
Sustainable Mango Farming: भारतामध्ये दक्षिणेकडील राज्यांमध्ये आंबा पिकाला सर्वप्रथम मोहर येतो, नंतर महाराष्ट्रात आणि त्यानंतर उत्तर भारतीय राज्यांमध्ये मोहर येतो. महाराष्ट्रातील हवामान आंबा पिकासाठी अत्यंत पोषक आहे. त्यातच उत्पादकता वाढविणाऱ्या अतिघन लागवडीविषयी जागरूकतेमुळे आंबा लागवड वाढत चालली आहे. अतिघन लागवड पद्धतीची माहिती घेऊ.
आंबा झाड बहूवर्षीय व उंच वाढणारे असून, त्याची मुळे अन्नद्रव्याच्या शोधात खूप खोलपर्यंत जातात. त्यामुळे आंबा लागवडीसाठी गाळाची, कसदार आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८ दरम्यान, मुक्त चुन्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेली जमीन निवडावी.
उथळ, नापीक, डोंगर उतारावरील व काही प्रमाणात पाणथळ, क्षारयुक्त जमिनीमध्ये लागवड करायची असल्यास अधिक काळजी घ्यावी. अशा जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे, जमीन समपातळीत करणे, गरजेप्रमाणे गाळ टाकणे किंवा मुरूम टाकणे या सारख्या सुधारणा शास्त्रीय पद्धतीने करून घ्याव्या लागतात.
त्यानंतर एक मीटर लांब, रुंद व खोल खड्डे खोदावेत. त्यात गाळाची माती ५० ते ६० टक्के आणि शेणखत भरून घ्यावे. जमिनीचा सामू जास्त असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य प्रमाणात मुरूम टाकून व अन्य काही तांत्रिक सुधारणा केल्यानंतर आंबा बाग लावता येऊ शकते.
लागवडीचे अंतराचे विविध प्रयोग
आंबा लागवडीसाठी पूर्वीपासून दहा बाय दहा मीटर अंतर शिफारशीत आहे. मात्र ९० च्या दशकात आम्ही औरंगाबादमध्ये व गटशेतीमध्ये पाच बाय पाच मीटर व पाच बाय सहा मीटर अंतरावर म्हणजे घन पद्धतीने आंबा लागवडीचे प्रयोग केले होते. मात्र २००५ मध्ये आंबा परिषदेच्या निमित्ताने दिलेल्या दक्षिण आफ्रिका भेटीमध्ये एक बाय चार मीटर, दीड बाय पाच मीटर अशा अंतरावर पाच हजार हेक्टर क्षेत्रावर केलेली अतिघन आंबा लागवड पाहण्याचा योग आला. एकरी २० ते २२ टन उत्पादन येत असल्याचे समजले.
त्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या शेतावर दीड बाय चार मीटर, पाच फूट बाय तेरा फूट किंवा पाच फूट बाय १४ फूट अशा अंतरावर आंबा लागवडीस सुरुवात केली. २००६ मध्ये रुईभर (जि. धाराशिव) येथे, तर २००७ मध्ये ढाकेफळ (ता. पैठण) एका बीजोत्पादन कंपनीच्या प्रक्षेत्रावर दोन बाय चार मीटर अंतरावर अतिघन लागवड केली. त्यानंतर अशा प्रकारची घन लागवड कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील काही भागात होऊ लागली.
फायदे
जमीन, पाणी व अन्य साऱ्या संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे शक्य.
पारंपरिक आंबा लागवडीच्या तुलनेन एकरी जास्त उत्पादन मिळते.
दोन ओळींतील अंतर योग्य ठेवल्यामुळे आंतरमशागती, फवारणी, फळांची वाहतूक छोट्या ट्रॅक्टरद्वारे कमी कष्टात व खर्चात शक्य होतात.
निर्यातयोग्य व्यवस्थापनासाठी सुलभ लागवड पद्धती.
सूर्यप्रकाशाचा व कार्बन डाय - ऑक्साइडच्या कार्यक्षम वापरामुळे उत्तम प्रकाश संश्लेषण होते. बागेतून तिसऱ्याच वर्षी व्यापारी उत्पादन सुरू होऊ शकते.
तोटे
बाग उभारणीचा सुरुवातीचा खर्च अधिक राहतो.
फळ झाडांचा सांगाडा तयार करणे, घेर नियंत्रण हे अधिक कौशल्याचे व खर्चिक काम असते.
