Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Agriculture Irrigation : पुणे जिल्ह्यात दुष्काळी पुरंदर तालुक्यातील तीन पाणी पुरवठा संस्थांनी सुसूत्र नियोजन व व्यवस्थापनातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवले आहे. त्यातून पीकपध्दतीत बदल घडलाआहे. नगदी, व्यावसायिक पिकांमधून शेतकऱ्यांना आपली शेती व कौटुंबिक जीवनमानयात आमूलाग्र बदल घडवणे शक्य झाले आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

संदीप नवले

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात पाच हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले मांडकी गाव
आहे. गावाला पाणी नियोजन व पुरवठा विषयाचा जुना वारसा आहे. सन १९५१ मध्ये गावात मांडकी सहकारी तर १९७७ मध्ये ‘भैरवनाथ’ सहकारी या पाणीपुरवठा संस्था उदयास आल्या. नंतरच्या काळात म्हणजे १९८३ मध्ये विश्वास जगताप यांनी आबासाहेब सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन केली.

पुरंदर हा दुष्काळी तालुका आहे. साहजिकच आपल्या गावाला दुष्काळी संकटातून बाहेर काढण्याच्या बाबतीत येथील ग्रामस्थ सजग होते. त्यासाठी सर्वानुमते पाणीपुरवठा संस्था स्थापन करण्याचा निर्धार झाला. यामध्ये गणेश मांडके, रामचंद्र जगताप, नारायण महादेव जगताप, मारुती महादेव जगताप, बबन जगताप व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुगट काकडे- देशमुख व बाबालालजी काकडे देशमुख यांची मदत घेतली. तीनही संस्था आजही मोठ्या क्षमतेने कार्यरत असून नफ्यात आहेत. त्यांच्या माध्यमातून गावातील सुमारे २२०० एकर क्षेत्र ओलीताखाली आले आहे.

पाण्याचे व्यवस्थापन

नीरा नदीपात्रावर मांडकी व जेऊर केटी वेअर असे दोन बंधारे बांधले आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून पाणी उचलणे सोयीचे झाले आहे. त्यासाठी ‘सोमेश्वर’ कारखाना आणि बॅक आँफ महाराष्ट्र यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेजपाळीप्रमाणे २० ते २५ दिवसांनी पाणी दिले जाते.

त्यासाठी १५ कर्मचारी काम पाहतात. प्रति शेतकरी वर्षासाठी एकरी पाच हजार ते सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत पाणी पट्टी आकारली जाते. ‘सोमेश्वर’ कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी वसूल करून संस्थेकडे जमा केली जाते. मोटर पंप, वितरण कुंड, पाइपलाइन आदी यंत्रणेतून शेतकऱ्यांचा शेतापर्यंत पाण्याचे सुलभ वितरण करण्यात आले आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही

वीज पुरवठ्यासाठी एक्स्प्रेस फिडर’चा वापर

शेतीसाठी फक्त आठ तास वीज पुरवठा करण्याचे धोरण शासनाने ठरवल्याने राज्यातील
पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था अडचणीत आल्या होत्या. मात्र यावर मार्ग काढण्यासाठी
शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही संस्थांच्या धर्तीवर एक्स्प्रेस फिडर’उभारण्याचे निश्‍चित झाले.

दोन संस्थांनी एकत्रित येऊ स्वखर्चाने एक कोटी रुपये त्यासाठी खर्च केला. त्यामुळे पूर्वी आठ तास चालणारा वीज पुरवठा आता १६ तासांवर पोचला आहे. अशी व्यवस्था निर्माण करणारी पुणे जिल्ह्यातील हे संस्थात्मक पातळीवरील एकमेव उदाहरण असावे. पाण्याचा अपव्यय झाल्यास दोनहजार रुपये तर पाण्याची चोरी केल्यास पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

घडला बदल

संस्थांच्या मदतीने पाणी गावात आल्याने भूजल पातळीत वाढ झाली. पर्यायाने या संस्थांच्या कार्यक्षेत्र व्यतिरिक्त आणखी ६०० एकर क्षेत्रा ओलिताखाली येण्यास मदत झाली. पूर्वी जिरायती पिके घेण्याशिवाय पर्याय गावकऱ्यांसमोर नव्हता. आता ऊस प्रमुख पीक झाले असून त्याचे सुमारे ९०० एकर क्षेत्र आहे. गावातून ५५ ते ६० हजार टन ऊस ‘सोमेश्वर’ कारखान्याला जातो.

गहू, टोमॅटो, बाजरी, कांदा, चारा अशी विविधताही गावच्या शिवारात दिसते. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. गावात चांगली घरे पाहण्यास मिळतात. ट्रॅक्टर्सची संख्या १०० पेक्षा अधिक असून चार चाकी गाड्याही घरापुढे दिसत आहेत. विविध अवजारे, यंत्रे शेतकऱ्यांनी खरेदी केली आहेत.

मुले, मुली उच्चशिक्षण घेत आहेत. गावात दोन विविध कार्यकारी सेवा संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यांची उलाढाल नऊ ते दहा कोटींच्या आसपास आहे. १०० टक्के पीक कर्ज वसुली अशी त्यांची ओळख आहे. तीन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था स्थापन झाल्या आहेत. सहकारी तत्त्वावर ज्योतिर्लिंग दूध नावानेही संस्था उदयास आली आहे.

Agriculture Irrigation
Smart Irrigation : स्मार्ट सिंचन पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

शेतकरी झाले जलसाक्षर

शेतकऱ्यांमध्ये पाण्याविषयी जागृती करण्यासाठी गावात प्रशिक्षणे घेण्यात आली.
कृषी विभागाच्या माध्यमातून अभ्यास सहलीचे नियोजन करण्यात आले. यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी (नाशिक), कृषी विज्ञान केंद्र, बारामती,
राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर व सांगली जिल्ह्यातील सामुहिक
ठिबक सिंचन प्रणाली योजना अशा विविध ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. आज गावात १०० ते १२५ एकरांवर ठिबक सिंचनाचा अवलंब केला जात आहे. सोबत प्लॅस्टिक मल्चिंगचाही वापर करण्यास सुरवात झाली आहे.

झाला ग्रामविकास

मांडकी ग्रामपंचायतीने विविध वृक्षांची लागवड केली आहे. डांबरी रस्ते केल्याने शेतमालाची ने आण करणे सोयीचे झाले आहे. दररोज सकाळ ते संध्याकाळ एक ते दीड तास पिण्याचे पाणी सोडले जाते. त्यातून वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. चालू वर्षी उन्हाळ्यातही गावाने पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाण्याची अद्याप टंचाई भासलेली नाही.

संपर्क- दशरथ पाडुंरग जगताप- ९०९६४५०२६९
(मांडकी’ पाणीपुरवठा संस्था)
दशरथ रामचंद्र शिंदे- ९८९०१६९९३६
(भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com