Agriculture Crisis: शेतकऱ्यांचे खरे शत्रू कोण?

Farmer Issues: सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे, धोरणामुळे, आयात-निर्यातीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान होतं, ते अधिक की अवकाळीमुळं होणारं नुकसान अधिक? कुठल्याही युद्धात शेती आणि शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान का होतं, असे प्रश्‍न आपल्याला का पडत नाहीत?
Agriculture Challenges
Agriculture ChallengesAgrowon
Published on
Updated on

Agriculture Challenges: बहुसंख्य शेतकऱ्यांना आपले खरे शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळत नाही. याचं कारण शेतकरी आपल्या प्रश्‍नांकडे चिकित्सकपणे पाहत नाहीत. स्वतंत्रपणे विचार करीत नाहीत. कळपाचा, झुंडीचा भाग बनतात. सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे, धोरणामुळे, आयात-निर्यातीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान होतं, ते अधिक की अवकाळीमुळं होणारं नुकसान अधिक? कुठल्याही युद्धात शेती आणि शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान का होतं, असे प्रश्‍न आपल्याला का पडत नाहीत?

नुकत्याच झालेल्या अवकाळी, वादळी पावसानंतर मी म्हटलं होतं, की निसर्ग जे जे करतोय ते माझ्या भल्यासाठीच; अशी माझी भावना बनलीय. त्यामुळं निसर्गाबद्दल माझी तक्रार नाही. मी निसर्गपूरक जगण्याचा प्रयत्न करतोय. मी हे जे लिहिलं तेच माझं जगणं आहे. यात कसली अतिशयोक्ती नाही की स्वप्नरंजन!

माझ्या या म्हणण्याचा दोन शेतकरी मित्रांना खूप राग आला. एक जण म्हणाला, ‘‘माझ्या ज्वारीचं आणि उन्हाळी तिळाचं मोठं नुकसान झालंय. हा अवकाळी पाऊस म्हणजे ब्याद आहे. तू याचं कौतुक करणं म्हणजे अतीच झालं.’’ दुसऱ्या मित्राच्या आंब्याला फटका बसला होता. आंब्यामधून चांगले पैसे मिळविण्याचं त्याचं स्वप्न भंगलं होतं. तो बोलला, ‘‘ही अवकाळी माझी एक नंबरची शत्रू आहे. तू निसर्ग, निसर्ग म्हणून याचं उदात्तीकरण करतो आहेस.’’

मी दोघांनाही एकच उत्तर दिलं. मी म्हटलं, की या मातीनं, निसर्गानं तुला पिकं घेण्यासाठी, आंब्याची झाडं लावण्यासाठी आमंत्रण दिलं होतं का? हे तुझं शेती करणं निसर्गाची गरज आहे का? निसर्ग, निसर्ग म्हणजे काय? तर हा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतुचक्र. पृथ्वीवरची जीवसृष्टी याच्यावर तर टिकून आहे. इथं लाखो, करोडो जीव, जंतू, पशू, पक्षी, वनस्पती जगत आहेत. पृथ्वीवर या सगळ्यांची मालकी आहे. माणसांनी गैरसमज करून घेतलाय की, हे जग फक्त त्यांच्यासाठीच आहे. तुमचं शिक्षण झालंय. तुम्ही विज्ञान शिकलात. हे सगळं का घडतंय, हेही तुम्हाला माहीत आहे. निसर्गाच्या दृष्टीने माणसांचं अस्तित्वच नाही. मुळात कोणाचं भल-बुरं तो करीत नाही. तो निसर्गनियमाने बांधलेला आहे. परस्परसंबंधी निसर्गातील घडामोडींमुळे हे सगळं घडतं. तरीही तुम्ही निसर्गाच्या नावाने खडे फोडताय. मला तुमची कीव येते...

Agriculture Challenges
Indian Agriculture: जनुकीय संपादन : शाश्वत अन् सुरक्षितही

त्यांना माझ्या बोलण्याचा प्रतिवाद करता येईना. तरीही एक जण बोलला, की मग या नुकसानीला जबाबदार कोण? माझं नुकसान कोण भरून देणार? मी म्हटलं, की आपण स्वत: आणि सरकार याला जबाबदार आहोत. शेतीतील ही जोखीम नवी नाही. वर्षानुवर्षे हे घडत आहे. शेती करायची तर ही जोखीम पत्करल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याबद्दल सतत रडूनही उपयोग नाही. निसर्ग ही मानवी नियंत्रणाखालची बाब नाही.