बागेचे आयुष्यमान तुलनेने कमी (साधारण २५ ते ३० वर्षे) असते. आपल्याकडे अतिघन लागवड नवीन असल्याने इतक्या जुन्या बागा व आयुष्यकाळाबद्दल अनुभव नाही. मात्र पंधरा वर्षे जुन्या बागा अजूनही चांगल्या उत्पादनक्षम आहेत.
लागवड
२००६ पासून केलेल्या विविध लागवडीच्या तुलनात्मक अभ्यासातून दक्षिण -उत्तर दिशेने पाच ते सहा फूट तर पूर्व - पश्चिम दिशेने १३ ते १५ फूट अशी लागवड फायदेशीर दिसून आली आहे. या पद्धतीच एकरी ५८० ते ६२२ झाडे बसतात.
दर ठिकाणी एक बाय एक मीटरचा खड्डा घेत बसण्यापेक्षा सरळ उत्तर दक्षिण पद्धतीने एक मीटर रुंदी व एक मीटर खोलीचा सलग चर खोदकाम यंत्राने खोदून घ्यावा. काळी व भारी जमीन असल्यास काढलेली पहिली बकेटमधील सुपीक माती चराच्या एका बाजूला टाकावी तर त्यानंतरच्या बकेट दुसऱ्या बाजूला टाकावी. नंतर काळ्या मातीच्या प्रमाणानुसार तितक्याच किंवा अर्ध्या प्रमाणात मुरूम मिसळून घ्यावी.
या मिश्रणाने नाली भरून घ्यावी. रोपांच्या लागवडीच्या ठिकाणी शिफारशीप्रमाणे दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि दीड ते दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नाली भरताना जमिनीच्या वर एक ते दीड फूट उंच गादीवाफा होईल असे पाहावे. त्यासाठी जास्तीची माती आजूबाजूच्या जमिनीतील वरच्या थरातूनच घ्यावी. चराच्या बाजूला टाकलेल्या खालच्या तुलनेने कमी सुपीक मातीने जमीन सपाट करून घ्यावी.
जमीन सर्वसाधारण असल्यास फक्त चर करून. परत सर्व मातीने चर भरून घ्यावा. वेगळी माती किंवा मुरूम मिसळण्याची गरज नाही.
आपली जमीन अतिशय हलकी मुरमाड असल्यास खोद यंत्राने खोदल्यानंतर त्या मातीमध्ये साधारणतः ४० ते ५० टक्के काळी सुपीक माती किंवा धरणातील गाळ मिसळावा. जमिनीच्या वर एक ते दीड फूट गादीवाफा होईल अशा पद्धतीने तो भरून घ्यावा.
कलमांची निवड
जोमदार वाढलेले कमीत कमी आठ नऊ महिन्यापूर्वी कलम केलेले दीड ते दोन फूट उंचीचे कलम निवडावे.
फेल झालेल्या ठिकाणी पुन्हा कलम केलेले व खुरटलेल्या वाढीची कलमे प्रकर्षाने टाळावीत.
कलमे घेत असलेल्या बागेतील मातृवृक्ष निरोगी असावेत. त्यात पर्णगुच्छ रोगाचा प्रादुर्भाव नसावा. गेल्या आठ-दहा वर्षात राज्यांत पर्णगुच्छ रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ही काळजी घ्यावी.
कलमांच्या निवडीसाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी.
कलम लागवड
योग्य पद्धतीने नाली भरलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडून गेल्यानंतर किंवा सिंचनाद्वारे नाली भिजवून घेतल्यानंतर कलम लागवड करावी. अशावेळी ठरलेल्या अंतरावर मार्किंग करावी. त्या ठिकाणी कलमाची पिशवी बसेल एवढा खड्डा करावा. त्यात २५० ग्रॅम निंबोळी पेंड, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर, २५ ग्रॅम पी. एस. बी. आणि २५ ग्रॅम रायझोबिअम जिवाणू संवर्धक मिसळून घ्यावे.
त्यात कलम लागवड करावी. लागवडीनंतर बाजूची माती उभे राहून पायाने चांगले दाबून मोकळ्या मातीतील हवा बाहेर काढून टाकावी. बागेमध्ये झाडाच्या दोन्ही बाजूंना दोन ड्रीपर राहतील, अशा प्रकारे ठिबकच्या नळ्या पसराव्यात.
