
Crop Improvement: भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) भाताच्या ‘डीआरआर धान १००’ आणि ‘पुसा राइस डीएसटी १’ या दोन जाती नुकत्याच प्रसारित करण्यात आल्या आहेत. जनुकीय संपादन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या ह्या भारतातील पहिल्याच दोन जाती असल्याने हे शास्त्रज्ञांचे ऐतिहासिक यश मानले जात आहे. हवामान बदलाचे मोठे आव्हान जगाच्या शेतीसमोर आहे.
या काळात नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले असून भारतात तर शेती करणेच जिकिरीचे ठरत आहे. पिकांचे पारंपरिक वाणं बदलत्या हवामानात तग धरताना दिसत नाहीत. त्यामुळे पिकांची उत्पादकता पर्यायाने उत्पादन घटत आहे. म्हणून तग धरणाऱ्या ताण सहनशील वाणांची मागणी देशातील शेतकऱ्यांनी लावून धरली होती. त्यातच ताण सहनशील वाणांची निर्मिती जनुकीय तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही.
आपल्या देशात खाद्यान्न पिकांमध्ये जनुकीय बदल (जीएम) तंत्रज्ञानाने विकसित वाणांना परवानगी दिली जात नाही. अशावेळी जनुकीय संपादन (जिनोम एडिटिंग) तंत्रज्ञानाने हे यश साधण्यात आल्याने देखील या जातींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाताच्या या दोन वाणांनी जनुकीय संपादन तंत्रज्ञानास भारताने दार उघडले असले तरी अजून बरेच काही साध्य करावे लागणार आहे.
जनुकीय संपादनप्रक्रियेवर जगभरात विविध क्षेत्रांत खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. या तंत्रज्ञानाने शास्त्रज्ञांना कल्पकतेने पिकामधील ‘डीएनए’मध्ये अचूक बदल करता येतो. त्यामुळे वनस्पतीच्या जनुकामधील अवगुण वगळून त्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचे एकत्रीकरण करता येते. ‘जीएम’ अर्थात जनुकीय सुधारीत तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या पिकांच्या वाणांच्या सुरक्षिततेबाबत संशोधक, सरकार, शेतकरी आणि जनतेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे संभ्रम आहेत.
तसेच, जीएम वाणांना पर्यावरणवाद्यांचा देखील विरोध होतो; कारण या तंत्रज्ञानात एका सजीवामधील जनुके काढून ते दुसऱ्या सजीवात टाकले जातात. त्यामुळे जीएमबाबत मतभेद दिसून येतात. परंतु हे मतभेद ‘जनुकीय संपादन’ तंत्राच्या बाबतीत उद्भवणार नाहीत. कारण या तंत्रज्ञानामध्ये जरी पिकांची नवीन वाणं तयार केली गेली, तरी या प्रक्रियेत दुसऱ्या सजीवामधून जनुके सोडली जात नाहीत.
उलट ज्या सजीवामध्ये बदल घडवून आणायचा आहे, त्याच सजीवामध्ये अचूक ‘आंतरिक जनुकीय बदल’ केला जातो. हे तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित, शाश्वत आणि कार्यक्षम मानले जाते. नैसर्गिक संरचनेमध्ये बदल होत नसल्यामुळे अमेरिकेमध्ये या तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या पिकांना नियंत्रक आणि नियामक अटीतून अगोदरच मुक्त केले आहे. त्यानंतर भारत सरकारने देखील जनुकीय संपादनासाठीची मार्गदर्शक तत्त्वे शिथिल केली आहेत.
त्यातच आयसीएआरने जनुकीय संपादनाने सुधारित वाणे विकसित करण्यासाठी संशोधनाचे मोठे काम हाती घेतले आहे. आज अन्नसुरक्षेच्या चिंतेने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. भारत देश तर अजूनही कडधान्य तसेच तेलबियांत स्वयंपूर्ण नाही. शिवाय अन्नधान्यांत पोषणमुल्यांची कमतरता ही आपली नेहमीच दुबळी बाजू राहिली आहे. त्यातूनच भूक, कुपोषण, दारिद्र्य़ ही प्रमुख संकटे देशासमोर आ वासून उभी आहेत.
ही सर्व आव्हाने जनुकीय संपादन तंत्राने दूर केली जाऊ शकतात. जनुकीय संपादनाने ताण सहनशील, अधिक पोषणमूल्ययुक्त, अधिक उत्पादनक्षम जाती विकसित केल्या जाऊ शकतात. हे भाताच्या दोन नव्या वाणांनी दाखवून दिले आहे. आता गरज आहे ती तृणधान्य, कडधान्य तसेच तेलबियांच्या अधिकाधिक जनुकीय संपादित जाती विकसित करून देशाला भूक, कुपोषण आणि दारिद्र्य़ यातून मुक्त करण्याची!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.