दुसरी महत्त्वाची जबाबदारी आहे ती सरकारची. शेतकरी स्वतःची गरज म्हणून शेती करीत असला तरी देशातील जनतेला अन्नधान्य पुरविण्याचं मोलाचं काम तो करतोय. त्यांनी एक वर्ष जरी फक्त स्वत:पुरतं पिकवायचा निर्णय केला तरी देशात अन्नधान्य टंचाई निर्माण होऊन वाटेल त्या किमतीला परदेशातून धान्य आयात करावं लागेल. तरीही अन्नाची गरज भागेल असं नाही. शेतकरी एकजुटीने असा निर्णय करू शकत नाहीत. म्हणून सरकार शेतकऱ्यांची लूट करते. हा बेजबाबदारपणा आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असलेलं सरकार असं वागू शकत नाही. अन्यथा, आदर्श पीकविमा योजना राबवून, शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई देता येऊ शकते. हे अशक्य नाही. पण त्यांना ते करायचं नाही.

मी त्याला म्हटलं, की निसर्गाबद्दल तू एवढं बोलतोस तेवढं सरकारविरोधात बोलतोस का? राजकारण्यांना, तुझ्या लोकप्रतिनिधींना याबद्दल कधी जाब विचारतोस का? रस्त्यावर उतरून याचा कधी निषेध केला आहेस का? आठवून बघ थोडं. दुसरी एक महत्त्वाची बाब तू विसरतो आहेस किंवा त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेस. सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे, धोरणामुळे, आयात-निर्यातीच्या निर्णयामुळे तुझं जे आर्थिक नुकसान होतं, ते अधिक की अवकाळीमुळं होणारं नुकसान अधिक? साधं सोयाबीनचं उदाहरण डोळ्यासमोर आणून बघ. केवळ सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळं तुझं किती नुकसान झालंय? तेवढं नुकसान अवकाळी पावसानं केलंय का?

माझं बोलणं त्याला पटलं असावं. तो बोलला, ‘‘खरं आहे. निसर्गापेक्षा सरकारच शेतकऱ्यांचा खरा शत्रू आहे. मला माझा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.’’

देशभक्तीचा मुखवटा

आणखी एक ताजा किस्सा आहे. मला एका शेतकरी मित्राचा फोन आला होता. तो बोलला, ‘‘बाकी काही असो; हे पाकिस्तानला धडा शिकवताहेत ते बरंय. मी भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं. पण मला एक प्रश्‍न पडलाय. भारतात कांद्याचं उत्पादन कमी झालं होतं. शेतकऱ्यांना जादा भाव मिळत होता. ते खूष होते. पण कांद्याच्या या भाववाढीविरोधात प्रचंड गदारोळ माजविण्यात आला. जणू कांद्याअभावी लोक मरणार आहेत, असं चित्र निर्माण करण्यात आलं. सरकारला मध्यमवर्गीयांचं हे दु:खं बघवलं नाही.

त्यांनी पाकिस्तानातून कांदा आयात केला. कांद्याचे दर कोसळले. भारतातील शेतकऱ्यांची माती झाली. केवळ मध्यमवर्गीय मतदारांना खूष करण्यासाठी हा शेतकरीविरोधी निर्णय घेण्यात आला. याची लाज ना कांद्याची भाववाढ झाली म्हणून ओरडणाऱ्यांना, ना आयातीची परवानगी देणाऱ्यांना, ना कांदा मागवणाऱ्यांना वाटली ना खाणाऱ्यांना. सरकारच्या या निर्णयामुळे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्या होत्या. केवळ एकगठ्ठा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी, कायम शत्रूराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानमधून कांदा आयात करणारे आणि तो मिटक्या मारीत खाणारे लोक देशप्रेमी आहेत, असं तुला वाटतं का?’’

Agriculture Challenges
Farmer Issue: आत्महत्या खरंच थांबवायच्या का?

मी म्हटलं, की हा प्रश्‍न तू देशभक्तीचे ढोल बडवणाऱ्या प्रत्येकाला विचार. यांचा देशभक्तीचा मुखवटा आपोआप गळून पडेल. आपल्याच देशातील शेतकऱ्यांचे शत्रू असलेले हे लोक देशभक्त कसे काय असू शकतात? मला हे कोडं सुटलेलं नाही.

