
Kokan Farming:
नागली, वरी
लागवडीस तयार झालेल्या रोपवाटिकेमध्ये एक दोन दिवस अगोदर वाफ्यांना भरपूर पाणी द्यावे. रोपे उताराच्या आडव्या दिशेने ठोंब पद्धतीने ओळीत उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पादन मिळण्यासाठी उताराच्या जमिनीमध्ये ३० दिवसांची रोपे एका ठोंब्यात दोन या प्रमाणे दोन ओळीत २० सें.मी. आणि दोन रोपांत १५ सें.मी. अंतर ठेवावे. पावसाची तीव्रता कमी असताना लावावीत. सपाट व चांगला निचरा होणाऱ्या जमिनीसाठी २५ सें.मी. × १० सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करावी.
नागलीसाठी हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. नत्र खत दोन हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता ४० किलो नत्र व ४० किलो स्फुरद आणि पालाश, युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश माध्यमातून किंवा १५:१५:१५ हेक्टरी २६६ किलो लावणीच्या वेळेस द्यावा. खताची पहिली मात्रा फोकून न देता ठोंब्यातून द्यावी म्हणजे अधिक फायदा होईल. रोपवाटिकेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
नारळ
वाढलेल्या आर्द्रतेमुळे आणि पावसाच्या ओलाव्यामुळे नारळ पिकावर कोंब कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. यात रोगग्रस्त माडाचा कोंब कुजतो. हा कुजलेला कोंब साफ करून त्यामध्ये १ टक्के बोर्डो मिश्रण ओतावे. याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी झाडाच्या कोंबानजीकच्या गाभ्यावर पावसाची उघडीप पाहून करावी. नारळामध्ये इरिओफाईड कोळी या सूक्ष्म किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंड ५ किलो प्रति झाड या प्रमाणात द्यावे.
वेलवर्गीय भाजीपाला
पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी पिके वेल टाकू लागल्यावर त्यांना शिऱ्या लावून आधार देण्यात यावा आणि मंडपाची व्यवस्था करावी.
वेलवर्गीय भाजीपाला पिकास नत्र खताची दुसरी मात्रा प्रती वेल १० ग्रॅम युरिया या प्रमाणात लागवडीनंतर एक महिन्यांनी समप्रमाणात विभागून देण्यात यावी. नत्र खताची मात्रा देताना बेणणी करून बुंध्याजवळील माती भुसभुशीत करून वेलीस मातीची भर द्यावी.
कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका इ. वेलवर्गीय भाजीपाला पिकावर तांबडे भुंगे, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. असे दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट १५ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघडीप पाहून फवारणी घ्यावी.
लागवड केलेल्या वेलवर्गीय भाजीपाला पिकातून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
कुक्कुटपालन
ब्रॉयलर पक्ष्यांना पहिले तीन आठवडे त्यांच्या वजनानुसार ब्रॉयलर स्टार्टर व पुढे विक्री होईपर्यंत ब्रॉयलर फिनिशर खाद्य द्यावे.
ब्रॉयलर पक्ष्यांच्या मांसातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी व अधिक वाढीसाठी खाद्याच्या १.५ टक्का काळे जिरे पावडर किंवा ०.५ टक्का हळद पावडर किंवा १टक्के आले भुकटी देण्यात यावी.
एका वेळी खाद्य घातल्यास किमान ७० टक्के पिल्लांना खाद्य खाता येईल एवढी भांडी ठेवावीत.
पाण्यासाठी ५ लिटरचे एक भांडे प्रति ५० पक्षी यानुसार ठेवावे. पिल्लांना ताजे व स्वच्छ पाणी द्यावे.
पशुपालन
यशवंत, नेपियर इ. बहुवर्षीय चारा पिकांची लागवड करावी. जेणेकरून सकस हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होईल.
जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ कोमट पाणी व उपलब्ध असल्यास खाण्यासाठी हिरव्या ओल्या चाऱ्याची व्यवस्था करावी.
गायी आणि म्हशींना पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली फऱ्या आणि घटसर्प या आजारांसाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करून अवश्य करून घ्यावे.
लसीकरणानंतर उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला व सकस आहार द्यावा.
हळद
हळद पिकास नत्र खताची पहिली मात्रा ८५० ग्रॅम युरिया प्रति गुंठा लागवडीनंतर दीड महिन्यांनी पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी. हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात ही खते टाकून मातीने झाकून घ्यावीत. पिकास भर द्यावी.
हळद पिकामध्ये कंद माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरुवातीपासूनच या किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी छिद्रे असलेल्या प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये सुकी मासळी ओलसर करून ठेवावी. अशा बरण्या ४ ते ५ फूट उंचीवर शेतामध्ये ४ ते ५ ठिकाणी ठेवाव्यात. कंद माशीच्या माद्या या आमिषाकडे आकर्षित होऊन तेथे अंडी घालतात. साधारणपणे ४ ते ५ दिवसांनी अशी सुकी मासळी जाळून नष्ट करावी.
हळद पिकामध्ये पावसामुळे अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
- डॉ. वीरेश चव्हाण (नोडल अधिकारी), ९४२२०६५३४४
(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.