जागेवरच कलम करण्याची आधुनिक इनसिटू पद्धत
आंबा कलम करून लागवड केली जातो. कलम पिशवी वाढताना त्याची मुळे पिशवीत गुंडाळली जातात. परिणामी जमिनीमध्ये लागवडीनंतरही रोपाचे सोटमूळ खोलवर शिरकाव करण्यात काहीशा अडचणी येतात. अशी झाडे पाण्याचा ताण, वादळ वाऱ्याचा धोका व अन्य ताणांमध्ये लवकर बळी पडू शकतात. याला पर्याय म्हणून बागेतच कोयीची लागवड करून त्यावर कलम करण्याची पद्धत फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवडीच्या ठिकाणी तीन ते चार कोयींची लागवड करायची. त्यातून उगवलेल्या जोमदार रोपावर सप्टेंबर किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये कलम करून घ्यावे.
या पद्धतीने वर्ष २००० मध्ये जिरडगाव (जि. जालना) येथील गट शेतीमध्ये छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी आधुनिक इनसिटू पद्धतीने सलग तीन वर्ष ५०० एकरवर केसर आंबा लागवड केली आहे. अशाप्रकारे लागवड केल्यास कलमाद्वारे लागवड केलेल्या बागेपेक्षा फळधारणा साधारणतः एक वर्ष उशिरा होते.
इनसीटू व कलम यांची एकत्रित हायब्रीड मोडद्वारे लागवड
कलम लागवडीपेक्षा होणारा एक वर्षाचा उशीर टाळण्यासाठी आम्ही इनसिटू व कलप पद्धतीचे एकत्रीकरण करून लागवडीची नवी पद्धत शोधली आहे. यात नेहमीप्रमाणे कलमाची लागवड करावी. कलमापासून बाजूला एक ते दीड इंच अंतरावर तीन ताज्या कोयी लावाव्यात. या कोयी उगवून आलेले रोप सप्टेंबर किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये कलमाच्या खोडाला जोडून घ्यावे.
यामुळे कलमाच्या गुंडाळी झालेल्या मुळे वाढण्यात अडचण आली तरी शेजारच्या कोयीचे सोटमुळ वेगाने वाढून खोलवर जाते. सुरुवातीची तीन, चार वर्षे झाडाला दोन, तीन प्रकारच्या मुळांचा आधार व पोषक द्रव्ये उपलब्ध होतात. परिणामी झाड वेगाने वाढते. झाड अन्य ताण व वादळी वारे, पावसात सुरक्षित राहते. या बागेमध्ये कलमीकरणाच्या बागेप्रमाणेच तीन वर्षांत फळ सुरू होते. इनसीटू पद्धतीमध्ये वाया जाणारे वर्ष वाचते.
लागवडीनंतर कलमाची पहिल्या वर्षी घ्यावयाची काळजी
कलमांच्या बाजूला दोन दणकट काठ्या रोवाव्यात. त्यावर आडव्या दोन काठ्या बांधून शिडीप्रमाणे आकार तयार करावा. त्याला कलम हलके बांधून घेतल्यास वाऱ्यामुळे होणारी इजा टाळता येईल.
जनावरे, रानडुक्कर यापासून संरक्षण करण्यासाठी बागेला कुंपण करावे.
कलमांच्या मुळांची दोन्ही बाजूंनी वाढ होण्यासाठी दोन्ही बाजूला दोन ड्रीपरद्वारे पाणी द्यावे.
बागेमध्ये आंतरपीक घेणार असाल, ते कमी उंचीचे असावे. उन्हाळ्यात आंतरपीक जरूर घ्यावे, त्यामुळे आंबा झाडांच्या क्षेत्रातील तापमान व सूक्ष्म वातावरण स्थिर राहण्यास मदत होते.
आंतरपिकामध्ये आंतरमशागत व अन्य कामे काळजीपूर्वक करावीत. औताने कलमे मोडण्याचा धोका असतो.
झाडांच्या वाढीसाठी खतांचे योग्य व्यवस्थापन करावे.
नवीन लागवडीच्या झाडांवर चांगली नवती आल्यानंतर (म्हणजे साधारणतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये) पहिली छाटणी घ्यावी.
नव्या बागेमध्ये पान खाणारी अळी, शेंडा पोखरणारी अळी व रसशोषक किडीसोबतच करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पाने हिरवी होईपर्यंत त्यापासून बचावासाठी फवारण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे.
बागेभोवती सजीव कुंपण व वारा प्रतिबंधक म्हणून उंच वाढणाऱ्या सदाहरित वृक्षाची (उदा. सरू, महागणी इ.) लागवड करावी. बागेचे उष्ण वाऱ्यापासून रक्षण होते.
- डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९
(लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.