
Raigad News : तालुक्यातील खारेपाट विभागात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई भेडसावू लागते. सध्या खारेपाटात पेण पंचायत समितीच्या माध्यमातून १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. असे असले तरी वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या वाशी-वढावमधील यात्रांबरोबरच लग्नसराईकरिता प्रशासनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एप्रिल-मे महिना हा लग्नसराईचा आणि यात्रांचा असून, ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पेण पंचायत समितीच्या माध्यमातून २ एप्रिलपासून खारेपाटातील टंचाईग्रस्त भागात पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. या ठिकाणी जवळपास १२ ते १५ टँकरने पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना केवळ १० टँकरने पुरवठा केला जात असल्याने वाड्या-वस्त्यांवरील पाण्याची समस्या ‘जैसे थे’ आहे.
एकीकडे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत, तर दुसरीकडे पाण्यासाठी नागरिकांची भरउन्हात पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने खारेपाटातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी पोहोचवणे आवश्यक आहे. तालुक्यातील अनेक भागात लवकरच यात्रा उत्सव होत आहेत.
त्यात लग्नसराईचेही मुहूर्त आहेत. त्यामुळे परिसरातील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर होऊन, वाड्या-वस्त्यांवर टँकरने जास्तीत जास्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हक्काचे पाणी कधी मिळणार?
अंबा खोरा प्रकल्पात दरवर्षी १३५ दशलक्ष घनलिटर पाणी शिल्लक राहते. याचा वापर केल्यास खारेपाटातील टंचाई दूर होवू शकते. अंबा खोऱ्याच्या डाव्या तिरावरून कुर्डुस येथे आलेल्या कालव्याचे काम ३० वर्षापूर्वी केले होते, पण कालव्याची जलवाहिनी गळती लागल्याने पाणी अलिबाग तालुक्यातील कुर्डुसपर्यंत पोहचलेच नाही. अंबा खोर्यातून वाया जाणारे पाणी खारेपाटात वळवले तरी येथील टंचाई दूर होण्याबरोबरच हा भाग बारमाही पिकाने नक्कीच सुजलाम सुफलाम होईल.
भूगर्भातील पाणीपातळी खालावली
पेण तालुक्यातील भूजल पातळी ५५ मीटर आहे. सिंचनाचे मोठे प्रकल्प रायगड जिल्ह्यात नसल्याने विहिरी, बोअरवेलवर अवलंबून राहावे लागते. पाणीपुरवठा विभागात केवळ १३ हजार ३५३ बोअरवेलची नोंद आहे. तर परवानगी न घेता खोदलेल्या बोअरवेलची संख्या ३५ ते ४० हजाराच्या आसपास आहे. भूगर्भातील पाणी साठा वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना, पाणी आडवा, पाणी जिरवा, जलसंधारणच्या योजना दरवर्षी राबवल्या जातात; पण पाण्याची पातळी मात्र वाढलेली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.