Pigeaon Bird: पारव्यांचे नेमके करायचे काय?

Environmental Impact: मुंबई आणि महाराष्ट्रातील पारवांची संख्या इतकी वाढली आहे की त्यांनी अनेक पक्ष्यांची स्पर्धा कमी केली आहे. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे आणि विष्ठेमुळे निसर्ग आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होत आहे; त्यामुळे पारव्यांशी संबंधित समस्या गंभीर होत आहेत.
Pigeon
PigeonAgrowon
Published on
Updated on

Disease Transmission: काळ बदलतो, तशी परिस्थिती बदलते. त्यानुसार भवतालाचा डोळसपणे विचारही करावा लागतो. काही समाजांमध्ये परंपरागत किंवा धार्मिक रूढी असतात. पण काळानुसार त्यांचा पुनर्विचार करावा लागतो, व्यावहारिक विचार करावा लागतो. उंदीर हे तर गणपतीचे वाहन. पण म्हणून उंदरांना अभय देऊन चालेल का? हेच भटकी कुत्री किंवा इतर जिवांबाबत म्हणावे लागेल. किंबहुना, पारव्यांचा सर्वच प्रकारचा त्रास आणि उंदरांसारखीच उच्छाद मांडण्याची क्षमता पाहता त्यांचे वर्णन ‘उडणारे उंदीर’ असेही केले जाते. त्यांना मर्यादेपलीकडे वाढू देणे केवळ माणसासाठीच नव्हे, तर निसर्गासाठीसुद्धा घातक आहे.

कबुतर... सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात गाजत असलेला विषय. खरे तर ती कबुतरे नव्हेत, तर ते पारवे आहेत. त्यांच्याबद्दलच्या दोन आठवणी मनात कोरल्या गेल्या आहेत. एक आठवण अगदी लहानपणीची. तेव्हा आम्ही चाळीमध्ये राहत होतो. चाळीच्या कौलारू घराच्या वळचणीला एक पारवा बसायचा. आम्हाला त्याचे खूप अप्रूप होते. कारण इतर पक्ष्यांच्या तुलनेत पारवा असा कधीतरी पाहायला मिळायचा. या पक्ष्याने घातलेली अंडी पाहणे, त्याची पिसे गोळा करणे यामध्ये कमालीची उत्सुकता असे.

दुसरी आठवण- ‘लोकसत्ता’चा प्रतिनिधी असतानाची. त्या वेळी ऑफिसमध्ये एका आजोबांचा फोन आला. नेमके निमित्त आठवत नाही, पण ते पारव्यांबद्दल बोलत होते. काकुळतीला येऊन म्हणत होते- हे पारवे हटवायला सांगा, त्यांना खायला घालू देऊ नका. कारण काय?... तर त्यांच्या पत्नीला पारव्यांमुळे विशिष्ट प्रकारचा संसर्ग झाला होता. त्यात त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे ते पोटतिडिकीने सारे सांगत होते. पारव्यांबद्दल मुंबईत सुरू असलेल्या गदारोळात या दोन्ही आठवणी जाग्या झाल्या.

Pigeon
Rock Pigeon : गच्चीत येणाऱ्या पारव्यांपासून सावधान ; होईल फुप्फुसाचा गंभीर आजार

हा पक्षी पूर्वी म्हणजे निदान तीसेक वर्षांपूर्वी, महाराष्ट्रात घरापर्यंत अपवादाने पोहोचला होता. किंवा त्याच्या उच्छादाबद्दल फारसे बोलले जात नव्हते. आता मात्र गावं असोत वा शहरं; त्याने सर्वत्रच जम बसवला आहे. इतका, की आजकालच्या लहान मुलांच्या भावविश्‍वातही त्याने (चांगल्या अर्थाने असेल किंवा वाईट अर्थाने!) आपली जागा घट्ट केली आहे. पालकांकडून चिऊ-काऊच्या जुन्या गोष्टी ऐकायला मिळत असल्या, तरी निदान शहरात तरी समोर पारवेच पाहायला मिळतात, अशी आताची अवस्था.

शहरांबद्दल सांगायचे तर पारवे कधी बाथरूमच्या खिडकीत, कधी खिडकीच्या खाली किंवा वर असलेल्या काँक्रीटच्या सज्जावर, कधी एसीच्या एक्झॉस्ट जाळीमध्ये, तर कधी गच्चीमध्ये, नाही तर अन्य कुठे त्यांचा वावर... सर्वांचाच हा अनुभव. गॅलऱ्या जाळ्यांनी झाकून घ्या, नाहीतर त्यांना घाबरविण्यासाठी आणखी काही करा... यांचे रात्रंदिवस सुरू असलेले ‘गुटर्गू’ आणि अवतीभवती विष्ठा, पिसे, त्यांचा वास यापासून सुटका नाही.