दुर्दैवाने बहुसंख्य शेतकऱ्यांना आपले खरे शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळत नाही. याचं कारण शेतकरी आपल्या प्रश्‍नांकडे चिकित्सकपणे पाहात नाहीत. स्वतंत्रपणे विचार करीत नाहीत. कळपाचा, झुंडीचा भाग बनतात. कुठल्याही युद्धात शेती आणि शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान होतं. तरीही युद्धाचा निषेध करण्याचं धाडस कोणी दाखवत नाहीत. युद्ध ही जगभरातील सत्तापिपासूंची गरज असते. हे कळलं तरच युद्धाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आणि शेतकऱ्यांना आपलं हित कशात आहे ते समजू शकेल!

शेती म्हणजे एखादा माल उत्पादक कारखाना नाही की एका ठिकाणचं मॉडेल सगळीकडं उपयोगात येईल. शेतीत अफाट वैविध्य आहे. जमिनीत आणि वातावरणातही. आमच्या कुटुंबाच्या एकत्रित २४ एकर जमिनीचा विचार केला तरी ती चार प्रकारची आहे. हलकी, मुरमाड चुनखडीयुक्त, मध्यम व काळी पण चिबाड. काही रानात वाफसा नसतो तेव्हा काही रानातील पिकं वाळत असतात.

एकाच वेळी मला पाऊस हवाही असतो आणि नकोही. ही वरवर गमतीशीर वाटावी अशी परिस्थिती आहे. पण हे वास्तव आहे. कमी-जास्त प्रमाणात बहुतेक शेतकऱ्यांची स्थिती अशी असते. सरसकटीकरण इथं हास्यास्पद बनतं. काळ्या, भरपूर अन्नद्रव्ये असलेल्या जमिनीचे निकष हलक्या, निकृष्ट जमिनीला लावता येत नाहीत. साहजिकच तिथलं अनुकरण दुसरीकडं यशस्वी ठरेल, याची खात्री देता येत नाही. बहुतांश शेतकरी या अनुकरणाला बळी पडतात. मोठं नुकसान करून घेतात. आणि शेतीच्या नावाने खापर फोडतात.

शेतकरी स्वत:च्या डोक्याचा वापर करीत नाहीत. याचं कारण त्यांच्या मातीशी त्यांची नाळ जुळलेली नाही. त्यांना आपल्या मातीची ताकद आणि मर्यादा माहीत नाहीत. मातीशी नाळ जुळलेली असली, की शेतीत मोठा फटका बसत नाही. सरकारची नीतीच अशी आहे की शेतीवर कोणी लखपती, अब्जाधीश बनू शकत नाही. कोरडवाहू, अल्पभूधारक शेतकरी फक्त जगू शकतो. तो कुठलीच रंगीत स्वप्नं यावर पूर्ण करू शकत नाही. हे वास्तव नीट लक्षात घेतले, की मग शेतीच्या नावाने रडण्याची गरज पडत नाही.

उंटावरचे शहाणे

शेतीबाहेरच्या लोकांना शेती हा सर्वांत सोपा आणि अडाणी लोकांचा व्यवसाय वाटतो. त्यामुळे ज्यांचा शेतीशी कसलाच संबंध नाही, असे लाखो लोक शेतकऱ्यांना सल्ला देण्याचा आगाऊपणा करीत असतात. कारण शेतकऱ्यांपेक्षा आपण शहाणे आहोत, असं या पढतमूर्खांना वाटतं. हे लोक खोटीनाटी उदाहरण देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असतात. अशांना दूर ठेवणं गरजेचं असतं. माझ्या शेतीबद्दल मला जेवढं कळतं तेवढं शेतीत डॉक्टरेट घेतलेल्या तज्ज्ञालाही कळत नाही, हे वास्तव आहे. शेती हा उंटावरून शेळ्या राखण्याचा व्यवसाय नाही.

मला वाटतं मातीशी नाळ जुळली नसल्याचे हे दुष्परिणाम आहेत. ज्याचं मातीवर खरंखुरं प्रेम आहे, त्याला वास्तवाची जाण असते. तो मातीकडून अवास्तव अपेक्षा करीत नाही. या देशात शेती हा व्यवसाय होऊ शकत नाही. कारण त्यासाठी आधी शेतीलुटीची व्यवस्था उद्‌ध्वस्त करावी लागेल. ते होणार नाही हे कळत असेल तर, शेती हा आनंददायी जगण्याची शैली बनविल्याशिवाय पर्याय नाही. या जीवनशैलीचे फायदे अफाट आहेत. फक्त ते पैशात मोजता येत नाहीत. त्यासाठी दृष्टिकोन बदलणे हाच मार्ग आहे.

९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९,

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com