Ujani Dam Water Crisis: ‘उजनी’ची वाटचाल मृतसाठ्याकडे
Pune News: सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आल्याने उजनी धरणातील (यशवंत सागर) पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला आहे. सध्या धरणात १३ टक्के म्हणजे ७० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी केवळ ७ टीएमसी हा उपयुक्त पाणीसाठा आहे.
धरणाची वाटचाल आठवडाभरात मृतसाठ्याकडे (उणे) जाण्याची शक्यता आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरूनही ही परिस्थिती आल्याने हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते. धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी असून यांपैकी ६४ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५३ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते.
या उपयुक्त पाणीसाठ्यातून धरणावर अवलंबून असलेल्या पाणी योजना, सिंचन योजना व उद्योगीकरणास पाणी पुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. मात्र, दरवर्षी धरणातील मृतसाठ्यातील निम्म्याहून अधिक पाणीसाठा संपेपर्यंत पाणी वापरले जाते. धरणात प्रत्यक्ष पाणीसाठ्यास ऑगस्ट, बर महिना उजाडतो. ऑक्टोबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर भीमा नदीत पाणी सोडण्याची कोणतीच तरतूद नसताना उजनी धरणातून मात्र दर महिन्याला सर्रास नदीतून पाणी सोडण्यात येते.’’
‘‘सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम जाणीवपूर्वक रखडविण्यात आले आहे. यावर्षी मार्च अखेरीस बंदिस्त जलवाहिनीतून पाणी पुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही काम रेंगाळलेले आहे. सन २०१६ मध्ये लवादाने दिलेला निकाल व अन्य सबळ पुराव्यांच्या माध्यमातून आता धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचे नियोजन केले आहे,’’ यांनी या वेळी सांगितले.
धरणातील सध्याचा साठा
उजनी धरणात सध्या १३ टक्के म्हणजे ७० टीएमसी पाणीसाठा आहे. यापैकी केवळ ७ टीएमसी हा उपयुक्त पाणीसाठा आहे. तर धरणातून भीमा नदीतून ६ हजार क्युसेक, सीना-माढा योजनेसाठी ३३३ क्युसेक, दहिगाव योजनेतून ८० क्युसेक, बोगद्यातून ७५० क्युसेक, मुख्य कालव्यातून २ हजार ९५० क्युसेक असे सुमारे १० हजार ११३ क्युसेक प्रती सेंकद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.