शहरात तर इतर पक्ष्यांना बाजूला हटवून पारव्यांचीच सत्ता निर्माण झाली आहे. चिमण्या-कावळे तर नावापुरतेच उरले आहेत. पोपटासारखे पक्षी दिसणे ही तर चैनच समजायची. पण या सर्व पक्ष्यांना बाजूला हटवून स्वत:चा जम बसवणे पारव्यांना कसे जमले? त्यासाठी पारव्यांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता कारणीभूत आहेच, त्याचबरोबर आपली बदललेली जीवनशैलीसुद्धा, मुख्यत: घरांची रचना. पूर्वीचे घरांसाठी वापरले जाणारे साहित्य, घरांची रचना आणि त्यात आता झालेले बदल पाहिले तर हा किती लक्षणीय बदल आहे हे लक्षात येईल.

आताच्या या घरांमध्ये चिमण्यांसारख्या लहान बिळे करून किंवा फटी-सापटींमध्ये राहणाऱ्या पक्ष्यांना जागाच उरली नाही. घरांच्या बांधकाम साहित्यामधून माती, लाकूड, विटा गेल्या. या साहित्यात भितींमध्ये बिळे, फटी बनायच्या. पण काँक्रीटच्या बांधकामांमध्ये ही सोय नाही. शिवाय मजल्यांवर मजले, सारे एकसारखेच. जोडीला अवतीभवती उगवणारे गवत, झुडपं, मोठी झाडे असा झाडोरा कमी होत गेला. त्यातून घरांसाठी मिळणारे गवत, पाने, काड्या कमी होत गेल्या. सिमेंट, डांबर, ब्लॉक्समुळे जमिनीवर मातीच उरली नाही. कुठे साचणारी डबकी, पाणथळी, ओलाव्याच्या जागा संपल्या. तिथला गारवा, त्यावर येणारे कीटक कमी झाले. त्यामुळे पक्ष्यांचे अधिवास व अन्न नष्ट होण्याची उरली-सुरली कसरही भरून निघाली.

ही परिस्थिती पारव्याच्या मात्र पथ्यावर पडली. एकीकडे हे बदल होत गेल्यामुळे इतर पक्ष्यांचे शहरात राहणे कठीण बनले. स्वाभाविकच त्यांच्या संख्येला गळती लागली आणि पारव्यांची स्पर्धा आपोआपच कमी झाली. त्याच वेळी, या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात पारवा यशस्वी ठरला. घरट्याविना कुठेही जगणे, अंडी घालणे, पिलांना जन्म देणे... हे त्याला जमते. धान्याबरोबरच, माणूस खात असलेल्या उष्ट्या-खरकट्या अन्नावर तो पोसतो. याहून महत्त्वाचे म्हणजे, त्याला विणीसाठी कोणत्याही हंगामाची किंवा पूरक परिस्थितीची आवश्यकता नसते. त्यामुळे तो सर्व काळ पुढची पिढी जन्माला घालत असतो.

Pigeon
Birds in Agriculture: शेतशिवारात पक्ष्यांचा वावर वाढला

कोणत्याही जागेत किंवा परिसरात किती संख्येने पक्षी राहणार याची विशिष्ट क्षमता असते. एका प्रकारचे पक्षी वाढले की इतर पक्षी कमी होणार हे ठरलेलेच असते. त्यामुळे इतर पक्ष्यांची संख्या कमी होण्याने पारवे वाढत गेले. आणि ते वाढल्याने इतर पक्षी वाढण्याची शक्यता कमी होत गेली. परिणामी, सर्वत्र पारव्यांचे राज्य सुरू झाले. तरीही, काही प्रमाणात का होईना, इतर पक्षी तग धरून आहेत. विशेषत: ज्या भागात झाडोरा चांगल्या प्रकारे टिकून आहे, तिथे इतर पक्षी अजूनही पाहायला मिळतात. पण जिथे झाडे कमी होऊन रखरख वाढली, तिथे पारव्यांना इतर कोणाचीच स्पर्धा उरली नाही.

