल्ह्यातील कुटुंबच्या कुटुंब मी ज्या गावात आर्वीत (ता. जि. परभणी) नोकरीला आहे, त्या गावच्या सोयाबीन, हरभरा, गहू कापणीला येतात. रानातच राहुट्या टाकून राहतात. भाजीभाकर करून लवकर कामाला लागतात.

झाडाच्या गळफांदीला तान्ह्या लेकरांच्या झोळण्या टांगून उन्हातानात काम करतात. शाळेत जाता-येता या गोष्टी पाहून माझे मन पिळून येते. मग मी या बायांना दुःखाची माया म्हणून चार शब्द बोलते. या कष्टकऱ्यांच्या ‘घामाचा सुगंध’ आपल्यासारख्यांच्या जीवनात ‘जान’ आणतो.

पण कष्टकऱ्यांना हे असे जीवघेणे जगणे भाग पाडले जाते. अशातही त्यांची शाळेत येणारी लेकरं आदबीने वागतात. मी त्यांना सांगते, ‘तुमच्या आईचा कष्टाचा सन्मान म्हणून तुम्ही खूप शिका, मोठे व्हा आणि मोठेपणी त्यांचा सांभाळ करा’, माझे असे धीर देणारे बोलणे ऐकून ते माझ्याशी बोलतात.

मांडाखळीचे कलीमचाचा सकाळीच कामानिमित्त घराच्या बाहेर पडतात. त्यांची कष्टाळू पत्नी शबाना रोजीरोटीसाठी शेळ्या पाळते. शेळ्या चारताना नजर चुकवून त्या पाटलाच्या मक्याच्या शेतात घुसल्या.

त्यांना माघारी हाणताना मक्याच्या धसकटाने शबानाचा तळपाय बोटभर कापला. शबानाची मुलगी रेहाना त्या जखमेवर हळद भरत होती.पैसे वाचविण्यासाठी त्यांनी घरगुती उपाय केले. मला वाटले, ‘दवाखान्याचे काय?’ रेहाना मला म्हणाली,

‘‘आलिकुन गंगा-पलिकुन गंगा, गंगात होतं पाखरू, मॅडम मला वटीत घ्या, मी गरिबाचं लेकरू’’, गरिबीत सुद्धा शिकणाऱ्या रेहानाचे भाषाविश्व आणि भावविश्व समृद्ध झालेले पाहून मला आनंद झाला. कष्टाला सुखावून आनंद जपणारी ही जिगरबाज खेड्यातली माणसं.

International Women's Day
Women Empowerment : महिलांची ग्लोबल भरारी

लेकरांची आजी शाळेतली खिचडी खायला येते. अधूनमधून दिसणाऱ्या आजीला बोलते केल्यावर आजी सांगू लागते, ‘‘बाई, पोरगा अन् सून पुण्याला कामाला गेलेत. कृष्णा आणि रंगनाथ हे दोन त्यांचे पोरं- माझे नातू हायेत.

माझं वय आता सत्तर वर्षांचे हाये, मालकाचे वय पंचाहत्तरीच्या पुढे हाये. दोन एकर वावरातली पिकांची पेरणी, वेचणी आणि मळणी मीच करते. आज घरी मी एकटीच. मालक परगावाला बाजाराला गेले. लवकर वावरात जायचे हाये. नातवायला भेटून जावा म्हणले, म्हणून आले हो!’’ तिच्या हाताच्या रेषा पाहून, खडबडीत पाय बघून मी पार तुरटीसारखी विरघळून जाते.

तरीही तिचे नातू गुटगुटीत दिसतात. हे जाणून घेण्यासाठी मी त्या मुलांनाच विचारले. मुलांनी आजीबद्दल सांगितले. ‘‘आजीने दोन-चार कोंबड्या पाळल्यात. त्यांची अंडी आम्हांला खाऊ घालते. रानातून येताना रानमेवा चाखायला आणते. आमच्या हातात नांगर येऊ नये म्हणून रात्री वही-पेन देते. आजी आम्हांला आईच्यावरची माया लावते’’, हे ऐकून मला आजीचा नातवांना शिकवण्याचा विचार बरेच काही सांगून गेला.

आता राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश सुरू करणार असल्याचे सांगितले. अशी कामे करणारी माणसे आणि त्यांची लेकरं यांच्या कष्टाचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. परदेशात मुलांच्या कृतीवर भर देऊन त्यांना औपचारिक शिक्षण अनौपचारिक पद्धतीने दिले जाते.

आपल्याकडे माहितीवर आधारित शिक्षण दिले जाते. त्यामुळे आता शिक्षण कौशल्यावर भर दिल्या जात आहे. खेड्यात राबणाऱ्या बायांचे आणि त्यांच्या मुलांचे कष्टाचेही मोजमाप जरूर व्हायला पाहिजे. त्यांचे कष्ट रंगलेत. त्यांच्यामुळेच माणसांचे आयुष्य रंगलेले आहे. पण किती आयाबायांच्या आयुष्यात इथल्या शिक्षणाने आणि व्यवस्थेने रंग भरले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी शेतातील आयाबायांच्या कष्टाला किंमत दिलीच पाहिजे.

(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com