पारवा हा दिसायला कसाही असला किंवा मुख्यत: धान्याचे दाणे, बिया खात असला तो अतिशय आक्रमक पक्षी. आक्रमक याचा अर्थ तो इतर जिवांना मारतो किंवा त्यांना खातो असा नव्हे. अनेक जण त्या दृष्टीने आक्रमक म्हणजे गरुड, ससाणा यांच्यासारखे मांसभक्षक पक्षी, असा अर्थ घेतील. पण ही झाली माणसाची कल्पना. प्रत्यक्षात, प्राणिजगतात तसे नसते. संख्येच्या आणि परिस्थितीच्या जोरावर इतर पक्ष्यांना हुसकावून लावणे, दूर हटवणारे म्हणजे आक्रमक जीव. म्हणून जिथे जिथे पारवे वाढतात, तिथे पक्ष्यांची विविधता कमी होते. त्या भागात काही अपवाद वगळता फक्त पारवाच पाहायला मिळतो. त्या दृष्टीने पारवे आक्रमक ठरतात.

पण असाही प्रश्‍न पडेल की पारवे वाढल्यामुळे नुकसान काय? त्याच्या आक्रमक स्वभावामुळे विविधता कमी झालीच, पण त्याहून गंभीर बाब म्हणजे- त्यांच्यामुळे विष्ठेतून, पंखांमधून पसरणारा संसर्ग, परजीवींचा प्रसार. त्याच्यामुळे अनेक अॅलर्जी वाढतात, रोग बळावतात. त्याचबरोबर त्यांचा माणसाशी इतका जवळचा संपर्क येत असल्याने पक्ष्यांकडून माणसात काही रोगही संक्रमित होण्याचा धोका असतो. हे आता वैद्यकीय अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. त्यांची संख्या इतकी प्रचंड वाढल्यामुळे त्यांचा उच्छाद वाढणार हे निश्‍चित. याशिवाय त्याच्या विष्ठेमुळे (त्यातील युरिक अॅसिडमुळे) अनेक वारसा इमारती विद्रूप आणि कायमच्या खराब होत आहेत. अशा पारव्यांना, आपण भूतदया म्हणून दाणे टाकून या समस्येत भरच घालत आहोत.

हाच विषय सध्या संवेदनशील बनला आहे. पारव्यांना दाणे टाकणारे लोक रोगराई वाढावी म्हणून किंवा इतरांना त्रास व्हावा म्हणून हे करतात, असे नक्कीच नाही. पण वास्तव असे की आपल्याकडे निसर्गाबद्दल, परिसंस्थेबद्दल किंवा एकूणच आसपासच्या भवतालाबद्दल नेमकी माहिती नसते. किंबहुना, त्याबाबत गैरसमजच जास्त असतात. आपण आपल्या चष्म्यातून किंवा कल्पनेतून प्राणिजगताकडे पाहत असतो. त्यातच खरी गल्लत होते. आपण चांगल्या भावनेतून एखादी कृती करतो, पण त्या कृतीचे भवतालावर आणि माणसावर सुद्धा काय परिणाम होत आहेत हे लक्षात घेतले जातेच असे नाही. त्यातच या मुद्द्याला धार्मिक किंवा एखाद्या समाजाच्या, वर्गाच्या भावनांचा पदर असला तर तो अधिकच गुंतागुंतीचा बनतो. तेच या मुद्द्यात पाहायला मिळते.

खरे तर काळ बदलतो, तशी परिस्थिती बदलते. त्यानुसार भवतालाचा डोळसपणे विचारही करावा लागतो. पण आजच्या काळात जगत असताना (काही शाश्‍वत मूल्ये वगळता!) जुन्या काळातील मान्यता कायम ठेवणे प्रत्येक वेळी योग्य ठरेलच असे नाही. काही समाजांमध्ये परंपरागत किंवा धार्मिक रूढी असतात. पण काळानुसार त्यांचा पुनर्विचार करावा लागतो, व्यावहारिक विचार करावा लागतो. उंदीर हे तर गणपतीचे वाहन. पण म्हणून उंदरांना अभय देऊन चालेल का? हेच भटकी कुत्री किंवा इतर जिवांबाबत म्हणावे लागेल. किंबहुना, पारव्यांचा सर्वच प्रकारचा त्रास आणि उंदरांसारखीच उच्छाद मांडण्याची क्षमता पाहता त्यांचे वर्णन ‘उडणारे उंदीर’ असेही केले जाते. त्यांना मर्यादेपलीकडे वाढू देणे केवळ माणसासाठीच नव्हे, तर निसर्गासाठीसुद्धा घातक आहे.

शेवटी, काही गोष्टी त्या-त्या विषयातील तज्ज्ञांवर सोडून द्याव्या लागतात. तसाच हा विषय आहे. याबाबत फारसे आग्रही राहून चालणार नाही. तो प्राणिजगत आणि आरोग्य या क्षेत्रातील तज्ज्ञांवर तो सोडून देण्यातच भले आहे. त्यातूनच योग्य मार्ग निघण्याची शक्यता आहे.

abhighorpade@gmail.com

(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com